माझे मधुमेहाचे अनुभव - ३

माझे मधुमेहाचे अनुभव - ३आधीच्या दोन भागांमध्ये आपण पाहिले.

मधुमेहाचे निदान २००४ मध्ये झाले तरी २००६ पासून खऱ्या अर्थाने उपचारांना सुरूवात झाली. तीन औषधे मिळून आणि आहार थोडा कमी करून मधुमेह सुमारे ११ वर्षे ताब्यात होता म्हणजे एच बी ए १-सी ७.५ होता.  तरीही रक्तातील साखर जेवले की वर आणि ४ तासांनी अचानक खूप खाली येणे यामुळे आहारातली गव्हाची पोळी वगळून  त्याऐवजी डाळींची धिरडी खाल्ली  आणि ग्लिमेपिराईड हे औषध बंद केले तर साखर वर - खाली होणे थांबेल आणि एका रेषेत मर्यादेत राहील असा विचार केला होता.

त्यानुसार एप्रिल २०१७ मध्ये या प्रयोगाला सुरूवात झाली. सुरुवातीला त्याचा बराच त्रास झाला, कारण सुमारे ५७-५८ वर्षे भात-पोळी खाल्ल्याशिवाय एकही दिवस गेला नव्हता. त्यामुळे थोडेसे सुरुवातीस पोटात दुखायचे. पण याचा अपेक्षित परिणाम दिसायला लागला. दुपारी आणि रात्री जेवल्यावर २ तासांनी साखर १५०-१८० या मर्यादेत यायची. एच बी ए १-सी पण ७.५ राहिला. खरे तर तो आणखीही खाली यायला हवा होता, पण उपाशीपोटीची साखर किंचित जास्त म्हणजे १००- १२० ऐवजी १३०-१४० अशी यायला लागली होती. पण निदान साखरेचे वर- खाली होणे, अचानक साखर ७० पेक्षा कमी होऊन ताबडतोबीने साखर खाऊन ती वर आणावी लागणे असे प्रकार बंद झाले. 

असे सर्व सुरळीत चालले असताना एका घटनेने हा प्रयोग बंद करावा लागला. फेब्रुबारी २०१९ मध्ये अचानक सर्व दात काढून कवळी लावावी लागली. खरे तर २०११-२०१२ पासूनच एक एक करून दात पडायला लागले होते. २०१९ मध्ये असे लक्षात आले की शेवटची दाढही आता हलायला लागली आहे, ती पडली तर अन्न चावताच येणार नाही, त्यामुळे दात काढून कवळी लावावी लागली.

पहिल्याच दिवशी रोहिणीने काय खाणार विचारले असता डाळीची धिरडीच खाणार असे मोठ्या झोकात उत्तर दिले. तिने धिरडी, भाजी, दही असे जेवण समोर वाढले असता लक्षात आले की आपल्याला धिरडी चावता येत नाहीत. त्यामुळे तिला धिरडी आणि भाजी मिक्सरमधून बारीक करून द्यायला सांगितले तेव्हा ती भयंकर चिडली. 

"या वेळी देते आहे पण उद्यापासून  सरळ भात, रसाची भाजी, मुगाच्या डाळीची खिचडी असे मऊ पदार्थच देईन . मान्य असेल तर ठीक नाही तर तुझे तू बघ."

"इतके चिडायला काय झाले?"

"एक तर डाळी रात्रभर भिजवा, त्या मिक्सरमधून बारीक करून त्याची धिरडी घाला आणि ती तुला चावता येत नाहीत म्हणून परत ती धिरडी, भाजी मिक्सरमधून काढून तुला द्या हा द्राविडी प्राणायाम मला जमणार नाही."

मलाही तिचे म्हणणे पटले. भात, मुगाच्या डाळीची खिचडी, रसाची भाजी, आमटी असे पदार्थ खायला सुरूवात केली. तीन महिन्यांनी डॉक्टरकडे जाताना एच बी ए- १ सी नक्की ९ किंवा १० येणार ही खात्री होती कारण भाताने साखर वाढते हा समज डोक्यात पक्का होता. पण मला आश्चर्याचा धक्का बसला, कारण एच बी ए- १ सी चक्क ६.८ होता. म्हणजे भाताने साखर वाढते हा समज चुकीचा होता हे सप्रमाण सिद्ध झाले.   

सुमारे ६ महिन्यांनी जरा चावता यायला लागल्यावर भात बंद करून परत डाळींच्या धिरड्याचा प्रयोग सुरू केला. मधल्या काळात दातांनी अन्न चावणे की क्रियाच विसरून गेलो होतो.  त्याच्या ही पुढे ७-८ महिने म्हणजे  मार्च २०२० पर्यंत एच बी ए- १ सी ७.० - ७.५ मा मर्यादेत होता. म्हणजे सुमारे तीन वर्षे ( मधल्या ६ महिन्यांचा अपवाद वगळता) डाळींची धिरडी खाण्याचा प्रयोग व्यवस्थित चालला होता. असे सुरू असताना जून २०२० मध्ये एच बी ए- १ सी अचानक ८.६ इतका जास्त आला. हा प्रकार माझ्या आकलनापलिकडचा होता. इतके कडक पथ्य पाळले (मार्च २०२० मध्ये कोविड सुरू झाल्याने उपाहारगृहे पण बंद होती, त्यामुळे सर्व जेवणे घरीच आणि तीही डाळीच्या धिरड्यांची) तरी एच बी ए- १ सी इतका जास्त कसा आला  हे समजेना. तीन वर्षे भात - पोळी वर्ज्य करून सतत डाळींचे प्रकार खाल्याने कंटाळलो होतोच. तरी मधुमेह आटोक्यात आहे म्हणून सहन करत होतो. आता इतके करूनही मधुमेह ताब्यात राहणार नसेल तर पोळी खाल्लेली काय वाईट असा विचार करून डाळींची धिरडी बंद करून पोळी खाणे सुरू केले. खरे तर थोडेसे मागे जाऊन फक्त भात खाणे सुरू करायला हवे होते, पण २००६-२०१७ मध्ये भात न खाता पोळी खाऊनही मधुमेह आटोक्यात राहिला होता हे मनात असल्याने पोळी खायला सुरूवात केली. त्याचवेळी बंद केलेली ग्लिमेपिराईडची गोळीही सुरू केली. 

हा प्रकारही सुमारे १ वर्ष म्हणजे  जुलै २०२१ पर्यंत व्यवस्थित चालला. एच बी ए- १ सी ७.५-८.० या मर्यादेत  राहिला. मात्र २०२१ पासूनची दोन वर्षे भयंकर वाईट गेली. नेमके काय झाले आणि त्याचा काय उपाय केला, आणि तेव्हापासून आजतागायत काय स्थिती आहे ते चौथ्या भागात सांगेन. त्यानंतर उपसंहाराचे एक किंवा दोन भाग करून ही लेखमाला संपवू.