शीर्षक सुचत नाही

मोकळे कुंतल रुळावे माझिया वक्षावरी
ग्रीष्म श्वासा शीतळावे माझिया वक्षावरी


चैन नाही, लाडके, तुज यापुढे सखयांसवे
शीर ठेवोनी पहावे माझिया वक्षावरी


सावरेना पदर तुजला, फडफडे वार्‍यावरी
लाजुनी तोही विसावे माझिया वक्षावरी


मेखला मी होऊनी तव कटिस बिलगावे प्रिये
तू सुगंधी हार व्हावे माझिया वक्षावरी


नाव घेण्या लाजसी का , बोलका एकांत हा
तू उखाणे गोंदवावे माझिया वक्षावरी


करत गुंजारव पहाटे , शोधता मकरंद मी
उमललेले तू असावे माझिया वक्षावरी


दिन असा येवो कधी ना , मृत्यु यावा त्यापरी
एकटा मी , तू नसावे माझिया वक्षावरी


ह्या गजलेस मला योग्य शीर्षक सुचत नाही. मनोगतावरील वाचक काही सुचवतील का?


आपला,


मिलिंद