रोजनिशी- तिच्या रोजनिशीतले दिवस

रोजनिशी -आधीचे लेख


 रोजनिशी-तिच्या रोजनिशीतले दिवस


            कारकुनाच्या कार्यालयात मंदीचा अनेकांना फाटका बसला. नोकरीतून कायमची रजा मिळालेली त्याची एक सहकारी एका मोठ्या दुकानात कॅशियरचे काम करु लागली.  हे दिवस तिच्या रोजनिशीतले!


कारकुनाने लेखणी उचलली आणि लिहिण्यास सुरुवात केली.


             किती दिवस असे नोकरी शोधत बसायचे? पैसा संपत आला आहे. आपल्या शिक्षणाचा उपयोग होईल अशी नोकरी मिळेल असे वाटत नाही. इथेच राहायचे म्हणून शेवटी मिळेल ती नोकरी धरली. पण एवढ्या वर्षाचे संस्कार पुसले जात नाहीत. एवढे सगळे शिक्षण काय दुकानात उभे राहून लोकांचे सामान पिशवीत भरणे आणि त्यांना पावती देणे यासाठी केले का?


              तिने मनातले विचार बाजूला सारले आणि हसून समोरच्या गिऱ्हाईकाचे स्वागत केले. त्याची एकेक वस्तू किंमत स्कॅन करुन ती  पिशवीत भरू लागली. पिशवीत भरताना शीतकपाटातील वस्तू एका पिशवीत, प्लॅस्टिकच्या वस्तू एका पिशवीत, इतर सामान एका पिशवीत असे वर्गीकरण करणे सुरू होते.


             आजवर " ई हे काय? असले बिनडोकासारखे आपले तेच तेच काम सतत दिवसामागून दिवस करायचे?" हा प्रश्न तिच्या मनात अनेकदा स्वतःचे सामान भरून पावती देणाऱ्या कॅशियरला पाहून आला होता. तेव्हा लठ्ठ पगाराची नोकरी होती तिला! खरं आहे! स्वतःचे पोट भरले आहे मग असे प्रश्न मनात येणे साहजिकच आहे.


             आता तो काळ गेला होता. वाचनालयात, पाळणाघरात काम करणे हे पर्याय तिच्यासमोर होतेच. तिने काही तास वाचनालयात आणि काही तास दुकानात काम करायचे ठरवले. त्याशिवाय दोन वेळचे खळगी भरण्याचा दुसरा उपाय दिसेना.


           बरेच जण भारतात परत गेले. काही तिच्यासारखे आज ना उद्या मिळेल का म्हणून अमेरिकेतच थांबले. ती तरी एकटी होती. संसाराचा भार सांभाळत लोकांनी मिळेल ती नोकरी सुरू केली होती. ज्या कुटुंबात पुरुषाची नोकरी गेली आणि स्त्री काम करत होती, अशा पुरुषप्रधान संस्कृतीच्या अनुयायांचे प्रश्न आणखीच वेगळे...मोठ्या पगारावर पांढरपेशे काम करणे काय किंवा हे असे दुकानात चाकरी करणे काय? शेवटी आपण वेठबिगारच.


                       तिला तिच्या महाविद्यालयात अमेरिकेत उच्च शिक्षण घेत असलेले काही भारतीय विद्यार्थी आठवले. घरी पुरेसा पैसा नाही, इथे सवलत किंवा शिष्यवृत्ती नाही. अमेरिकेत ही सर्वसाधारण घटना आहे, इथे विद्यार्थी स्वतः कामे करून शिकतात. पण लाडाकोडात वाढलेला भारतीय विद्यार्थी? किंवा गरीब भारतीय विद्यार्थी? शिक्षणाची फी, पुस्तके आणि राहण्याचा खर्च कसा करायचा?काहींनी नुसते कर्ज काढले तर काही त्या जोडीला  महाविद्यालयाजवळच्या उपाहारगृहात पडेल ते काम करू लागले. काही जण गुजराथी बांधवांनी कृपा केली म्हणून त्यांच्याकडे उपाहारगृहात कामाला लागले. तर काही त्यांच्या हॉटेलात मिळेल ते काम करू लागले.


 'सुखाचा जीव कशाला दुःखात टाकता राहा भारतात' असे म्हटले तर सगळेच संपले. मनात विचार आला, 'इथे अशी कामे करणारे घरी भारतात किती जण खरे कामाचे स्वरूप सांगतात? किती आईवडील इतरांना आपला मुलगा मुलगी कोणते काम करतात ते खरे सांगतात?'


आज ती दुकानात काम करते याने तिच्या घरी खळबळ माजली होती. कोणतेही काम करण्यात कमीपणा नाही हे आपल्या कडे ठामपणे आपण कधी मान्य करणार?


        ज्यांना शिष्यवृत्ती मिळते त्यांना निदान शिक्षणाशी संबंधित कामे करता येतात. त्या मेहनतीने नुकसान होत नाही . पण किती वेळ? अशा विद्यार्थ्यांना आठवड्याला चाळीस तासाचा पगार देतात. प्रत्यक्षात बरेचदा त्यांना रोज २० तास आपलेच नोकर आहेत असे राबवले जाते.   त्यात संशोधन ,उत्तरपत्रिका तपासणे, मास्तरांचे प्रबंध नीट लिहून देणे, विद्यार्थ्यांकरता प्रश्नपत्रिकेच्या प्रती काढणे या कशाचाही समावेश असू शकतो. ही वस्तुस्थिती आहे.   प्रतिभावान विद्यार्थ्यांना असा वेळ गेला हे जाणवत नसेल कारण कदाचित कशानेच त्यांच्या अभ्यासावर परिणाम होत नाही. पण जरा "अबाऊ ऍवरेज" विद्यार्थी जर अशा कामात अडकला तर त्याचे अभ्यासाला लागणारे मेहनतीचे तास आणणार कुठून?

 मऊ दिसले की कोपराने खणणे ही वृत्ती जाणार नाही. असे करण्यात भारतीय आणि इतर आशियाई देशातले प्राध्यापक पुढे आहेत असे निरीक्षण आहे.  भारतातील लोकांना अमेरिकेतील उच्च शिक्षणाविषयी खरी परिस्थिती सुद्धा सांगणे किती जणांनी स्वीकारले आहे?आता संपर्काच्या विविध सोयी आहेत, माणसांमध्ये संवाद आहे. कदाचित स्थिती बरी असेल. पण दहा पंधरा वर्षापूर्वी काय होते?


विषय भारतीयांचा होता, मनातले विचार वेगाने धावू लागले.


           त्या गावात भारतीय सुद्धा बरेच होते. काही तिला ओळखत. ते त्या दुकानात आले तर एकतर तिला टाळत किंवा त्या काउंटरवर जाऊन तिला असे कर तसे कर असे चार शब्द सांगत. तिला लोकांच्या दयेची किंवा सहानुभूतीची गरज नव्हती. मदत तर ते करू शकतच नव्हते. मदत करण्याची परिस्थिती असली तरी तिला कसे करणार? ती काही त्यांची नातेवाईक नव्हती. नातेवाईक असती तर मदत केली असती असा तिचा गैरसमज होता. ती कोण? कुठली? जातपात सगळे मध्ये येणार... उत्तरेकडच्यांनी तिला दक्षिणी म्हणून डावलायचं आणि दाक्षिणात्यांनी उत्तरेकडची म्हणून. हाच अनुभव कितीदा घेणार?


                  साधारण सकाळच्या वेळी दुकानात ज्येष्ठ नागरिक खरेदीस येत. त्यातले एक आजी आजोबा दर बुधवारी येत. काठी टेकत टेकत सावकाश आपली खरेदी करत. बाकावर बसून कॉफी घेत. दुकानातील कर्मचाऱ्यांशी हसून खेळत बोलत. आपण आणलेले सवलतीचे कागद आणि बिलाची जुळवाजुळव करत. नाताळासाठी एकमेकांना काय भेटवस्तू द्यायची यावर आजी आजोबा विचार करत होते. अर्थात असे खास दिवस असले की दुकानात गर्दी वाढत असे.  व्हॅलेंटाइन डे, फादर्स डे, मदर्स डे, हॅलोवीन, ईस्टर असे विशेष दिवस असले की दुकानात त्याचे प्रतिबिंब दिसे.


              निरनिराळ्या धर्माची, वर्णाची आणि वेगवेगळ्या देशातली मंडळी एका ठिकाणी खरेदी करत तरी आपले 'स्टेटस' राखण्याचा त्यांचा प्रयत्न मात्र सारखाच होता. आई किंवा वडील आपल्या मुलाला आपण ही वस्तू किंवा या कंपनीची घेत नसतो असे चटकन सांगत. त्याच वेळी नेमकी तीच वस्तू घेण्यात आनंद वाटणाऱ्या रांगेत मागे उभ्या दुसऱ्या मुलाला का वाटत असेल बरे?अशी ही भेदभावाची तथाकथित उच्चभ्रूपणाची बीजे नकळत रोवली जातात.


          विषण्णतेने तिने सुस्कारा सोडला. भली मोठी रांग समोर होती. एकाचे सामान ती स्कॅन करू लागली. पिशवीत सामान भरले. तेवढ्यात पावती देणाऱ्या मशीनमधला कागद संपला. तिने सराईतपणे कागदाचे दुसरे रीळ घेतले आणि मशीनला जोडले. हे करेपर्यंत तीन ते चार मिनिटे गेली असावीत. लोकांच्या चेहऱ्यावर 'किती वेळ लागतो आहे?' असे भाव दिसत होते.


त्याचे सामान होते त्याने तर 'नेमके माझ्याच वेळेस असे व्हावे?' असे जाहीर बोलून दाखवले.


काउंटरच्या दुसऱ्या बाजूला असताना तिची प्रतिक्रिया सुद्धा अशीच व्हायची. पण आता? आणि समजा रीळ नीट लावता आले नाही, शाई संपली तर अधिक वेळ जाणार..  नाना प्रकारचे लोक त्यांचा राग आणि विनोदाची पद्धतही वेगळी. वारंवार अगदी बिनडोक वाटणारे काम माणसांना हाताळण्याचे,संयमाचे आणि प्रसंगावधानाचे आगळेच स्वरूप दाखवत होते. मनुष्यस्वभावाच्या अनेक छटा तिच्या मनावर उमटत होत्या.


              तिला एक गोजिरवाणा चिमुकला मुलगा आठवला. आपली नाताळाची खरेदी घेऊन तो काउंटरवर आला होता. त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडत होता. नाताळचा सण दीड महिन्यावर आला होता. दुकानात गर्दी तुडुंब होती. भारतात दसरा दिवाळीला असावी तशीच. चॉकलेट्स, भेटवस्तू, कपडे अशा विविध प्रकारच्या वस्तूंनी दुकाने भरली होती. वाण्याच्या दुकानात उधारीवर वस्तू देतात तशा सोयीचा फायदा घेणारे लोकही होते. तिच्या सहकाऱ्यांनी देखील खरेदी केली. दुकानात गर्दी खूप, काम जास्त तासाचे त्यामुळे पगारही जास्त.. ती आनंदात होती. माणसंचे विविध अनुभव तिचे जीवन समृद्ध करत होते.  अशा छोट्या गोष्टीतही एक आगळा आनंद तिला गवसला होता.......
                 
 कारकुनाने शांतपणे पेनाला टोपण लावले आणि वही बंद केली. .....