आजचे मराठी संगीत

           मनोगताचे रूप बदलल्यापासून पहिल्या पानावर दिसणारे लेखन आपोआप वाचले जाते. तसाच तात्यांचा थोडासा जुना 'प्रिय बाबूजी' हा लेख आणि (अर्थातच) त्यावरचे प्रतिसाद वाचनात आले. आणि मग त्याची पार्श्वभूमी म्हणून 'हिमेश रेशमिया' ही चर्चा वाचली. त्यातले जुन्या आणि नव्याचे वादविवाद वाचले आणि हा महत्वाचा प्रश्न उभा राहिला.
         हिंदी गाण्यांचे काहीही असूदे. पण मराठी गाण्यांचे काय? आज नवी मराठी गाणी कुठे आहेत? मराठी चित्रपट संगीत ज्याला एकेकाळी सोनेरी दिवस होते ते आज कुठे आहे?  आज आपल्यापैकी कितीजण 'नवीन' मराठी गाण्यांच्या ध्वनिफीती विकत घेतात? मराठी चित्रपट आता कात टाकतोय. तसाच प्रयोग चित्रपट संगीतातही होतोय का? 'उत्तरायण' सारख्या चित्रपटातील गाणी कोणी ऐकली आहेत का? सलील, अभिराम ही मंडळी कोण आहेत? अशी मंडळी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी कमी का आहेत? मराठी गैरफिल्मी संगीतात काय चालले आहे? हे आणि असे अनेक प्रश्न.
          जुने मराठी संगीत हे निर्विवाद अभिजात आणि अजरामर आहे. पण नावीन्य ही काळाची गरज आहे.  जुन्या गाण्यांच्या बरोबर नव्यामधले जे चांगले आहे त्याची ही प्रशंसा आणि प्रोत्साहन गरजेचे आहे. नाहीतर हिंदी गाण्यांच्या लाटेत नवी मराठी गाणी तग धरू शकणार नाहीत.
          या चर्चेत आपण वरील प्रश्नांची उत्तरे, त्यातून निर्माण होणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न तर करूच. पण नव्या संगीताला वाव आणि प्रोत्साहन देण्यासाठी काय करता येईल हे ही पाहू.  मला वाटते, या मराठमोळ्या संकेतस्थळावर हिमेश रेशमिया पेक्षा अशा चर्चा जास्त उपयोगी ठरतील.


  -ओंकार