माझे मधुमेहाचे अनुभव
इथे अशी कल्पना करूया की विनायक आता प्रसिद्ध व्यक्तिमत्व झाले आहे आणि अनेक लोक त्यांच्या मुलाखती घेत आहेत. अश्याच एका (काल्पनिक) मुलाखतीमधून उपसंहाराचे भाग उलगडून दाखवू. मुलाखत घेणाऱ्याचे नाव आनंद आहे असे समजू.
आनंद - नमस्कार विनायक सर
मी - सर वगैरे नको, नुसतेच विनायक पुरे.
आ. ठीक आहे, मी तुमच्या लेखांचे चारही भाग वाचले. त्यांचा निष्कर्ष नेमका काय आहे? म्हणजे मधुमेही रुग्णाने नेमका काय बोध घ्यायचा?
वि. निष्कर्ष म्हणजे साधासोपा सरधोपट नियम , म्हणजे डॉ. जगन्नाथ दीक्षित सांगतात तसे दिवसातून दोनच वेळा जेवा तुमचा मधुमेह बरा होईल असे काही अपेक्षित असेल तर तुझी निराशा होईल. कारण तसे काहीच नाही.
पूर्वी लोकमान्य टिळकांचे एक वाक्य वाचले होते. "आमचे जुने लोक झाडाचे पानही परमेश्वराच्या इच्छेशिवाय हलत नाही असे म्हणतात त्याची सुधारक लोक टिंगलटवाळी करतात, पण खरी गोष्ट अशी आहे की पुण्याच्या पश्चिमेला सुधारकांनी कितीही शक्तिशाली पंखे बसवले तरी नैसर्गिक वाऱ्याने झाडांची पाने जशी हलतात तशी त्यांच्याच्याने हलवणार नाहीत". आता याचा मधुमेहाशी काय संबंध असे तुला वाटेल, तर सांगतो. मधुमेह न झालेल्या व्यक्तीची पचनसंस्था नैसर्गिकरीत्या चालते आणि साखर नियंत्रणात राहते ते म्हणजे नैसर्गिक वाऱ्याने झाडाची पाने हलणे आणि औषधे, गोळ्या, इंजक्शने घेऊन मधुमेह आटोक्यात ठेवणे म्हणजे पुण्याच्या पश्चिमेला शक्तीशाली पंखे लावून झाडाची पाने हलवणे. ही गोष्ट आता आधुनिक वैद्यकीय समुदायाच्याही लक्षात आली आहे. उदाहरणार्थ २००४-५ साली उपचार कश्या स्वरूपाचे असावेत या विषयी अमेरिकन डायबेटिक असोसिएशन वगैरे संस्था किंवा जगन्मान्य डॉक्टर यांचे मत असे होते की रक्तातली साखर जास्त असणे धोक्याचे आहे, औषधे, गोळ्या, इंजक्शने वगैरे कश्याही मार्गाने ती लवकरात लवकर आटोक्यात आणणे हे डॉक्टरांचे कर्तव्य आहे. त्यानुसारच माझी सुरूवात गोळ्यांनी झाली. पण त्यात असे होते की वर्षानुवर्षे, गोळ्या, इंजक्शने घेऊन रुग्णाची इन्सुलिन तयार करण्याची क्षमता म्हणा, यकृत आणि स्वादुपिंडातला संवाद या गोष्टी कमी होऊन १५-२० वर्षांनी रुग्णाला शेवटी रोजच्या रोज बाहेरून इन्सुलिन टोचून घेतल्याशिवाय त्याचा मधुमेह ताब्यात राहत नाही. माझ्यावरही ही जवळपास ही पाळी आली होती हे तुला चौथ्या भागावरून समजले असेल.
गेल्या काही वर्षांमध्ये ही मार्गदर्शक तत्वे बदलली आहेत. आता वैद्यकीय समुदायाच्या असे लक्षात आले आहे की मधुमेहाचे निदान झाल्यावर (किंवा निदान झाल्यावर तीन वर्षांच्या आत) एकदम औषधे, गोळ्या, इंजक्शने यांचा मारा सुरू करण्या ऐवजी, आहार नियंत्रण, व्यायाम वगैरे गोष्टी करून नैसर्गिकरीत्या मधुमेह आटोक्यात ठेवता येतो. कदाचित उरलेले सर्व आयुष्यही औषधांशिवाय काढता येते. त्यामुळे मधुमेहाचे निदान झाल्यावर याच पद्धतीचा अवलंब करून शरीराला एक संधी द्यावी यावर वैद्यकीय समुदायाचे एकमत झाले आहे.
आता हे झाले नव्याने मधुमेहाचि निदान झालेल्या व्यक्तींबद्दल किंवा ज्यांचा मधुमेह तीन वर्षे जुना आहे अश्या व्यक्तींबद्दल. माझ्यासारख्या माणसासाठी, ज्याचा मधुमेह २२ वर्षे जुना आहे, त्याने औषधाशिवाय मधुमेह ताब्यात राहील ही आशा सोडलेली बरी. औषधे घेऊन का होईना एच बी ए-१ सी ७ ते ८ मध्ये ठेवावा म्हणजे मधुमेहाने जे वाईट परिणाम होतात, उदा. आंधळेपण येते, मूत्रपिंडे निकामी होतात, क्वचित गॅन्गरीन होऊन पाय कापावा लागतो आणि शेवटी हृदयविकाराने मृत्यू होतो ते टाळणे इतकाच उद्देश समोर ठेवावा.
आ. हा उद्देश वगैरे ठीक आहे, पण ते प्रत्यक्षात अंमलात कसे आणायचे?
वि. हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. माझे उत्तर असे की या बाबतीत दुसऱ्याने सांगितलेले काहीच आपल्याला उपयोगी ठरत नाही. "जीवनशैलीत परिवर्तन करा" हे वाक्य ऐकून माझे कान किटले. नेमके काय बदल करा, याबद्दल बऱ्याच गोष्टी निरुपयोगी, काही अंमलात आणणे अशक्य आणि बऱ्याच गोष्टी विशेष फायदा न देणाऱ्या असल्याने माझे मत झाले आहे. या बाबतीत स्वत:च्या मार्ग स्वत:लाच शोधायला लागतो.
काही उपदेश आणि माझे अनुभव सांगतो, ज्याचा मला विशेष फायदा झाला नाही.
१. बैठे काम असेल तर हालचाल करत रहा.
माझे काम उभ्यानेच असते.
२. ३०-४५ मिनिटे व्यायाम आठवड्यातून ३-४ वेळा करा. काहीच जमत नसेल तर चाला.
३०-४५ मिनिटे व्यायाम मधुमेह सुरू व्यायच्या ३० वर्षे आधीपासून करत होतो, अजूनही करतो.
३. मद्यपान आणि धूम्रपान कमी करा.
दोन्ही करत नव्हतोच.
४. वजन आटोक्यात ठेवा.
हा माझ्या मते नुसताच वादग्रस्त नाही तर काही प्रमाणात चुकीचा वैद्यकीय सल्ला आहे. हा सल्ला प्रामुख्याने युरोप - अमेरिकेतल्या मधुमेही रुग्णांना समोर ठेऊन दिलेला आहे. एक पाहिले की भारतातले मधुमेही रुग्ण सहसा स्थूल नसतात तर सामान्य वजनाचेच असतात आणि वजन कमी करुनही त्याचा मधुमेह नियंत्रणासाठी काही उपयोग होत नाही. मात्र अमेरिकेत काही लोकांशी बोललो असता त्यांनी सांगितले पूर्वी माझे वजन बरेच (म्हणजे १२५-१३० किलो) होते तेव्हा मधुमेह झाला होता, वजन ९० किलो इतके कमी आणल्यावर ते बरा झाला.
या उलट माझे वजन २००५ मध्ये ८३ किलो होते, आता ७५ किलो आहे आणि तरीही मला मधुमेह ताब्यात ठेवण्यासाठी इतका संघर्ष करावा लागतो आहे.
५. आहारात कर्बोदके:प्रथिने: मेदयुक्त पदार्थांमधून मिळणाऱ्या कॅलरींचे प्रमाण ४०: ३०: ३० असावे (ज्याला समतोल आहार असे नाव आहे).
आपण भारतीय लोक घेतो तो आहार अर्थातच तसा नाही, आपल्या शाकाहारी लोकांच्यामध्ये हे प्रमाण साधारण ७०:१५: १५ असे पडते. मुळात हा आहार शाकाहारी मनुष्याला घेणेच अशक्य आहे, विशेषत: प्रथिनांबद्दल.
६. प्रत्येक व्यक्तीने जितके किलो वजन असेल त्याच्या एक ते दीडपण इतके ग्रॅम इतकी प्रथिने सेवन करायला हवीत.
आता ही गोष्ट अंमलात आणणे शाकाहारी व्यक्तीला जवळपास अशक्य आहे हे बघू. समजा मनुष्याला दिवसाला १६०० कॅलरीचा आहार लागतो. त्यापैकी समतोल आहारानुसार ३० % म्हणजे ४८० कॅलरी प्रथिनांमधून यायला हव्यात. आपल्या आहारात डाळी, कडधान्ये यांमध्ये प्रथिने जास्त म्हणजे २५% असतात. एक ग्रॅम प्रथिनाच्या ४ कॅलरी. म्हणजे ४८० कॅलरी मिळवण्यासाठी १२० ग्रॅम प्रथिने खायला हवीत. डाळीत २५% प्रथिने म्हणजे दररोज ४८० ग्रॅम (जवळपास अर्धा किलो) डाळी खाणे हे खरोखर शक्य आहे का? ठीक आहे, दुधाच्या २५० मिली लीटर मध्ये ८ ग्रॅम प्रथिने असतात म्हणजे मला १५ दुधाचे पेले किंवा ३.७५ लीटर दूध प्यावे लागेल. किंवा एका अंड्यात ६ ग्रॅम प्रथिने असतात म्हणजे मला रोज २० अंडी खावी लागतील. यातले सर्व थोडे थोडे खाऊन १२० ग्रॅम प्रथिने मिळवता येतीलही पण मग इतर कश्यासाठी पोटात जागा उरणार नाही.
दुसरे म्हणजे माझे वजन ७५ किलो असेल तर मला रोज ७५ ते ११२.५ ग्रॅम प्रथिने (किलोमध्ये वजनाच्या एक ते दीडपट ग्रॅममध्ये) लागतील तेही शाकाहारी व्यक्तीला अशक्यच आहे.
या बाबतीत भारतीय मधुमेहतज्ञ डॉ. मोहन, डो. प्रणिता अशोक यांनी ५० ग्रॅम प्रथिने असावीत असा अंमलात आणणे शक्य होईल असा सल्ला दिला आहे तो योग्य वाटतो.
आता मधुमेहतज्ञांचे परस्पर विरोधी सल्ले, याबद्दल बोलू.
पहिले अर्थातच डॉ. जगनाथ दीक्षित. काहीही खा, कितीही खा , फक्त दिवसातून दोनदाच खा तुमचा मधुमेह बरा होईल हा दावा तितका खरा नाही. अनेक मधुमेहतज्ञांनी त्यावर आक्षेप घेतले आहेत. मुळात दिवसातून दोनदाच खा हे अंमलात आणायला आणि तेही आयुष्यभर पाळायला अवघड आहे. मी स्वत: केले नाही, कारण मला जमणार नाही.
दुसऱ्या ऋजुता दिवेकर (यांना संशयाचा फायदा द्यायला हवा कारण त्या मधुमेह आटोक्यात आणण्याचा दावा करत नाहीत)- यांचा दिवसातून दर दोन तासांनी खाण्याचा सल्ला मला तरी पटत नाही, कारण मी सकाळी १ चमचा साखर घातलेला चहा जरी घेतला तरी साखर १०० वरून१८०-२०० इतकी जास्त होते आणि ती पुढे २-३ तास खाली येत नाही. दिवेकर बाईंचा सल्ला वजन कमी करायला ठीक आहे.
अमेरिकेतले डॉ. मार्क हैमन आणि नील बार्नार्ड - यांची अनेक व्याख्याने ऐकली आणि मला धक्का बसला. मांसाहार सोडा, शाकाहार करा, भाज्या, फळे, धान्ये खा वगैरे उपदेश करतात. हे बहुतेक भारतात जाणार नाहीत. मला अंतु बर्व्याच्या वाक्याची आठवण झाली "गांधी भारतभर फिरला, पण कोकणात नाही आला. कारण इतर लोकांना त्याच्या पंच्याचे कौतुक, इथे सगळेच पंचेवाले, कोण त्याचे कौतुक करणार?" तसे यांचे आहे.
किटो डाएट अर्थात ऍटकिन्सन डाएट - यामध्ये कर्बोदके अतिशय कमी प्रमाणात खातात. हा प्रकार फक्त मांसाहारी लोकांसाठीच आहे.
डॉ. बिस्वरून रॉयचौधरी यांचा फळांचा आहार - हाही मला पटत नाही.
डॉ. प्रमोद त्रिपाठी - भारतीय पद्धतीचा समतोल आहार म्हणता येईल असा आहे. ताटाचे चार भाग करून एका भागात सॅलड (कच्च्या भाज्या), अर्ध्या भागात शिजवलेल्या भाज्या, एका भागात डाळ आणि एका भागात धान्य (पोळी किंवा भाजी) ही पद्धत मी करून पाहिलेली आहे, चांगली आहे, मात्र अनुभवाने गहू आणि त्यापासूनचे पदार्थ चालत नाहीत असे लक्षात आल्याने त्या ऐवजी भात असा बदल करून हीच पद्धत चालवतो.
असो. मला सांगायचे ते सांगून झाले. शेवटचा मोलाचा सल्ला. सतत साखर मोजायचे यंत्र बसवून घ्या, आहारात बदल करून काय चालते काय नाही ते पाहून त्यानुसार आहार बदला. सर्वांसाठी एकच सल्ला नाही, कारण सर्वांची तब्येत एक नाही. पुलंच्या एका पुस्तकातला संवाद आहे.
एक शिकलेला तरूण आयुर्वेदिक वैद्यांना विचारतो "तुम्ही तुमच्या औषधांचे पेटंट का घेत नाही?" त्यावर वैद्य मार्मिक उत्तर देतात " त्यासाठी लोकांच्या तब्येती पेटंट आहेत का पण?"