शब्द

दो घडीच्या जीवनीही पाकळ्यांना चुंबिताना


मी दवाला पाहिले आहे तृणांशी झोंबताना




सूर्य अव्हेरून बसले जे तमाचे पाठराखे



पाहिले मी काजव्यांशी सूत त्यांना साधताना




ग्रहण नाही, अवस नाही, चंद्र पाहावा कसा पण



कुंतलांचा रुष्ट पडदा पौर्णिमेला ग्रासताना


फार नव्हते मागणे अन् तोषली होतीस तूही

लाजलो, संकोचलो का हात सखये मागताना


आजच्यासाठी जगूया, कालचा इतिहास झाला

अन् उद्याची काळजी का सौख्यमदिरा झोकताना


मी कशी शब्दात सांगावी कहाणी मीलनाची

ओठ होते गुंतलेले रात्र सारी जागताना


घेतल्या शपथा किती तू संपवाया हा दुरावा

जन्म जाईल भृंग आता शब्द सारे पाळताना