ह्यासोबत
श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या 'सध्यःस्थितिप्रेरित दोन नाटके' या टिकालेखातून घेतलेला उतारा काही भागांत देण्याचा विचार आहे.
आशियातल्या इतर देशांप्रमाणे हिंदुस्थानात पूर्वीपासून राष्ट्रीय सद्गुणांचा अभाव असलेला आपणास दिसून येतो. सर्व हिंदुस्थानात एक चक्रवर्ती असून त्याच्या प्रजाजनांमध्ये बंधुत्वाचे नाते आहे. असा काल आपणास इतिहासात बहुदा कधीच आढळून येत नाही. अनेक लहान लहान राज्ये भिन्न भिन्न राज्यांच्या अमलाखाली नांदत असून परस्परांमध्ये वैरे चालत असलेलीच आपल्या दृष्टोत्पत्तीस येतात. त्या वैरांचे पर्यवसान अनेकदा एक राज्य दुसऱ्यात लुप्त होण्यात होई. ती वैरे कधी कधी इतक्या तीव्रतेस पोहोचत असत की, मुसलमानांसारख्या परक्या शत्रूची धाड आली असतानाही त्या वैराचा या नवीन उपस्थित झालेल्या संकटांमुळे लय होण्याच्या ऐवजी त्यांचा फायदा शत्रूस घ्यावयास सापडे. ज्याप्रमाणे राज्यातील प्रजाजनांचा परस्परांवरील विश्वास नष्ट झाल्यावर त्याच्या परचक्राकडून ग्रास होण्यास विलंब लागत नाही, त्याप्रमाणे राष्ट्रसमुहाच्या भिन्न भिन्न अवयवांत दुजाभाव असल्यास त्यास अंकित करणे परदेशीय शत्रूस सोपे जाते. बरे, राज्याची अंतःस्थिती समाधानकारक होती असे म्हणावे तर तसेही दिसत नाही. राजाने प्रजेवर हवा तसा जुलूम करावा, व प्रजेने त्यास विष्णूचा अवतार मानीत तो निमूटपणे सहन करावा, त्यास दुसऱ्या राजाने जिंकल्यास त्याच्याशीही तितक्याच राजनिष्ठेने वागावे यापेक्षा अधिक समाधानकारक राजकीय परिस्थिती फारशी आढळून येत नाही. एखादे वेळी अशा प्रजेने राजास पदभ्रष्ट केल्याचाही दाखला इतिहासांत सापडतो, नाही असे नाही. पण अशा एखाद दुसऱ्या अपवादाचा उपयोग मुख्य नियम दृढतर करण्याचे कामीच विशेष होतो. अशा स्थितीत प्रजेत करारीपणाचे प्रमाण कमी असल्यास आश्चर्य वाटावयास नको.
या शोचनीय स्थितीचे समर्पक कारण अजून कोणी दिलेले पाहण्यात नाही. आम्हांस वाटते की, आपणाकडील राज्यांचा अल्पविस्तार व राष्ट्रीय सद्गुणांचा अभाव या दोहींचे मूळ आपल्या एका संस्थेत आहे. ती संस्था सामायिक कुटुंब ही होय. समाजाच्या बाल्यावस्थेत सामायिक कुटुंबे हिंदुस्थानाप्रमाणे युरोपातही होती, यात बिलकुल शंका नाही. फरक इतकाच की, आमच्याकडे ही संस्था धर्मशास्त्रामुळे लवकरच कायमची होऊन बसली, व तिकडे तसा फारसा प्रकार झाला नाही. आमच्याकडे कुटुंबास मध्यबिंदू धरून राज्याचे वर्तुळ आखले गेले; व तिकडे राज्याच्या धोरणावर कुटुंबाची उभारणी झाली. पाश्चात्यांच्या दृष्टीने कुटुंब म्हणजे लहान राज्य, पौरस्त्यांच्या दृष्टीने राष्ट्र म्हणजे मोठे कुटुंब.
(क्रमशः)
(२० व्या शतकाच्या पूर्वाधाच्या सुमारास लिहीलेला हा लेख बैद्धिक संपदा अधिकाराच्या कचाट्यातून बाहेर आहे असे तो मानतो.)