इमले

भूकंपग्रस्त होण्याचा अनुभव बघीन म्हणतो

स्वप्नांचे इमले थोडे मीही रचीन म्हणतो



वाया गेल्या वर्षांच्या नोंदी मनात भरल्या

फुरसद झाली की त्यावर मी हळहळीन म्हणतो



अडखळत्या पायांनी मी वणवण किती करावी

आकांक्षांच्या वारूवर स्वारी करीन म्हणतो



मोहांना टाळत बसलो होतो जरी गुदस्ता

मी यंदाच्या हंगामी थोडा चळीन म्हणतो



वय मंतरलेले असता यावी जखीण कोणी

आशेवर वश होण्याच्या आता जगीन म्हणतो



वळणावळणावर आहे येथे मिलिंद मोका

ध्येयाचे नंतर पाहू, मी भरकटीन म्हणतो