फोडणीचा भात - न्याहरी

  • रात्री उरलेला भांडभर (१लि.दुधाचे) भात.
  • ३ ते ४ मध्यम आकाराचे कांदे, एक मोठा गड्डा लसूण.
  • ४ हिरव्या मिरच्या, छोटी वाटी चिरलेली कोथंबीर.
  • अर्धी वाटी तेल व फोडणीचे साहित्य, कढीपत्ता
  • चवीला गोडा मसाला, थोडसं आले.
  • १ बटाटा किंवा मध्यम काळे रंगाचे वांगे
१५ मिनिटे
४ जणांसाठी

तयारी -

कांदे उभे पातळ चिरून घेणे. लसूण सोलून हलक्या हाताने ठेचणे. आले छोट्या किसणीने किसून घेणे. मिरच्यांचे मोठे तुकडे करणे.

भात एका परातीत पसरून त्यावर थोडी हळद, तिखट व चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित कालवून घेणे. कालवताना हाताला तेल लावावे. 

कृती-

कढईत तेल गरम करायला ठेवणे. तेल कडकडीत तापल्यावर त्यात मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता टाकून फोडणी देणे. त्यावर कांदा, लसूण व आले टाकून कांदा लाल होईपर्यंत परतणे. परतल्यावर मग गोडा मसाला व मिरचीचे तुकडे टाकणे.  

(काळे वांगे टाकायचे असल्यास, वांग्याच्या छोट्या-मध्यम फोडी करून टाकणे व फोडी तुटणार नाहीत ही काळजी घेऊन परतणे. बटाटा टाकायचा असल्यास बटाट्याच्या पातळ काचऱ्या करून टाकणे - शिजण्यासाठी वर झाकण ठेवून मंद आचेवर शिजवणे) 

ह्यांत भात व त्यावर कोथंबीर टाकून व्यवस्थित परतणे. पूर्णं परतला गेल्यावर - परत झाकण ठेवून पाच मिनिटे मंद आचेवर ठेवणे.

गरम गरम वाढताना फ्रीजमधल्या थंड दह्याबरोबर द्यावा.

-भात नेहमी मोकळा व शिळाच छान लागतो. ताज्या भाताची हवी तशी चव येत नाही. सुटा भात शिजवताना पाण्याचा हबका मारून हवा तसा मऊ करता येईल.

-वांगी किंवा बटाटे नाही टाकले तरी चालतात. कांदा,वांगी किंवा बटाटे हे भाताची चव व मात्रा वाढवण्यासाठी आहेत. आपल्या गरजे व चवीनुसार कमी जास्त करता येते.

-लसूण जेव्हढा जास्त तेव्हढी ह्या भाताची चव छान लागते. लसूण ठेचताना बडगी (लाकडी जाड बुडाचा पसरट खल) व ठेचणी (लाकडी बत्ता) असल्यास उत्तम.

आई.