माझे मधुमेहाचे अनुभव - उपसंहार २- औषधे

माझे मधुमेहाचे अनुभव - उपसंहार २- औषधे"काय रे आनंद, आज परत आलास?" दार उघडताना रोहिणीच्या वाक्यामुळे माझी मुलाखत घेणारा आनंद आला आहे हे समजले. तो आत आल्यावर मी पण विचारले "काय म्हणतोय तुझा श्रोतावर्ग माझ्या  अनुभवांबद्दल?"

आ. तुमचे अनुभव लोकांना आवडले. मागच्या भागात तुम्ही औषधांबद्दल सांगणार होतात त्याबद्दलही लोक विचारत आहेत म्हणून आलो. 

वि. - हरकत नाही, सुरू करू.

२००४-५ च्या सुमारास मधुमेही लोकांसाठी फारसे पर्याय उपलब्ध नव्हते. इन्सुलिन (insulin) सुईने टोचून घेणे हा शेवटला पर्याय समजला जायचा, अजूनही जातो. गोळ्यांमध्ये फक्त दोन पर्याय होते. मधुमेहाच्या औषधांची सुरूवात मेट्फॉर्मिन (Metformin) ने करावी असे वैद्यकीय समुदायाचे एकमत होते, अजूनही आहे. 

आ. हे औषध कसे काम करते?

वि. हे औषध यकृतामधून जी साखर गरजेनुसार रक्तात सोडली जाते ती कमी करण्याचे काम करते.

आ. इथे यकृताचा काय संबंध? मी तर वाचले की स्वादुपिडाचे कार्य बिघडले की ते इन्सुलिन  तयार करत नाही म्हणून मधुमेह होतो.

वि. मधुमेह नेमका कश्यामुळे होतो याबद्दल लोकांमध्ये गैरसमज आहेत.  काही लोक चुकीची मते छातीठोकपणे सांगतात. उदा. माझ्या मागच्या भागावर एकाने हे लिहिले आहे. 

"मधुमेह होण्याचं मूळ कारण स्वादुपिंड निष्क्रिय होणं आहे आणि जेवढं बाहेरून इन्शुलीन घेऊ तेवढी स्वादुपिंड निष्क्रिय होत जातात. त्यामुळे इच्छा होईल तसं आणि मजा वाटेल तेवढं गोड खात राहणं आणि बाहेरून कमीत कमी इन्शुलीन घेणं यामुळे स्वादुपिंड सक्रिय होतात."

यातील बहुतेक सर्वच भाग चुकीचा आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत म्हटले आहेच.

न बुझाविता मते । न फिटे आक्षेताचे लागते ।

ते व्याख्यानचि तुमते । जोडु नेदी ॥ ज्ञानेश्वरी अध्याय १३ ओवी ३२८

अर्थ- निरनिराळ्या मतांचे निराकरण न करता जर  व्याख्यान केले तर त्या व्याख्यानात आक्षेपांचा संबंध दूर होणार नाही. (त्यामधे शंकेच्या पुष्कळ जागा रहातील) व महाराज, तसले व्याख्यान मला तुमची प्राप्ती होऊ देणार नाही. 

त्यामुळे या मतांमध्ये काय चूक काय बरोबर त्याचे थोडेसे विवेचन करू. 

निदान ९०% लोकांना होणाऱ्या Type 2 प्रकारच्या मधुमेहामध्ये व्यक्तीची स्वादुपिंडे सक्रिय असतात, २२ वर्षे झाल्यावरही माझी स्वादुपिंडे सक्रिय आहेत. ती इन्सुलिन तयार करतात. त्यामुळे बाहेरून इन्सुलिन अजूनही घेत नाही. मधुमेह होण्याचे कारण म्हणजे "यकृत आणि स्वादुपिंड यांच्यातील संवादामध्ये बिघाड होतो". अन्नातून तयार होणारी उर्जा प्रथम यकृतात ग्लायकोजेनच्या (Glycogen) स्वरुपात साठवली जाते, ज्याचे रुपांतर गरजेनुसार  ग्लुकोजमध्ये (Glucose) होते. स्वादुपिंडातून स्रवणारे इन्सुलिन ही ग्लुकोज पेशींना पुरवते. यकृतातून बाहेर पडणाऱ्या ग्लुकोजच्या प्रमाणात स्वादुपिंडातून इन्सुलिन स्रवते याचे कारण यकृत - स्वादुपिंडात सुसंवाद असतो. काही कारणाने यकृत आणि स्वादुपिंड एकमेकांशी अबोला धरतात, स्वादुपिंडातून तयार झालेले इन्सुलिन नीट काम करत नाही, परिणामी ग्लुकोज पेशींपर्यंत पोचत नाही, याचा पत्ता यकृताला नसतो त्यामुळे ते आणखी ग्लुकोज (यालाच लेखांमध्ये साखर म्हटले आहे, आपण खातो ती साखर सुक्रोज असते) तयार करते. या गोंधळामुळे पेशींपर्यंत न पोचलेली साखर रक्तात साठून राहते, त्यानेच मधुमेह होतो. 

म्हणूनच यकृतातून तयार होणाऱ्या ग्लुकोजवर नियंत्रण आणणेही महत्वाचे आहे, यामुळेच मेट्फॉर्मिनचे महत्व अजूनही कायम आहे. दुसरे असे की मेट्फॉर्मिनमुळे कधीही रक्तातली साखर ७० पेक्षा कमी होत नाही त्यामुळे त्याचा वापर निर्धोकपणे करता येतो.

आ. तुम्ही २००५ साली दोनच पर्याय होते म्हणालात, तर दुसरा पर्याय कुठला?

वि. - या औषधांना सल्फोनिलयुरिया (sulfonylurea) प्रकारची औषधे म्हणतात. त्यात ग्लिपिझाईड (Glipizide), ग्लिमेपिराईड (Glimepiride) आणि जास्त करून भारतात वापरले जाणारे ग्लिक्लाझाईड (Gliclazide) यांचा समावेश होतो. ही औषधे स्वादुपिंडाला इन्सुलिन तयार करण्यास मदत करतात. फक्त यांचा वापर करताना साखर एकदम कमी  होण्याचा धोका असतो, त्याला हापोग्लायसेमिया (Hypoglycemia) असे नाव आहे. सध्या  अनेक नवीन औषधे बाजारात आली आहेत त्यामुळे यांचा वापर न करण्याबद्दल डॉक्टर लोक आग्रही असतात. 

मी ही औषधे गेली २२ वर्षे घेतो आहे. प्रभावी आहेत. त्यामुळे डॉक्टरांचा ही औषधे न वापरण्याचा आग्रह मला अनाठायी वाटतो. या औषधांबद्दल आणखी एक गैरसमज डॉक्टर आणि रुग्णांमध्ये आहे तो असा की ही औषधे फक्त पहिली ५ वर्षे काम करतात, पुढे ती प्रभावी ठरत नाहीत. २०२१-२०२३ मध्ये माझाही हाच गैरसमज झाला होता. पुढे निरंतर शर्करामापन यंत्र लावल्यावर ही औषधे प्रभावी आहेत, फक्त आहार बदलायची आवश्यकता आहे हे लक्षात आले.

आ. तुम्ही म्हणालात की ग्लिपिझाईड आणि मेट्फॉर्मिन या दोन औषधांनी मधुमेह आटोक्यात येत नव्हता तेव्हा २००७ मध्ये जानुविया (Januvia) हे तिसरे औषध सुरू केलेत त्याबद्दल सांगा.

वि. खरे तर नशीबच म्हणायला हवे की मी उपचारांना २००६ साली सुरूवात केली आणि त्याच वर्षी मर्क (Merck) कंपनीने हे औषध बाजारात आणले. २००७ पर्यंत दोन औषधांनी मधुमेह आटोक्यात येत नाही तिसऱ्या औषधाची गरज आहे हे लक्षात आले होते. २००७ मध्ये वरील दोन औषधांखेरीज जानुविया हे तिसरे औषध सुरू केले आणि पुढची सुमारे १५ वर्षे मधुमेह आटोक्यात राहिला. जानुविया हे डीपीपी-४ (DPP-4 agonist) प्रकारचे औषध आहे. ट्राजेन्टा (Tradjenta) किंवा भारतात जास्त प्रचलित असणारे विल्डाग्लिप्टिन (Vildagliptin) ही या प्रकारची आणखी औषधे.  ही औषधेही स्वादुपिंडाला इन्सुलिन तयार करण्यास सहाय्य करतात, फक्त या औषधांमुळे रक्तातली साखर एकदम कमी होत नाही.

आ. - सध्या तुम्ही घेत असलेल्या मोंजारो (Mounjaro) या औषधाबद्दलही थोडेसे सांगा.

वि. त्या आधी तुला थोडीशी माहिती सांगतो. इथे अमेरिकेत नवीन औषध बाजारात आणताना अगदी तज्ञ लोकसुद्धा त्यांची तारीफ सुरू करतात आणि त्याच वेळी जुनी औषधे कशी कुचकामी आहेत हे सांगतात, जेणेकरुन डॉक्टर ही औषधे लिहून देतील, रुग्ण ती खरेदी करतील आणि औषधी कंपन्यांचा फायदा होईल . उदा. २०१८ मध्ये नोव्हो नॉर्डिस्क (Novo Nordisk) या  कंपनीचे ओझेंपिक (Ozempic) हे औषध बाजारात आणले. त्यावेळी अनेक तज्ञ लोक जानुविया कसे कुचकामी आहे आणि ओझेंपिक कसे प्रभावी आहेत याची रसभरित वर्णने करत, तेही केवळ नोव्हो नॉर्डिस्कने दिलेल्या माहितीवर अवलंबून राहून. एक तज्ञ तर असेही म्हणाले "जानुविया हे शुक्रवारी संध्याकाळी द्यायचे औषध आहे. म्हणजे असे की समजा शुक्रवारी संध्याकाळी माझाकडे रुग्ण आला आणि मी दवाखाना बंद करण्याच्या घाईत आहे तर त्याला काहीतरी थातुरमातुर औषध देऊन वाटेला लावतो तसे हे जानुविया हे औषध आहे, हे गंभीरपणे घायचे औषध नाही." मी मनात म्हणालो"हे तुझ्यातला डॉक्टर बोलत नसून नोव्हो नॉर्डिस्कने दिलेले पैसे बोलताहेत." कारण मला जानुवियाचा २००७ पासून चांगला अनुभव होता.

२०१८ साली ओझेंपिक बाजारात आल्यापासून जीएलपी-१ (GLP-1) या औषधांचा बराच बोलबाला झाला आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे ओझेंपिकमुळे वजन बऱ्याच प्रमाणात कमी होते. त्यामुळे खरे तर मधुमेही रुग्णांपेक्षा मधुमेही नसलेल्या स्थूल व्यक्तींमध्ये हे घेण्याचे प्रमाण इतके वाढले आहे की खुद्द मधुमेही रुग्णांना उपलब्ध होत नव्हते. खरे तर ओझेंपिक हे काही जीएलपी-१ प्रकारातले पहिले औषध नाही. त्या आधी एलाय लिलीचे (Eli Lilly) ट्रुलिसिटी (Trulicity)आणि नोव्हो नॉर्डिस्कचे विक्टोझा (Victoza)अशी दोन औषधे होती. फक्त त्यांनी वजन कमी होत असल्याचा दावा दोन्ही कंपन्यांनी केला नसल्याने त्यांचा फार बोलबाला नव्हता.

२०२१ ते २०२३ या काळात मी दोन्ही वापरून  पाहिली होती पण फारसा उपयोग झाला नव्हता. मात्र २०२३ मध्ये निरंतर शर्करामापक यंत्राचा वापर केला तेव्हा एचबीए - १ सी पहिल्याने ९.६ वरून ६.९ इतका खाली आला तेव्हा विक्टोझा वापरत होतो. पुढे डॉ. स्मिता यांनी ते बदलून ओझेंपिक लिहून दिले (कारण विक्टोझाचे इंजेक्शन दिवसातून एकदा घ्यायला लागायचे तर ओझेंपिक आठवड्यातून एकदा) , पण ते बाजारात उपलब्धच नव्ह्ते. त्यामुळे नव्यानेच बाजारात आलेले एलाय लिलीचे मोंजारो सुरू केले ते आजतागायत चालू आहे. 

या औषधांनी भूक कमी लगते, अन्नाचे पचन हळू होते त्यामुळे वजन कमी होते (माझे फारसे कमी झाले नाही) आणि मधुमेह आटोक्यात येतो (माझा आला).

असो. 

तुझ्या चिकाटीचे कौतुक आहे कारण माझे बरेच लांबलेले (आणि थोडेसे कंटाळवाणेही) औषधपुराण तू एकचित्ताने ऐकलेस ते पाहून ज्ञानेश्वरीतील ओवी आठवली.

तैसे जी होतसे देवा । तया अवधानाचिया लवलवा । पाहता व्याख्यान चढले थांवा । चौगुणे वरी ॥1151॥

महाराज, तसे श्रीकृष्णास झाले. त्या अर्जुनाची ऐकण्याची टवटवी (श्रवण उत्सुकता) पाहून त्यानाही सांगण्याला चौपटीपेक्षा जास्त जोर आला.

आ. विनायक मन:पूर्वक धन्यवाद. बहुतेक माझ्या श्रोते-प्रेक्षकांनाही हे उपयोगी ठरेल असे वाटते.