अद्ययावत आणि अद्यावत

प्रतिसादांपुढे अद्यावत हा शब्द दिसायला लागल्यापासून अनेक मनोगतींनी ह्या शब्दाच्या बिनचुकतेविषयी स्वारस्य दाखवले. त्या सर्वांच्या कळकळीला आणि मराठीविषयीच्या तळमळीला दाद द्यायला हवी. पुष्कळांनी ह्या शब्दाबद्दल विचारणा केली म्हणून हे लिहावेसे वाटले.


अद्ययावत (अद्ययावत्) हा शब्द बिनचूक आहे, त्याबद्दल कसलीही शंका नाही. 'जसे आज' = आजच्याप्रमाणे अशा अर्थाने तो अप टु डेट ह्यासाठी प्रतिशब्द म्हणून चपखलपणे वापरला जातो.


अद्यावत हा शब्दही योग्य आहे. अव (की आव?) असे काहीसे संस्कृत क्रियापद असावे त्याचे आवत हे कर्मणि भूतकाळवाचक धातुसाधित विशेषण असावे. ह्या क्रियापदाचा अर्थ आणून सोडणे, नेऊन पोहोचवणे, ढकलणे, नेण्यात पुढाकार घेणे असा काहीसा होत असावा. ऋग्वेदात आवत हा शब्द अशा अर्थाने वापरलेला पाहण्यासाठी हा दुवा , हा दुवा आणि हा दुवा पाहा. येथे धातूच्या ऋग्वेदात सापडणाऱ्या अर्थांची यादी दिलेली दिसेल. तेथे जी दुव्यांची यादी दिसेल त्यातल्या एकेका दुव्यावर टिचकी मारलीत की जे पान उघडते, त्यातल्या (त्या त्या पानात) वरच्या बाजूला दिलेल्यातल्या griffith ein असे लिहिलेल्या ह्या दुव्यावर टिचकी मारलीत तर येणाऱ्या पानावर इंग्रजी भाषेत एकेका ओळीचा मथितार्थ दिलेला दिसेल. तो वाचलात की मी वर लिहिलेले तुम्हाला पटेल.


ह्या धातूच्या ऋग्वेदातल्या वापराबद्दल ह्या दुव्यावर आणखी माहिती मिळेल.


ह्या सगळ्यावरून आवत ह्या शब्दाचा अर्थ आणून पोहोचवलेला ली ले असा काहीसा घेता येईल, ह्याविषयी मला शंका नाही. त्यामुळे अद्यावत ह्या शब्दाचा अर्थ आजच्यापर्यंत आणून पोहोचवलेला ली ले असा घेता येईल. (संस्कृत व्याकरणाच्या माझ्या मूळच्या जेमतेम तोंडओळखीचाही आता काहीसा विसर पडलेला आहे, त्यामुळे तपशिलातील चुका सुधारून घ्याव्या!)


अप टु डेट आणि अपडेटेड असा भेद करावयाचा झाल्यास अप टु डेट साठी अद्ययावत आणि अपडेटेड साठी अद्यावत शब्द वापरून फरक दाखवता येईल. (अप टु डेट ही स्थिती वाटते आणि अपडेटेड मध्ये काहीसे स्थित्यंतर घडल्याचे दर्शवता येते.) असा विचार करून मनोगतावर अप टु डेट साठी अद्ययावत आणि अपडेटेड साठी अद्यावत हा शब्द वापरायचा मानस आहे. (मात्र प्रतिसादापुढे 'अद्यावत' (अपडेटेड) हा शब्द ड्रुपलमध्ये नेमक्या काय आडाख्यांनी येतो त्याचा नीट उलगडा अजून मला झालेला नाही.)


मला वाटते अद्ययावत आणि अद्यावत हे दोन्ही शब्द प्रथम सावरकरांनी तयार करून मराठीत वापरले. आम्ही दहावीत असताना (जुनी अकरावी एस एस सी) आम्हाला 'दोन शब्दांत दोन संस्कृती' नावाचा सावरकरांचा सुप्रसिद्ध लेख अभ्यासाला होता (पाने ११!) त्यात त्यांनी अप टु डेट ह्या संकल्पनेचे वर्णन करताना अद्ययावत आणि अद्यावत असे दोन्ही शब्द वापरलेले आहेत. गमतीचा भाग असा की पाश्चिमात्यांच्या अपटुडेट आणि भारतीयांच्या श्रुतिस्मृतिपुराणोक्त ह्या दोन शब्दांतून दोन संस्कृतींतला फरक दाखवताना त्यांनी वापरलेल्या अद्यावत ह्यातल्या आवत ह्या संस्कृत शब्दाला मला आधार सापडला तो ऋग्वेदाच्या संबंधात तोही आंतरजालावर! (हा योगायोग की दोन संस्कृतींचे हे एकत्र योगदान?)


माझ्या तो लेख काहीसा लक्षात आहे.....  तरीही चू. भू. द्या. घ्या. कोणाला तो लेख मिळाला तर अवश्य वाचावा आणि माझ्या म्हणण्याची खात्री/खंडन करावे.


तुम्हांस काय वाटते?