प्रवास

धुके भरजरी तुझ्यावरीचे विरले होते
निशा रंगता निरभ्र दर्शन घडले होते

जणू चंदनी वनात वारा विहरू लागे
तसे कस्तुरी सुगंध तव दरवळले होते

नका काळजी करू तुम्ही मज पाखंड्याची
मला ब्रह्म शांभवीतही सापडले होते

अरे कोणता मुहूर्त पाहून जन्मा आलो
ग्रहांची दशा बघून जग हळहळले होते

कधी कंकणं भरून किन्नर झालो होतो
कधी शस्त्र ते शमीत अडकून पडले होते

झडू लागली उदास पानं शिशिरागमनी
कुणा काळ अन् कुणा कलीने गिळले होते

नवी पालवी कठीण आहे रुचणे त्याला
जुने खोड ते वयोपरत्वे खटले होते

खचू लागले मनातले ते इमले सारे
उडू रंग लागताच वासे फिरले होते

नसे एकटा, मिलिंद, कोणी जगात दुःखी
इथे जोडप्याने सारे तडफडले होते