माझे मधुमेहाचे अनुभव
मागील तीन भागांचा सारांश
२००४ मध्ये मधुमेहाचे निदान झाले, २००६ पासून उपचारला सुरूवात झाली. २००६-२०१७ पर्यंत मेटफॉर्मिन, ग्लिमेपिराईड आणि जानुविया या तीन औषधांच्या सहाय्याने आणि आहारात केवळ भात वर्ज्य करून एच बी ए -१ सी ७.५ इतका कमी ठेवला होता. २०१७ ते २०२१ मध्ये पोळी वर्ज्य करून त्याऐवजी डाळींच्या धिरड्यांचा प्रयोग केला तोही सुमारे ३ वर्षे चालला. मध्येच एकदा दात काढावे लागल्याने फक्त भात खाता यायचा, तरीही मधुमेह ताब्यात होता. २०२० च्या जून मध्ये डाळींची धिरडी बंद करून पोळी खायला सुरुवात केली, तरीही पुढचे एक वर्ष म्हणजे जून २०२१ पर्यंत एच बी ए -१ सी ७.५-८.० यामध्ये राहून परिस्थिती ताब्यात होती.
सप्टेंबर २०२१ पासून काय झाले हे मी शब्दात सांगत नाही, तर तुम्हाला ते खाली दिलेल्या तक्त्यावरून समजून येईल. केवळ या दोन वर्षांमध्ये जे काही झाले आणि जे खाली दिसते आहे त्यामुळेच ही लेखमाला लिहायला प्रवृत्त झालो, इतके याचे महत्त्व आहे.
| महिना | एच बी ए-१ सी |
| जून २०२१ | ७.८ |
| सप्टेंबर २०२१ | ८.८ |
| डिसेंबर २०२१ | ९.७ |
| मार्च २०२२ | ९.० |
| मे २०२२ | ९.४ |
| ऑगस्ट २०२२ | ९.९ |
| ऑक्टोबर २०२२ | ८.१ |
| मार्च २०२३ | ८.९ |
| मे २०२३ | ८.९ |
| जुलै २०२३ | ९.३ |
| ऑक्टोबर २०२३ | ९.६ |
वरील तक्त्यावरून एक गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ होते की सुमारे १७ वर्षे आटोक्यात ठेवलेला मधुमेह संपूर्णपणे हाताबाहेर गेला होता. आहार तोच पोळी-भाजीचा होता, ज्याने मधुमेह २००६-२०१७ असा आटोक्यात राहिला होता. आमच्या डॉ. कविता यांच्या सांगण्यावरून औषधे बदलून पाहिली. काहीही फरक पडला नाही. जानुविया बदलून, जार्डियन्स नावाचे औषध ३ महिने घेतले, त्याचे वैशिष्ट्य असे की त्याने जास्तीची साखर लघवीवाटे जाते. त्याने एच बी ए -१ सी वर फरक पडला नाहीच उलट कोलेस्टेरॉल एकदम ५०% वाढले, म्हणजे १६० वरून २३७. ते बंद केले आणि जी एल पी १ या प्रकाराची अनेक औषधे बाजारात आहेत त्यापैकी ट्रुलिसिटी आणि विक्टोझा अशा दोन औषधांचे प्रयोग प्रत्येकी ६ महिने करून पाहिले, काहीच फरक नाही.
१४ ऑक्टोबर २०२३ रोजी डॉ. कविता यांनी फोन करून सांगितले आता त्या माझ्यावर उपचार करणार नाहीत, मी आता मधुमेहतज्ञाकडे जावे, तेच पुढचे उपचार करतील. खरे तर यापुढची अवस्था म्हणजे इन्सुलिन टोचून घेण्याची असते. डॉक्टर आणि रोगी शक्यतो हे टाळायचा प्रयत्न करतात कारण खाणे आणि इन्सुलिनची मात्रा यांचा हिशोब बरोबर जुळवावा लागतो नाहीतर साखर एकदम कमी किंवा जास्त होण्याची शक्यता असते.
पुढे मधुमेहतज्ञ डॉ. स्मिता यांच्याकडे गेलो. त्यांनी सगळे पाहिल्यावर मला एकच पण अतिशय मोलाचा सल्ला दिला. आजकाल बोट टोचून रक्तातली साखर मोजणाऱ्या यंत्रा ऐवजी सतत साखर मोजणारे यंत्र निघाले आहे. त्यात एक चकती असते ती दंडावर चिकटवायची आणि भ्रमणध्वनीवर आपल्याला रक्तातली साखर नेमकी किती आहे हे सतत दिसत राहते. हे यंत्र तू लावून घे, तुझे तुलाच समजेल कशाने साखर वाढते आहे. हे यंत्र लावले, त्यातून दिवसभरात साखर कशी कमी जास्त होते ते समजायला लागले. जेवल्यावर पूर्वी २०० च्या आत राहणारी साखर आता ३०० पर्यंत जात होती. उपाशीपोटीची साखर १००-१२० ऐवजी १४०-१६० अशी जायला लागली होती. यंत्र लावूनही काही परिणाम होणार नाही अशीच लक्षणे दिसत होती.
आम्ही शनिवार- रविवार शक्यतो दक्षिण भारतीय उपाहारगृहात जेवायला जायचो आणि तिथे भात खायचो, एरवी घरी पोळी- भाजी. हळूहळू भात खाल्ला तर साखर तितकी वाढत नाही असे लक्षात आले. रोहिणीला म्हणालो आता भात खायचा प्रयोग करून बघू. रोजच्या रोज फक्त भात- भाजी- आमटी खायची सवय फक्त २०१९ मध्ये सहा महिने, जेव्हा दात काढले होते आणि इतर काहीच खाऊ शकत नव्हतो तेव्हाच होती. आता परत तेच सुरू केले आणि चमत्कार झाला. २०२४ फेब्रुवारीला एच बी ए -१ सी चक्क ६.९ आला. औषधात फक्त एकच बदल केला होता, जानुविया बंद केले होतेच त्याऐवजी मोंजारो नावाचे नवीन औषध सुरू केले होते. खरे तर हे आणि त्याच्यासारखेच परिणाम करणारे ओझेंपिक ही दोन्ही औषधे ही वजन कमी करण्यासाठी वापरली जातात. त्याने खाल्लेल्या अन्नाचे पचन हळू होते, भूक कमी होते आणि वजन कमी होते, परिणामी रक्तातली साखरही कमी होते. तेव्हापासून आजतागायत काय परिस्थिती आहे तेही खालील तक्त्यात दाखवले आहे. दोन्ही तक्त्यांमधला विरोधाभास जाणवण्याइतका स्पष्ट आहे.
| महिना | एच बी ए -१ सी |
| फेब्रुवारी २०२४ | ६.९ |
| मे २०२४ | ७.७ |
| सप्टेंबर २०२४ | ७.४ |
| डिसेंबर २०२४ | ७.९ |
| एप्रिल २०२५ | ७.५ |
| ऑगस्ट २०२५ | ७.७ |
| डिसेंबर २०२५ | ८.० |
| एप्रिल २०२६ | ७.९ |
अश्या प्रकारे सप्टेंबर २०२१ ते ऑक्टोबर २०२३ अशी वर्षे चाललेली काळरात्र संपली. गेली जवळपास दीड -दोन वर्षे मधुमेह आटोक्यात आहे. पण सतत साखर मोजणारे यंत्र लावल्याशिवाय मधुमेह आटोक्यात आला नसता. हे तंत्रज्ञान म्हणजे मधुमेहींसाठी वरदान आहे.
पुढे उपसंहाराचे एक दोन भाग करू, त्यामध्ये मधुमेह आटोक्यात आणण्यासाठी तज्ञ लोक आणि संस्था (उदा अमेरिकन डायबेटिक असोसियशन) जे निरनिराळे सल्ले देतात, विशेषत: जीवनशैली बदलासाठी, त्याबद्दल चर्चा करू.
विनायक