ह्यासोबत
श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या 'सध्यःस्थितिप्रेरित दोन नाटके' या टिकालेखातून घेतलेला उतारा काही भागांत देण्याचा विचार आहे.
इंग्रजांनी हिंदुस्थान देश काबीज करताना वाटतील तसे व तितके अनाचार व अत्याचार केले. ही गोष्ट अगदी खरी आहे. परंतु, कोणत्याही समाजातील नीतिमत्तेची प्रत ठरविताना त्यातील मनुष्ये शत्रूंशी कसे वर्तन करतात, याचा विचार करता येत नाही. कारण वर दर्शविल्याप्रमाणे नीतीचा उगम व उपयोग समाजाच्या अंतर्व्यवस्थेपुरताच असतो. शत्रूशीही धर्माचरण करू पाहणाऱ्या अलौकिक पुरुषास आपण धर्मराजाच्या कोटीत गणू; परंतु तसे न करणाऱ्यास दोष लावता येणार नाही. हल्लीसुद्धा या देशात काही उन्मत्त इंग्रजांकडून जे अनीतीचे प्रकार होत आहेत, त्यावरून त्यांच्या जातभाईंची अटकळ बांधणे कधीही रास्त होणार नाही. कारण स्वदेशातील लोकमताच्या दबावामुळे जे लोक सद्गुणी असतात, तेच तो दाब उडाल्यावर स्वेच्छाचारी होणे अगदी स्वाभाविक आहे.
ही गोष्ट इंग्रजांची झाली. आता आपल्या देशबंधूंकडे पाहा. अत्यंत कनिष्ठ प्रतीच्या मजुरापासून तो वरिष्ठ हिंदी अंमलदारापर्यंत आपण दृष्टी फेकली, तर मनास समाधान व अभिमान वाटण्यासारखी जाज्वल्य सत्यनिष्ठा आपणास किती ठिकाणी दिसेल बरे? आपण बाजारात भाजी विकत घ्यावयास गेलो, तर आपणास किती वेळ घासाघीस करावी लागते? स्टेशनवरील तिकिटे विकणारा अडाणी प्रवाशांपासून किती पैसे लुबाडीत असतो? व्यापाऱ्यांचे मुनीम नुकसानीचे सौदे मालकांच्या व फायद्याचे सौदे स्वतःच्या नावावर दाखवून किती पैसा गिळंकृत करीत असतात? गिऱ्हाईकाकडे माल विकावयास गेला असता तोलताना व त्याचा हिशेब करताना गिऱ्हाईक व मध्यस्थ किती गैरवाजवी नफा आपल्या घशात टाकीत असतात? कामावर मजूर ठेवून त्याजवर देखरेख न ठेवली, तर किती नुकसान सोसावे लागते? न्यायदेवतेच्या मंदिरात किती पत्रकार, वकील व साक्षीदार न्यायाधीशाच्या डोळ्यांत धूळ फेकीत असतात? त्याच क्षणी तेच न्यायाधीश लाच खाऊन न्यायाचा कसा राजरोस खून करीत असतात? आपणास कोणी लबाड म्हटले असता आपणापैकी अनेकांस लाज वाटण्याऐवजी धन्यता वाटते की नाही? अलीकडे शिक्षणाचा प्रसार झाल्यामुळे हे प्रकार काही कमी झाले असतील. परंतु इंग्रजांच्या खालावलेल्या सत्यनिष्ठेची बरोबरी आपल्या वाढणाऱ्या सत्यनिष्ठेस करावयास अजून काही वर्षे गेली पाहिजेत.
हे एकंदर हिंदुस्थान वासियांबद्दल झाले. खुद्द मराठ्यांविषयी विचार केला, तर त्यांची कीर्ती हिंदुस्थानातील इतर भागांत त्याच्या शौर्याबद्दल, क्रौर्याबद्दल व धूर्ततेबद्दल असलेली दिसून येते; व ही कीर्ती द्वेषमूलक, व अतएव अस्थानी नसून वाजवी आहे, असेच आपणास प्रत्यक्ष अनुभवावरून म्हणावे लागते. ही स्थिती आपल्या देशात लोकमताच्या दबावाखाली असणाऱ्या लोकांविषयी झाली. आपले लोक शिक्षणाच्या किंवा इतर निमित्ताने परदेशी गेले असता त्यांचे वर्तन कसे असते, हे पुष्कळांस ऐकून माहीत असल्याने त्याही इथे वाच्यता करण्याचे कारण नाही. ज्याप्रमाणे हल्ली आपणावर इंग्रज राज्य करीत आहेत, त्याप्रमाणे आपण जर इंग्लंडमध्ये त्यांजवर राज्य करीत असतो तर त्यापैकी काही जण हल्ली इकडे जे निंद्य प्रकार करीत आहेत, त्यापेक्षाही अधिक करण्यास आपण चुकलो नसतो, याबद्दल आम्हांस संशय वाटत नाही. इंग्रज लोक आम्हांस आमच्या स्पष्ट भाषेबद्दल काही महिने स्थलांतर करावयास लावितात; तर आम्ही त्यांस त्याच गुन्ह्याबद्दल मिर्च्यांच्या धुऱ्या किंवा राखेचे तोबरे देऊन हत्तीच्या पायाशी तुडविले असते. सभाबंदीचा कायदा, राजद्रोहाचे खटले वगैरे जे अनुचित प्रकार हल्ली राज्यकर्त्यांकडून घडत आहेत, ते त्यांच्या नैसर्गिक स्वातंत्र्यप्रियतेस न जुमानता आत्मरक्षणार्थ होत आहेत. पण यापलिकडीलही प्रकार आपणाकडून इंग्लंडात प्रत्यही झाले असते, असे विधान केल्यास चूक होणार नाही.
(क्रमशः)
(२० व्या शतकाच्या पूर्वाधाच्या सुमारास लिहिलेला हा लेख बौद्धिक संपदा अधिकाराच्या कचाट्यातून बाहेर आहे असे तो मानतो.)