वानवा - शब्दाचा स्रोत काय?

ऋषीचे कूळ आणि नदीचे मूळ शोधू नये असे म्हणतात, पण एखाद्या भाषेत विशिष्ट शब्द कसा आला याचा शोध घेणे रंजक असते. मराठीतील बहुतेक शब्द तत्सम किंवा तद्भव (संस्कृतातून जसेच्या तसे किंवा थोड्याफार फरकाने आलेले) आहेत; पण काही शब्द थोड्या वेगळ्या प्रकाराने मराठीत समाविष्ट झाले आहेत.


तारांबळ हा शब्द मराठीत कसा आला, हे मला वाटते मी लोकसत्तातील एका लेखात काही वर्षांपूर्वी वाचल्याचे आठवते. "तदेव लग्नं सुदिनं तदेव, ताराबलं चंद्रबलं तदेव" हा श्लोक मंगलाष्टकांच्या नंतर म्हणतात (चू.भू.द्या.घ्या.) जर मुहुर्ताची वेळ टळुन चालली आहे, असे भटजींना वाटले, तर हा श्लोक ते घाईघाईत म्हणतात आणि ताराबलं चा उच्चार वेगळा होतो. या कारणामुळेच घाईगडबड उडाली की तारांबळ उडाली असे आपण म्हणतो.


हे इतक्या विस्ताराने सांगायचे कारण म्हणजे, याच मार्गाने अजून एक शब्द मराठीत आल्याची मला शक्यता वाटते आहे, आणि तो म्हणजे "वानवा"


खालील श्लोक पहा --


शतेषु जायते शूरः, सहस्त्रेषु च पण्डितः,


वक्ता दशसहस्त्रेषु, दाता भवति वा न वा॥


आता वानवा हा शब्द या श्लोकावरून मराठीत आला आहे, की न्यून - उणे - उणीव - वानवा असा या शब्दाचा संस्कृत ते मराठी असा प्रवास झाला आहे?