मी,नोकरी,वि.म. आणि औ.म.(२)

मुलाखत्याः 'हं,तुम्हाला सध्याच्या नोकरीत किती पगार मिळतो?'
औ.मः 'सर्व सुविधा धरुन .. लाख प्रती वर्ष इ.इ.इ..'
वि.मः 'असे धोतराच्या निरीला हात घालणारे प्रश्न काय विचारतोस सायबा?चांगला पगार असता तर उगाच का अर्धी रजा घेऊन तुझ्या मुलाखतीला आले असते?'
मुलाखत्याः 'तुमची किती पगाराची अपेक्षा आहे?'
औ.मः 'पैशापेक्षा मी अव्हानात्मक कामाला जास्त महत्व देते. पण माझा अनुभव आणि ज्ञान यावरुन .. लाख प्रतीवर्ष अपेक्षित आहेत. इ.इ.इ...'
वि.मः 'काय साहेब असले प्रश्न विचारुन गरिबाला धर्मसंकटात टाकता?जास्त सांगितले तर तुम्ही माझ्या अनुभवावर बोट ठेऊन आम्ही देतो ते कसे योग्य हे पटवत बसाल.कमी सांगितले तर तुम्ही जे देणार होतात ते बदलून कमी पैशात सौदा पटवणार..'
मुलाखत्याः 'आमच्या कचेरीत नोकरी करावी असे तुम्हाला का वाटते? '
औ.मः 'मला तुमच्या कचेरीत केले जाणारे काम आव्हानात्मक वाटते इ.इ.इ...'
वि.मः 'त्याचं काय आहे, आज अर्ध्या दिवसाची सुट्टी घेतलीच आहे तर हातासरशी ठिकाणं जवळ असलेल्या २ मुलाखती देऊन टाकाव्यात म्हणून आले रे तुझ्याकडे.आणि तसंही सोनी वर्ल्डच्या दुकानात कॅमेरा पण दुरुस्तीला टाकायचा होता कोपऱ्यावर.'
मुलाखत्याः 'तुमचा नवरा पुण्यातली नोकरी बदलून बंगलोरला गेला तर?'
औ.मः 'तसे होणार नाही. पुणे ही आमची कर्मभूमी आहे इ.इ.इ...'
वि.मः 'आत्याबाईला मिशा असत्या तर तिला काका म्हटले असते..अशा टाईपाचे अजून किती प्रश्न विचारणार आहेस रे बाबा?तू आणि तुझी कचेरी तरी आजन्म/आमरण पुण्यात राहणार आहे का? गीतेत म्हटलंच आहे ,मानवी जीवन क्षणभंगुर आहे..एक ब्रह्म हे सत्य आहे.. बाकी सर्व नोकरी , ठिकाण, नवरा इ.इ. माया आहे(अरे तू तो सेंटी और फिलो हो गई रे अनु!)'
मुलाखत्याः 'किती दिवसात आमच्या कचेरीत येणार?'
औ.मः '१ महिना'
वि.मः 'माझ्या वहिनीची मावसभावजय चिंगीचं लग्न आणि यांच्या मावशीच्या आतेबहिणीच्या सुनेची मंगळागौर झाल्यावर!!'
मुलाखत्याः 'पण आम्हाला तर उद्यापासून येणारं माणूस पाहिजे आहे!'
औ.मः 'मला सध्याचं काम आवरुन यायला १ महिना लागेलच तरी मी तीन आठवड्यात यायचा प्रयत्न करेन इ.इ.इ...'
वि.मः 'वा रे शहाण्या, मी मागू का तुला उद्याच्या उद्या महिन्याचा आगाऊ पगार?आज म्हणतोस उद्यापासून या..उद्या दुसऱ्या कोणाला म्हणशील आता जुन्या नोकरीतून बाडबिस्तरा आवरुन १५ मिनीटात असेल तसे पळत या..'
मुलाखत्याः 'ठिक आहे. आम्ही तुम्हाला २ दिवसात कळवू.'
औ.मः'आनंद झाला तुम्हाला भेटून.'
वि.मः 'दोन तासांपासून पिळतो आहेस लेका, एक कप चहा दिला असतास तर जास्त आनंद झाला असता..'