रोजनिशी -नवा दिवस

नवा दिवस

          लिहून पूर्ण झाल्यावर त्याने रोजनिशीचे ते पान फाडले आणि शांतपणे जाळून टाकले. आज तरी नियम पाळता आला आहे. कोणतेही कार्य करायला सातत्य दे. तीच वर्दळ, तोच रस्ता, त्याच वाटा. त्याच माणसांच्या रांगा, तोच गर्दीतला अबोल क्षण. ऑफिसातली कामे, सहकाऱ्यांच्या गप्पा. सगळे नेहमीसारखे.  भुकेने कसावीस झाल्यावर पुढे आले ते खाल्लेले चार घास. नेहमीप्रमाणे त्याच वळणावर रोज त्याचा प्रवास. त्याच्या आणि लोकांच्या स्वतःची फुशारकी आणि मोठेपणा सांगणाऱ्या गप्पा. सारे या 'मी', 'माझे' या भोवती फिरणारे. या तर वृथा कल्पना. बालकवींच्या ओळी चटकन आठवल्या. कागदावर तो ती कविता लिहू लागला.

अनंत तारा नक्षत्रे ही अनंत या गगनात
अनंत दीप्ती, अनंत वसुधा, हे शशिसूर्य अनंत.
वरती खाली सर्व साठले वातावरण अनंत,
माप कशाचे, कुणा मोजिता, सर्व अनंत अनंत.
कितेक मानव झटती, करिती हाडाचेही पाणी,
अनंत वसुधा आजवरी हो परी मोजली कोणी!
म्हणोत कोणी 'आम्ही गणिला हा ग्रह- हा तारा,'
परंतु सांगा कुणी मोजिला हा सगळाच पसारा?
विशाल वरती गगन नव्हे, हे विश्वाचे कोठार,
उदात्ततेचा सागर हा, चिच्छांतीचा विस्तार.
कुणी मोजिला, कुणास त्याची लांबीरूंदी ठावी?
फार कशाला दिग्वनिंताची तरी कुणी सांगावी?
अनंत सारे विश्व जाहले अनंतात या लीन,
क्षुद्र मानवा, सांग कशाचा बाळगिसी अभिमान?
तव वैभव हे तुझे धनी ही, हे अत्युच्च महाल,
जातिल का गगनास भेदूनि? अनंत का होतील?
तुझ्या कीर्तिचे माप गड्या का काळाला मोजील!
ज्ञान तुझे तू म्हणशी 'जाइल', कोठवरी जाईल?
'मी' 'माझे' या वृथा कल्पना, तू कोणाचा कोण?
कितेक गेले मी मी म्हणता या चक्री चिरडून.

                 आयुष्यात जगण्यासारखे असते तरी काय?जगायचे कुणासाठी? कशासाठी?स्वतःसाठी?लोकांसाठी? नावासाठी? सुखे मिरवायला का दुःखाची नशा कुरवाळायला?प्रश्न -- असेच अनुत्तरित. त्याने मनोभावे परमेश्वराला प्रार्थना केली. जीवनात दुःखेच जास्त आहेत का माझा चष्माच तसा आहे? जीवघेण्या स्पर्धा आहेत, मागे राहू? पळून जाऊ? आई बाबा घरी आहेत. शेती आहे. शेजारच्या बर्वे काकांनी अनघासाठी तीन चार वेळा  विचारून पाहिले आहे. रत्नागिरीची मुलगी... तिला इथे आवडले नाही तर पुन्हा परत सुद्धा जावे लागेल. नाही. ते शक्य नाही. आता इथेच राहीन. धडपड करेन.  सुख दुःखाचा आलेख किती सजीव होतो आहे. दिवसभर जे वाचले, त्याचा आढावा घ्यायला त्याने सुरुवात केली.


          विचारातला विस्कळीतपणा घालवून कागदावर लिहिण्याचा तो प्रयत्न करु लागला. हार -जीत यात कसा विरंगुळा शोधावा? विनोदाचा शिडकावा हवाच. सहकाऱ्याने पाठवलेले एक व्यंगचित्र डोळ्यासमोर उभे राहीले.  स्त्री पुरूष- संसाराच्या गाड्याची दोन चाके. आज साऱ्या व्याख्याच बदलताहेत. स्वकेंद्रित व्यक्तींचे तोंडदेखले बोलणे. व्यक्तिनुरुप काळानुसार अपेक्षा वेगळ्या. एक तरी व्यक्ती मला समजून घेईल का?


                     त्याच्या डोळ्यासमोर 'ती' उभी राहिली. त्याच ऑफिसात,त्याच्या मित्राच्या ग्रुपमध्ये काम करणारी. किंचित सावळीशी, अपऱ्या नाकाची आणि ओठ विलग न करता हसणारी... एक दोनदाच तो तिच्याशी बोलला होता. मित्राला तिची माहिती विचारल्यावर त्याने डोक्याला हात मारत विचारले होते, 'बाकी मुली दिसत नाहीत का तुला?हिच्यात काय पाहिलेस?'
काय पाहिले ते त्याला सांगता आले नाही .पण काहीतरी जाणवले हे नक्की. जाता येता तिच्याकडे पाहून तो ओळखीचे स्मित करायचा, कधी ती प्रतिसाद द्यायची...तिच्यापेक्षा तोच हरकायचा.

                  कदाचित 'ती' होकारही देईल. पुढे काय? लग्न होईल, एखादे मूल. सकाळी ११ ते ५ च्या चक्रातून सुटका नाहीच. अपेक्षा.... तिच्या, माझ्या ,आईवडिलांच्या, ऑफिसातल्या साहेबाच्या.. मुलाच्या..पुन्हा याच जीवनाच्या रहाटगाडग्याला मुलाला जुंपायचे. पुन्हा 'जे मला मिळाले नाही ते तुला मिळो' असे त्याला आशीर्वाद द्यायचे?ह्या चक्रातून विरंगुळ्याकरता मग नक्की करायचे तरी काय?त्यातही नाविन्य नाही.


                     बाबा म्हणायचे,'रड तू. सारखा रड. जे मिळाले नाही तेच पहाणार आहेस का? जे आहे त्याचा आनंद कधी घेणार आहेस?' काल मन्याचे (मनोजचे) ईमेल आले होते, लग्नाचे निमंत्रण होते. आता राहीले कोण? मी, पप्या आणि मिल्या. दोघे घेतील त्यांचे पाहून. माझे काय? त्याने सिगरेटचे पाकीट उघडले. संपणाऱ्या सिगरेटसारखे माझे आयुष्य असेच राख होईल. धुरात धूर कधी मिसळेल कुणाला पत्ता देखील लागायचा नाही.


संपला आजचा दिवस! असे म्हणून त्याने पेन बाजूला ठेवले. तेवढ्यात त्याला पुलाच्या आडोशाला भाकऱ्या थापणारी ती स्त्री आठवली. तिला दोन्ही हाताचे पंजे नव्हते. अंगावर पुरेसे कपडे नव्हते. किती दिवसात अंगाला साधे पाणी सुद्धा लागले नसावे, साबण तर राहू द्या. रहायला घर नव्हते. पुलाच्या आडोशाला ,एक मेणकापडाच्या आणि कापडांच्या आधारे तयार केलेला तंबू. तिने चार काटक्या पेटवल्या होत्या. सराईतपणे थोट्या हातांनी तिने पीठ भिजवले. एखादी जादू पाहावी तसे तो मंत्रमुग्ध होऊन पहात होता. एका पालथ्या थाळीवर तिने भाकरी थापायला सुरुवात केली. दोन्ही पंजे, हाताची बोटे नसताना ती स्त्री आनंदाने भाकरी करत होती. 'आज जेवायला मिळणार' हा आनंद तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.


      दारिद्र्याचे यापेक्षा दुसरे रूप कोणते?  हीच गरीबी. डिस्कवरी, सीएनएन, बीबीसी सगळ्या चॅनेलच्या पत्रकारांनी अगदी भरभरून 'दारिद्र्यरेषेखालचा भारत' या मथळ्याखाली नोंद घ्यावी असेच ते दृष्य होते.  त्या स्त्रीला याची जाणीवही नव्हती की भाकरी थापतांना तिने दाखवलेल्या कौशल्याला तोड नाही.  कागदावर या ओळी लिहिल्यावर त्यालाच त्याची लाज वाटली. हातीपायी धडधाकट असून आपलेच खोटे दुःख कुरवाळत आपण किती दिवस जगणार?आपण आनंदाने जगावे असेच सारे आहे, काय करायचे या प्रश्नाचे उत्तर सापडले होते. दुसऱ्यांना सर्वपरीने मदत करण्यात पाप कोणते?लहानपणी दारावर आलेल्या याचकाला रिकाम्या हाताने न पाठवणारा मी आता किती स्वकेंद्रित झालो आहे. का आखडता घेतो हात? देण्यासाठी झटायलाच हवे. कदाचित सुरुवातीला परतफेडीच्या अपेक्षा असतील. पण ज्यांना परत करता येणार नाही अशांना मदत केली तर अपेक्षा नाही. मग दुःख कसले?किंबहुना जो भुकेला आहे त्याला जेवणाची गरज आहे.
         त्याने पान फाडले,वही बंद करून तो शांतपणे झोपायची तयारी करू लागला. त्याच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली होती.