आमच्यातला राष्ट्रीय सद्गुणांचा अभाव -२

श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या 'सध्यःस्थितिप्रेरित दोन नाटके' या टिकालेखातून घेतलेला उतारा काही भागांत देण्याचा विचार आहे.


या आधी आमच्यातला राष्ट्रीय सद्गुणांचा अभाव -१


हल्ली आपले वाढते दारिद्र्य व प्रवासाची साधने यामुळे सामायिक कुटुंबांची संस्था दिवसेंदिवस नष्ट होण्याच्या मार्गाला लागली आहे. तथापि, हल्लीही जी अवशिष्ट अवाढव्य सामायिक कुटुंबे तुरळक तुरळक आपल्या दृष्टीस पडतात, त्यावरून त्यांच्या पूर्वीच्या स्थितीचीही आपणास कल्पना करिता येते. अनेक कुटुंबांत चार-चार, पाच-पाच पिढ्यांचे नातलग व त्यांचे आश्रित मिळून ५०-५०, १००-१०० माणसे असल्यास नवल नाही. या लहानशा राज्याची व्यवस्था पाहता पाहता कर्त्या पुरुषास कुटुंबाच्या बाहेर काय चालले आहे, हे पाहण्यास सवड किंवा उत्साह न उरल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. कुटुंबातल्या कुटुंबात स्वरक्षणाची सर्व साधने अनुकूल असल्याने कुटुंबबाह्य गोष्टीकडे लक्ष्य पुरविण्याची त्यास आवश्यकताही भासत नसे. पंचायतीसारख्या ग्रामसंस्था असल्यामुळे इतर ग्रामस्थ कुटुंबांशी त्यांचा अगदीच संबंध येत नसे, असे नाही. पण एवढे खरे की, गावापेक्षा स्वकुटुंबाशीच अधिक संबंध पडत असल्यामुळे, ग्रामस्थितीपेक्षा  कुटुंबाच्या क्षेमाकडेच त्यांचे चित्त अगदी वेधले जाई. ही कुटुंबाच्या कर्त्याची गोष्ट झाली. इतर कुटुंबीय मनुष्यांचे केंद्र कर्ताच असल्यामुळे त्यांचा इतर ग्रामस्थांशी तात्पुरताच संबंध असे.


कुटुंबाच्या कर्त्याच्या कुटुंबाखालोखाल गावाशी संबंध येई. पण ग्रामसंस्था म्हणजे लहान पण स्वतंत्र राज्यच असल्यामुळे अपूर्ण राज्याच्या व्यवस्थेशी त्याचा संबंध फारच क्वचित येई. यामुळे तो तिजविषयी उदासीन असल्यास नवल नाही.


या प्रकारामुळे भक्ती, दया, औदार्य इत्यादी अंध गुणांस आम्हामध्ये वाव मिळून करारीपणासारख्या डोळस गुणांची वाढ खुंटून गेली. पितृभक्त पुत्र, कर्तव्यनिष्ठ मातापिता, दिव्य पतिव्रता, एकनिष्ठ सेवक ही चोहोकडे दिसू लागली. पण कट्टा राष्ट्रभक्त मात्र फारच क्वचित दिसून येई. हळूहळू सामायिक कुटुंबाच्या कल्पनेसही व्यापून टाकून राष्ट्र म्हणजे एक अवाढव्य कुटुंब, राजा म्हणजे आपला मायबाप व आपण त्यांची लेकरे अशा कल्पना प्रचलित होऊन बसल्या. देशकार्यासाठी प्राण देण्याचा प्रसंग आला असता कुटुंबाचा मोह सुटेनासा झाला. कर्तव्याच्या प्राप्तींसाठी संकोच करण्याची ही जी प्रवृत्ती झाली, तिजमुळेच जातिभेदाचाही उदय किंवा उत्कर्ष झाला, असे म्हटल्यास फारशी चूक होणार. नाही हिंदूस्थानच्या काही भागांत तर जातीचे इतके वैपुल्य आहे की, जितकी कुटुंबे तितक्या जाती तिथे असाव्यात. अविभक्त कुटुंबपद्धतीमुळे जसा राष्ट्रीय गुणांचा ऱ्हास झाला, तसा जातिभेदामुळेही झाला.


असो; मराठ्यांचा उदय झाला तेव्हा महाराष्ट्रात राष्ट्रीय गुणांचा उदय व्हावयास सुरुवात झाली. परंतु शिवाजी महाराजांचीही महत्त्वाकांक्षा गोब्राम्हणप्रतिपालनाचीच होती; व दिल्लीपतीचा एक मोठा अंकित होण्याच्या इच्छेपलीकडे तिची फारशी मजल गेली नव्हती, असेही कित्येक विद्वानांचे मत आहे. याच राष्ट्रीय गुणाभावामुळे व कुटुंबप्रवण दृष्टीमुळे ब्राह्मणांनी पुणे येथे निराळी गादी स्थापण्याचा, व नागपूर, बडोदे, इंदूर व ग्वाल्हेर येथील अधिपतींनी स्वतंत्र होण्याचा प्रयत्न केला. मधून मधून बाजी देशपांडे, मालुसरे, खंडोबल्लळ चिटणीस वगैरे काही विलक्षण स्वर्थत्यागी पुरुषही दृग्गोचर होत. पण त्यांचा स्वार्थत्याग देशसेवेसाठी नसून स्वामीसेवेसाठीच बहुदा असे. हिंदू समाजास आरंभी जे राष्ट्र घातक वळण लागले होते, त्याचा नाश होऊन राष्ट्रानुकूल नवे वळण कायम होण्यापूर्वीच दुर्दैवाने मराठी राज्याचा अंत झाला.


(क्रमशः)
(२० व्या शतकाच्या पूर्वाधाच्या सुमारास लिहिलेला हा लेख बौद्धिक संपदा अधिकाराच्या कचाट्यातून बाहेर आहे असे तो मानतो.)