रोजनिशी -शेवटचे पान

                 दचकून कारकुनाला जाग आली. रात्रीचे दोन वाजले होते. खुर्चीवर अवघडलेले अंग त्याने हात पाय झटकून मोकळे केले. हातातल्या पानावर नजर फिरवली.....तारीख होती दहा वर्षांपूर्वीची!त्याने वाचायला सुरुवात केली.

               त्याचे पांढऱ्यावर चौकड्याचे सारे शर्ट तिने बाद केले. मोठ्या चष्माच्या फ्रेम जाऊन छोटी आली. खरे तिला लेन्सेस हवे होते. कसे सारे पडवडणार? एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा. अशी कितीशी खर्चाची सवय आहे?
 "कंपनीचे ओळखपत्र असे गळ्यात अडकवून मग खिशात काय लपवतोस!"
त्याला ओरडून सांगावेसे वाटले होते," मी एक कारकून!, दोन वेळच्या जेवणाकरता खर्डेघाशी करणारा. "पण शब्दच फुटेना.

"तुला मिशी मुळीच चांगली दिसत नाही.आजकाल ठेवत का कुणी मिशी? जरा डोळे उघडून पहात जा आजुबाजुला!"

सोळा सतरा वर्षे जी मिशी यावी म्हणून वाट पाहिली ती काय एका मुलीने काढून टाक हे ऐकण्यासाठी?आजकालच्या मुलींचे सारे काही अजबच आहे. त्याने सुस्कारा सोडला. प्रेम आंधळ असत.


त्याला नव्या अवतारात रूळायला वेळ लागला. तिच्याशी काही भेटीगाठी झाल्या. चोरुन भेटणे, चिडवाचिडवी सारे काही हवेहवेसे.   एक दिवस अगदी काही घडलेच नाही अशा थाटात तिने सांगून टाकले की तिचे लग्न ठरले आहे. मग हे सर्व कशासाठी?


बायकांच्या मनात काय आहे ते कुणाला कधी कळेल का? त्याचे मन आक्रंदत होते. 


नंतर रोजनिशीत लिहावे असे बरेच काही घडून गेले. सुखाची नेमकी व्याख्या काय? त्याने आपल्या मित्राबरोबर जाण्याचा निर्णय घेतला.


             चंद्रपूर जिल्ह्यातल्या एका छोट्या खेड्यात त्याचा पहिला मुक्काम.  भीषण दुष्काळ, गरिबी, अपुऱ्या आरोग्यसेवा अशा अनेक समस्या. आपल्याला ही शहरातली माणसे मदत करणार आहेत तेही काही मोबदला न घेता! गावकऱ्यांचा विश्वास बसेना. 
               त्याने गावातल्या तोडक्या मोडक्या शाळेत शिक्षक म्हणून काम करायचे ठरवले. दिवसभर पोटाची खळगी भरण्यामागे असणारे शाळेत मुलांना कसे पाठवणार?  पालकांचे मन वळवून प्रसंगी जमेल ती मदत करून त्याने शाळेत मुले गोळा केली.


                     शाळा तरी कशाची? चार भिंती आणि वर एक मोडकेतोडके छप्पर. त्याच्याबरोबर काम करणाऱ्यांनी शाळेची डागडुजी सुरु केली.  त्यांचा उत्साह पाहून गावातली काही मुले, मुली आणि बायका मदतीला आल्या.


           शाळेची जमीन सारवण्यासाठी मोठा शेणाचा ढीग केला होता. गावातली मुले सवयीने सारवत होती. कधी हा अनुभव नसणारे शहरी चार पावले मागे हटले. काही वेळाने त्यांच्यातलीच एक मुलगी पुढे झाली. वाकून तिने गावकऱ्यांबरोबर जमीन सारवायला सुरुवात केली. तिच्याबरोबर आणखी हात पुढे सरसावले.


येणारा दिवस रोज नवे अनुभव देत होता. त्याच्यासह सारे स्वावलंबनाचे धडे गिरवत होते. लहान मुलांना स्वतःच्या वाटचे चार घास त्याने दिले होते. कमीत कमी गरजात जगण्याची नवी दिशा त्याला मिळाली होती. सिगरेट परवणारी नव्हती. सिगरेट जाऊन त्याने बिड्या ओढायला सुरुवात केली. महिन्या दोन महिन्यात त्याचीही गरज पडेना. ....
                             गाव बदलले, सेवेचे स्वरूप बदलले. दिनक्रम मात्र बराचसा तसाच होता. एकजुटीने काम करण्याचा आनंद समजला होता.  मनाचा निश्चय होताच पण तो खंबीर अशा अनेक गाण्यांमुळे होत होता. 


 दिव्य ध्येय की ओर तपस्वी
जीवनभर अविचल चलता है
जीवनभर अविचल चलता है
सजधजकर आवे आकर्षण
पग पगपर झुमते प्रलोभन
होकर सबसे विमुख बटोही
पथपर संभल संभल पडता है....


(सर्व गाणे इथे ऐकता येईल- दिव्य ध्येय की ओर)
 


                    पूर, दंगली, अनावृष्टी कारण कोणतेही असो. धावून मदतीला जाणे एवढेच त्याच्या सारख्या अनेकांचे व्रत होते. जीवन होते. नात्यागोत्याशिवाय कित्येकाना मदत करणारे अनेक जण अनेक ठिकाणी एकत्रित झाले होते. पण कोणत्याही पाशात न अडकता त्यांचे कार्य अविरत सुरु होते.  काही जण काही वर्षे , दहा वर्ष, वीस वर्ष हे कार्य करत होते. कित्येक जण जमेल तशी मदत नंतरही करत होते. पण काही त्याच्यासारखे आजन्म ह्या ध्येयाला वाहून घेतलेले!! आयुष्यात काही साध्य झाल्याचे समाधान त्याच्या मुखावर विलसत होते.


       बापरे, सकाळ होत आली आहे, विवेक साठी द्यायचा लेख पूर्ण करायला हवा. त्याने हातातल्या कागदाची घडी केली. शेजारी महत्त्वाच्या नोंदी करण्याची वही होती. त्यात त्याने जपून तो कागद ठेवला- एक आठवण म्हणून... यापुढे मन मोकळे करायला कदाचित रोजनिशीची  गरज नव्हती.   


बापरे, सकाळ होत आली आहे, विवेक साठी द्यायचा लेख पूर्ण करायला हवा.