आमच्यातला राष्ट्रीय सद्गुणांचा अभाव -५

श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या 'सध्यःस्थितिप्रेरित दोन नाटके' या टिकालेखातून घेतलेला उतारा ५ भागांत दिला आहे आहे.


वरील विधानावरून कोणास असे वाटेल की, आमचे धोरण आम्हामध्ये काहीच सद्गुण नाहीत असे म्हणण्याचे आहे. आम्हामध्ये सद्गुण आहेत, व ते विपुलही आहेत. ते इतके आहेत की, त्यांत आपणांस जगातील कोणत्याही राष्ट्राशी बरोबरी करता येईल. परंतु त्यांचा उपयोग आपली राजकीय स्थिती सुधारण्याकडे होण्यासारखा नाही. म्हणजे त्यांचे स्वरूप सार्वजनिक नसून खाजगी आहे. उदाहरणार्थ, आपणामध्ये काटकसर, साधेपणा,  शुचिर्भूतपणा वैवाहिक कर्तव्यनिष्ठा, धर्मश्रद्धा वगैरे काही अमोल सद्गुण आहेत. परंतु त्यांचा राजकीय स्थितीशी फारसा निकट संबंध नाही. विलायती कापड आपल्या साधेपणाच्या व काटकसरीच्या आड येते म्हणून, साखरेत हाडे व केशरात गाईचे रक्त असल्यामुळे आपला धर्म बाटतो म्हणून, काचेच्या चिमण्या वारंवार फुटून व घासलेट तेलाने घरास आगी लागून नुकसान होते म्हणून, त्या त्या विलायती जिनसांवर बहिष्कार घालण्याचा आपला प्रयत्न फलद्रुप होईल, हे खरे आहे. पण येथे त्या सद्गुणांच्या सामर्थ्याची मर्यादा संपली. काडतुसात धर्मनिषिद्ध  पदार्थ असतात या भ्रमावर १८५७ सालचे बंडाची इमारत रचली होती. परंतु त्या भ्रमाचा भोपळा फुटताच पुनः  चोहोस्वस्थताकडे  झाली; व हल्ली देशाची इतकी निकृष्टावस्था झाली असताही संतुष्ट असलेल्या देशी पलटणी बिनचरबीची काडतुसे प्रसंग पडल्यास आपल्या अनाथ देशबांधवांवर सोडण्यास तयार होतील. पण यात नवल कसचे? एखाद्या वस्तूत जितका जोम तितकेच काम ती देणार! जास्त कोठून देणार?


 (समाप्त)


(२० व्या शतकाच्या पूर्वाधाच्या सुमारास लिहिलेला हा लेख बौद्धिक संपदा अधिकाराच्या कचाट्यातून बाहेर आहे असे तो मानतो.)