रोजनिशीची सुरुवात

सुरुवात

                 लिहून पूर्ण झाल्यावर त्याने रोजनिशीचे ते पान फाडले आणि लायटरने शांतपणे जाळून टाकले. खूप दिवसांचे मनात होते. रोजनिशी लिहायला हवी. प्रत्येक वेळी एक नवा बहाणा करून त्याने रोजनिशीला टाळले होते.  आज मनातले द्वंद्व संपवून त्याने सुरुवात तरी केली होती. 
               तयार होऊन अमृततूल्य मध्ये चहा घ्यावा आणि दिवसाचा श्रीगणेशा करावा.  मळक्या कपड्यातील पोऱ्याने ग्लासभर पाणी आणून दिले. गरम वाफाळणारे द्र्व्य चहा म्हणून त्याने घशाखाली ओतले. हातातल्या वर्तमानपत्राकडे तो नजर टाकू लागला. चार चित्र दिसताच पोऱ्याने मान वळवून त्यात डोके घालायला सुरुवात केली. शाळा सोडली, इथे काम करतो हे पोऱ्याचे उत्तर ऐकले. त्याने एक सुस्कारा सोडला. बिलातले सुटे पैसे तिथेच ठेवले.  कंपनीची बस येते त्या बसस्टॉपकडे जायला सुरुवात केली.
                  हा दिवस काही वेगळा होता असे नाही. फक्त रोजनिशीच्या पानावर येण्याचे भाग्य त्याला मिळाले होते. मित्रांच्या गप्पा, नेहमीच्या मिटिंग्स सगळे वेळापत्रकात असल्याप्रमाणे. तेच लांबलचक कोडींग,कंटाळवाणे टेस्टिंग आणि चुकांचा छडा लावणे. सारे सुरळीतपणे सुरु होते. दहादा त्याने याहू, हॉटमेल , जीमेल सगळीकडे टिचक्या मारल्या होत्या. सकाळ, म.टा, न्यूयॉर्क टाईम्स,लोकसत्ता... झाडून सगळे इंग्लिश व मराठी पेपर पालथे घातले होते. सगळ्या मराठी साईट्स नजरेखालून घातल्या होत्या. हळुहळू सात वाजत आले .बरेचसे स‌ंसारी सह्कारी घरी जाऊ लागले होते. काय करायचे? नेट सर्फ करायचे, नाटक सिनेमाला जायचे, पुस्तके वाचत बसायचे की एखाद्या हॉटेलात मित्रांच्या टोळक्यात बसून चेष्टामस्करी करायची?आयुष्यात काही नवीन घडत नव्हत आणि एवढ्यात काही बदलण्याची चिन्हे देखील नव्हती. रत्नागिरीला परत जावे असे कितीदा मनात येते. पण त्यात काही साध्य होणार नाही या
अशाच विचारात एक बा.भ. बोरकरांची कविता झरझर रोजनिशीच्या पानावर लिहू लागला.

खूप या वाड्यास दारेः एक याया कैक जाया,
दो घडी येतात तेही लावुनी जातात माया
पाखरांची मुक्त मांदी गात ये आल्हाद-नांदी,
अंगणी तालात डोले एक न्हाती शुभ्र फांदी;
गोठणीसाठी गुरांची सावलीशी गर्द दाटीः
कोण मायेने कुणाशी पाठ घाशी, अंग चाटी;
पंढरीचा पांथ दारी गोड छेडी एकतारी
साधते त्याच्या अभंगे बैसल्या ठायीच वारी;
कावळा सांगून जातो पाहुणा येणार आहे,
त्यामुळे घासात माझ्या अमृताची धार वाहे;
आणखी रात्री ,पहाटे चांदणे शेजेस येते
अन फुली वेढून माते स्वप्निच्या राज्यात नेते;
आप्त सारे भेटती जे इथे वस्तीस गेले
सांगतो मी त्यास किस्से पाहिलेले, ऐकिलेले
मी खरा तेथील वासीः हा न वाडा, ही सराई
पाहुणा येथे जरी मी जायची माते न घाई.

                  मित्रांना काम आहे असे सांगून आज त्याने गर्दीतला मूक प्रेक्षक व्हायचे ठरवले. शिवाजीनगर पासून तो चालू लागला. प्रदूषण, गर्दी, विस्कळीत वाहतुक. सगळे नेहमीचेच. मॉडर्न कॅफे, पांचाली, बालगंधर्व, असे करत जंगलीमहाराज रोडपासून तो चितळ्यांच्या दुकानासमोर डेक्कन पर्यंत चालून गेला. मनात दिवसभरांच्या घटना उलगडत होत्या आणि डोळे गर्दीत जाता येतानाचे अनुभव साठवत होते. जोडीने फिरणारी मुले मुली, त्यांचे ग्रुप्स,त्यांच्या गप्पा, चिडवाचिडवी, मनधरणी तो साक्षीदार होऊन ऐकत होता. सेलफोनवर येणारे एस.एम.एस, मेलमध्ये येणारे चुटके,निनावी कविता, चित्रे आणि आजुबाजुचा कोलाहल....त्याच्या डोक्यात एक तिडीक उठली. "काही बदल नाही, सगळे तसेच आहे माझ्या आयुष्यात." आणि स्वतःवरच्या रागाने मनात विचारांचा ज्वालामुखी भडकला होता. त्या नादात एक सुंदरी शेजारून गेली तिचे ओझरते दर्शन त्याला मिळाले होते. 'वैशालीत' नेहमीच्या जागेवर बसून त्याने जेवण संपवले. किती हॉटेलस, तीच चव, तीच इडली, तोच डोसा आणि चटणी, आणि तशीच जेवणाची थाळी. खाऊन वीट आला होता तरी दुसरा मार्ग नव्हता. लिहीता लिहीता थांबून त्याने मोठा पॉज घेतला. आता आणखी काय राहीले आहे?दिवसभरात वाचलेल्यापैकी जे आठवत होते ते त्याने खरडायला सुरुवात केली.


               ' साऱ्या प्राणीमात्रांचे कल्याण होवो' असे पसायदान मागण्यासारखे त्याचे मन मोठे नव्हते. तरी त्याने पानांवरील ओव्यांवरून नजर फिरवली. सुखदुःखाच्या भ्रामक कल्पनात मन का रमते ह्याचे उत्तर तो शोधत होता.  एकही मेघ नसताना त्याने मन दाटून यावे?उत्तरे देण्यात तो भराभर कागदावर खरडू लागला. ह्या मौनातच तो बोलत होता.

                        बर्लिनकडे आगेकूच. काय बदल झाला आहे? वाचताना महायुद्धाचा इतिहास त्याच्या डोळ्यांसमोर होता. शाळेत इतिहासात  वाचलेले बारकावे आठवण्याचा निष्फळ प्रयत्न त्याने केला. हिटलर व नाझींच्या आक्रमणांचा, त्याच्या युद्धनीतिचा, क्रृरतेचा आलेख त्याच्या डोळ्यासमोर जीवंत झाला. ओढवलेल्या विनाशाच्या वर्णनाने त्याच्या अंगावर शहारा आला. दोन्ही महायुद्धांचा तत्कालीन जगावर झालेला परिणाम, जीवीत व वित्तहानी याचा हिशोब...आपल ज्ञान तोकडे आहे या जाणीवेने त्याने गुगल सर्च इंजीनचा आधार घेतला.
                     राजकारण, नेते, त्याच्यांवर रकानेच्या रकाने येणार. सामजिक जीवनाचे चित्रण वाचायलाच हवे.  मराठी व्याकरण, मराठी शब्द हवे आहेत. सगळे वाचल्यासारखे वाटते. पण भरवसा कशाचाच नाही. 
                          पाकिटातले पैसे संपले आहेत. जवळच्या एटीएम कडे धाव घेण्याची नितांत गरज आहे. पण आड्यात असेल तर पोहऱ्यात येईल ना?जमाखर्चाचे त्याचे वैर काही नवीन नव्हते.
                          स्वतःचा उल्लेख कसा करायचा?सांगू बॉसला की मला ते काम हवे आहे. बदल हवा आहे. आत्मविश्वास ओसंडून वाहतो आहे.  रत्नागिरी नाही. मग इथे काय आणि परदेश काय?माझे निर्णय मी घेणार आहे. माझे स्वातंत्र्य गमावता कामा नये. नातीगोती आपुलकीच्या गोष्टींनी पायात बेड्या पडताहेत.आई वडिलांचे विचार माझ्या वेगाने कधी धावणारच नाहीत. माझ्या भल्यातले त्यांचे भले ते समजावून का घेत नाहीत?मानवी स्वभावाला औषध नाही. रात्री ११ च्या सुमारास तो फ्लॅटमध्ये आला.तास दीड तासानंतरही त्याच्या एकही रुममेटचा पत्ता नव्हता. त्याला जाणवले तो मनानेच थकला आहे.  त्याने शांतपणे ते लिहीलेले पान टरकावले आणि लायटरसमोर धरले.
२२/६/०५