असे का

संत सांगती असार जीवन, माया केवळ हा संसार
ठरते अंती अरण्यरुदन हे, अळवावरती जसे तुषार
            काटेरी हा मार्ग चालता
            मोहबाग बघ खुणवित असे
व्यापुनि सार्‍या संतोक्तिंना दशांगुळे उरतो शृंगार


'तमसो मा ज्योतिर्गमय' जरी युगे-युगे चाले उच्चार
रस्तो- रस्ती, गल्लो-गल्ली अक्षय, अविरत भ्रष्टाचार
            वृथा कशा ही पूजा आता
            मनी कुणाच्या भाव नसे
देवच जेव्हा बहिरा होई, अनंत काळचा अंधकार


दोष कशास्तव देऊ त्यांना, केले ज्यांनी मजवर वार
होते बोलून चालून शत्रु, षड्रिपूच ते पुर्वापार
            जन्मजात ही स्खलनशीलता
            रंध्रा-रंध्रातून वसे
आयुष्याच्या रणभूमीवर पाताळाचे उघडे द्वार


जीव जडविला मी ज्यांच्यावर, प्रेमच अन् केले अनिवार
उठबस ज्यांची माझ्यासंगे, हास्यविनोदाचे चित्कार
             काळाच्या ओघात वाहता
             विसरून गेले आज कसे
विरून जाते असे कसे, हे नाते, जाता दर्यापार


आता कुणाची नकोच प्रीति, धिक् माया, ममता धिक्कार
सर्व संग हा परित्यागितो, करण्या आत्म्याचा उद्धार
             कशास पण हे बोल लावता
             वेड्यासम का भासत असे
गृहस्थाश्रमी सांगा पण मी देऊ कसा विषयास नकार