उगा स्पंदनाने जरासे चुकावे

उगा स्पंदनाने जरासे चुकावे,
नि लाजून त्या पापण्यांनी झुकावे.


कळ्यांनो, तिलाही पुरेसे खुलू दे,
जरा वेळ सोडा तुम्ही बाजु कावे.


तिला जिंकण्या ही निघालीत स्वप्ने,
अता डाव ते आसवांचे हुकावे.


मला पाहिजे रे पुन्हा तीच संधी,
सुदैवा, किती मी तुला रे मुकावे?


बिदागी शिशीरा विचारून घ्यावी,
कशाला फुलांनी फुकटचे सुकावे?