मी,नोकरी,वि.म. आणि औ.म.(१)

गेल्या चार वर्षात काही नोकरीविषयक मुलाखती दिल्या. पहिल्या काही मुलाखतींनंतर प्रत्येक मुलाखतीच्या वेळी माझ्या विनोदी मनाचं औपचारीक मनाबरोबर द्वंद्व चालू असतं. आपण जागा वाचवण्यासाठी यापुढे या दोन मनांचा उल्लेख 'वि.म.' आणि औ.म. करुयात. हां, तर अशीच एक मुलाखत आता सुरु होणार आहे.


मुलाखत्याः या. या.बसा.
(मी आत येते.खुर्ची सरकवून बसताना टेबलावरचे सुशोभित कापड ओढले जाऊन काही कागद खाली पडतात.मुलाखत्या आणि मी या संयुक्त प्रयत्नांनी टेबलावरील कापड व कागद परत मूळ जागी स्थानापन्न होतात.)
वि.मः 'कुठ्ठे म्हणून न्यायची सोय नाही. केलीस ना इथे पण पाडापाडी? घरी कप आणि बरण्या फोडतेस ते पुरे नाही का झालं?'
मुलाखत्याः 'हं, मला तुमच्याबद्दल सांगा.'
औ.मः 'मी अनु. इत्यादी.इ.इ.इ....'
वि.मः 'अरे, तुझ्यासमोर कागद आहे ना? मग वाच ना.कशाला बोलायला लावून तुझा आणि माझा वेळ घालवतोस?'
मुलाखत्याः 'बरं, मला सांगा, तुम्ही ही आताची नोकरी का बदलू इच्छीता?'
औ.मः 'सध्याची नोकरी आणि लोक खूप चांगले आहेत, पण मला  आणखी नवनविन आव्हानात्मक कामे करण्याची संधी हवी.'
वि.मः 'त्याचं काय झालं, जुन्या नोकरीत चांगला पगार मिळवणं हे आव्हानात्मक काम आहे.या बढतीला पण खिरापत मिळाल्यावर म्हटलं जरा इकडेतिकडे गळ टाकायला घ्यावे.'
मुलाखत्याः 'आमच्याकडची नोकरी लगेच सोडणार नाही कशावरुन?''
औ.मः 'मला चांगले काम करायला मिळाल्यास मला जास्तीत जास्त काळ तुमच्या इथे घालवायला आवडेल.नोकऱ्या सारख्या बदलत राहणे हा माझाही स्वभाव नाही.'
वि.मः 'अरे मनुष्या, जरी कोणी तुमच्याकडची नोकरी मिळवून ती एका दिवसात सोडणार असलं तरी हा प्रश्न विचारुन त्याचे खरे उत्तर मिळणार आहे का?'
मुलाखत्याः 'पुढच्या पाच वर्षात तुम्ही स्वतःला कुठे पाहता?'
औ.मः 'पुढच्या पाच वर्षात मी स्वतःला आपले ज्ञान वाढवून एका गटाचे नेतृत्व करताना आणि कचेरीच्या हिताच्या दृष्टीने नविन नविन योजना आखताना पाहते.इ.इ..'
वि.मः 'अभ्यासाशी संबंधित प्रश्न केव्हा विचारणार आहेस?आता हे प्रश्न थांबवले नाहीस तर मी पुढच्या पाच मिनीटात स्वतःला इथून बाहेर पाहिन हं!'
(तितक्यात चहा येतो. मुलाखत्या चहा पितो. मी जरा इकडेतिकडे पाहून कचेरीची ऐपत आणि पगाराचा भावी आकडा यांचा अंदाज घेते.मुलाखत्या अधूनमधून चष्म्याखालून पाहत असतो.)


        (यानंतरः  भाग दोन.)