जगाच्या राजधानीतून - शेवट

आणखी खूप वेळ तिथल्या सदैव ताज्या वाटणाऱ्या पिवळ्यापोपटी हिरवळीवर बसून मूर्तिचिंतन करण्याचा विचार होता, पण एका सुरक्षा रक्षकाने सायंकाळी पाच वाज़ता नम्रपणे 'आता घरी ज़ाण्याची वेळ झाली' असे सांगितले (दंडुका आपटत 'चलो चलो चलो' केले नाही, त्यामुळे थोडे चुकचुकल्यासारखे झाले खरे!) त्यामुळे पुन्हा बेटावरील धक्क्याकडे पावले वळली. 'मिस न्यू जर्सी'चा कॅटवॉक पुन्हा अनुभवायचा होता ः)


परतीच्या छोटेखानी प्रवासात न्यूयॉर्क दर्शनातील एकूण उत्सुकता ज़रा कमी झाल्यासारखे वाटले. असे का होते आहे याची चाचपणी केली असता पोटातल्या कोकलणाऱ्या कावळ्यांनी त्याचे उत्तर दिले. काहीतरी खायलाच पाहिज़े, हे तर कळत होते पण उरलेसुरले न्यूयॉर्कसुद्धा बघायचे होते. बोट पुन्हा बॅटरी पार्कला (न्यूयॉर्कमधला भाऊचा धक्का ;)) आल्यावर तेथे खाण्यापिण्याचे बरेचसे (चांगले पण महाग) पर्याय खुले होते. ज़वळच एक हौशी कलाकार अमेरिकेच्या स्वातंत्र्यदेवतेसारखा पोशाख करून आणि चेहऱ्याची तशी रंगरंगोटी करून अमेरिकेचा राष्ट्रध्वज हातात घेऊन उभा होता आणि येणाज़ाणाऱ्या चिल्ल्यापिल्ल्यांशी हस्तांदोलन करून त्यांना आकर्षित करत होता. मग त्यांचे आपापल्या पालकांकडे त्याच्याबरोबर फ़ोटो काढून घेण्यासाठी सुरू झालेले हट्ट पाहून मला त्या सगळ्या प्रकारामागील 'बिझनेस स्ट्रॅटिजी' कळली. तशीच काहीशी मोर्चेबांधणी बाज़ूलाच बसलेल्या एका कृष्णवर्णीय भिकाऱ्याने केली होती. आपल्या मनात आज़वर 'भिकारी' या व्यक्तिरेखेचे ज़े चित्र कायम झाले आहे, ते लक्षात घेता, अमेरिकेतील या व्यक्तिरेखांना भिकारी म्हणणे मला खरोखरच जिवावर येते. या महाशयांनी छान युक्ती केली होती. येणाज़ाणारे पर्यटक कोणत्या देशाचे आहेत हे अचूक हेरून त्या देशाचे राष्ट्रगीत तो आपल्या व्हायोलीनवर वाज़वत होता. अर्थात, त्याने 'जन-गण-मन' सुद्धा वाज़वले. पण आम्ही भारतीय आणि त्यातून मराठी माणूस. राष्ट्रगीत संपेस्तोवर आम्ही ताठ मानेने 'सावधान' स्थितीत उभे होतो (म्हणजे काय, तर खिशातून पैसे काढून भीक दिली नाही. भारतात असताना चार आणे, आठ आणे अगदी क्वचित प्रसंगी बाहेर निघालेही असतील, पण डॉलर? छे! कधीकधी मला माझ्या अशा वागण्याचे हसूही येते. हे योग्य की अयोग्य असा प्रश्नही पडतो. पण उत्तर मात्र कधीच मिळत नाही ः( )


बॅटरी पार्कबाहेरील एका फेरीवालीकडून न्यूयॉर्कची आठवण म्हणून दोन टी शर्टस् घेतले (ते सुद्धा पाच डॉलरमध्ये दोन! अमेरिकेत असे 'गुड् डील' मिळण्याला आणि अर्थातच मिळवण्याला फार महत्त्व आहे) निदान पोलीस तरी अपेक्षाभंग करणार नाही या आशेपोटी पुढचा पत्ता ज़वळच उभ्या असलेल्या पोलिसालाच विचारला. त्याच्या सुचवणीनुसार त्याने सांगितलेल्या ठिकाणी बसची वाट पाहत उभे राहिलो. आता आम्हांला एंपायर स्टेट ही जगप्रसिद्ध गगनचुंबी इमारत बघायला ज़ायचे होते.


बसमधून बघायला मिळालेले न्यूयॉर्कही तितकेच सुंदर आणि अमेरिकेतील इतर काही शहरांच्या तुलनेने बरेच वेगळे वाटले. बसमधून बाहेरची वर्दळ आणि चिरकालीन आनंद नि समाधानाचे चेहरे रंगवलेली माणसे बघायला मजा येत होती. हा न्यूयॉर्कमधला 'सामान्य'(?!) माणूस. सोमवार ते शुक्रवार काम आणि शनिवार-रविवार कामाच्या दुप्पट आराम. रस्त्याच्या दुतर्फ़ा छोटीमोठी दुकाने, उपाहारगृहे, मध्येच न्यूयॉर्क विद्यापीठ, मॅरिअट फ़ायनॅन्शिअल सेंटर हॉटेल, बसथांबे असे सगळे बघत बस पुढे चालत होती. इच्छित स्थळी उतरल्यानंतर उजवीकडचा रस्ता पकडून पन्नास-एक पावले गेलो आणि १०३ मज़ली एंपायर स्टेटचे पहिले दर्शन झाले.


इमारतीत पाऊल टाकण्याआधी पोटोबाची पूजा करायची ठरली. ज़वळच उभ्या असलेल्या गाडीवरून सीग कबाबचा सुगंध जीभ चाळवत होता. त्याच्या बाज़ूच्या गाडीवर खारे दाणे, चणे, मसालेदा काज़ू वगैरेची गाडी होती (अमेरिकेतही चणेवाल्याचे दर्शन झाले आणि मी भरून पावलो;मात्र त्याच्याकडे मुंबईचा चनाछोर काही मिळाला नाही ः() सीग कबाब आणि मसालेदार काज़ू हे आमचे त्या दिवशीचे जेवण आटोपले आणि एंपायरमध्ये प्रवेश केला. अपेक्षेप्रमाणे याही ठिकाणी विमानतळसदृश सुरक्षाव्यवस्था होतीच. तिच्यातून यथासांग पार पडून, तिकिटे काढून दूरनियंत्रित लिफ़्टमध्ये चढलो. आत उभे राहून ज़ाणवणारही नाही अशा वेगाने ज़ाणाऱ्या त्या लिफ़्टने आम्ही ज़वळज़वळ एका मिनिटातच ८६व्या मज़ल्यावरील सज्ज्यात पोचलो.




(एंपायर स्टेट इमारत)

ही इमारत न्यूयॉर्कचे आणखी एक भूषण. वर्ल्ड ट्रेड सेंटरचे ज़ुळे मनोरे उभे राहिस्तोवर ही न्यूयॉर्कमधली सर्वात उंच इमारत होती. आणि अर्थात आता त्या मनोऱ्यांना वीरगती प्राप्त झाल्यानंतर ही सर्वात उंच इमारत आहे. हिचे बांधकाम विल्यम लँब या स्थापत्यशास्त्रज्ञाच्या मार्गदर्शनाखाली १७ मार्च १९३० रोजी चालू झाले. एक वर्ष ४५ दिवसांच्या अथक परिश्रमांनंतर ही पूर्ण उभी राहिली. हिच्या उभारणीस न्यूयॉर्कचे तत्कालीन राज्यपाल आणि त्यांचे सहकारी यांचा आर्थिक तसेच राजकीय मार्गाने वरदहस्त लाभल्याचे समज़ते. इमारतीचा इतिहास, काही दुर्मिळ छायाचित्रे, सद्यस्थिती आणि पर्यटकांसाठी उपयुक्त माहिती याबद्दल उत्सुकता असणाऱ्यांनी http://www.esbnyc.com/index2.cfm या इमारतीच्या अधिकृत संकेतस्थळाला अवश्य भेट द्यावी. आज़ही ही इमारत 'न्यूयॉकची राजदूत' म्हणून अभिमानाने मिरवते.


इमारतीचे मुख्य आकर्षण म्हणजे ८६व्या मज़ल्यावरून चहूबाज़ूंनी दिसणारे 'अख्खे' न्यूयॉर्क. तेथील निरीक्षण सज्ज्यात उभे राहून आपण जगाच्या डोक्यावर उभे असल्याचा भास झाल्यावाचून राहत नाही. हडसन नदी, ब्रूकलिन पूल, एलिस आणि लिबर्टी बेटे असा नज़ारा एका बाज़ूला आणि दुसरीकडे न्यूयॉर्क बंदर, मेटलाइफ़ इन्शुरन्स बिल्डिंग आणि इतर अनेक गगनचुंबी इमारती. एंपायर स्टेटच्या उंचीपुढे त्या खुज्याच वाटत होत्या. कदाचित हेच या एंपायर नामक एंपरर चे एंपायर ः) रस्त्यावरच्या गाड्या तर अक्षरशः मुंग्यांप्रमाणे भासत होत्या. आणि साहजिकच, माणसे तर दिसतही नव्हती.




(एंपायर स्टेटच्या ८६व्या मज़ल्यावरून दिसणारे न्यूयॉर्क)




(मावळत्या दिनकराच्या किरणांमध्ये न्हाऊन निघालेले हडसन नदीकाठचे न्यूयॉर्क... एंपायर स्टेटवरून)

घोंघावणारा वारा, सहपर्यटकांचे हसणेखिदळणे आणि छायाचित्रे काढणे आणि सूर्यास्त यांनी गज़बज़लेली एंपायर स्टेट मनसोक्त भटकून झाल्यावर बाहेर पडलो. पुढचा मुक्काम होता टाइम स्क्वेअर (याला टाइम 'चौक' म्हणणे मला खरेच आवडणार नाही. चौक असावा तर तो म्हणजे अप्पा बळवंत चौक, हुतात्मा चौक असा काहीतरी. यांना 'चौक' म्हणण्यातला जिव्हाळा आणि शान टाइम स्क्वेअरला चौक म्हणण्यात नाही and vice versa)


टाइम स्क्वेअर म्हणजे फ़क्त रोषणाई आणि नुसती रोषणाई. टाइम स्क्वेअर म्हणजे जाहिराती आणि रहदारी. टाइम स्क्वेअर म्हणजे निळे, लाल, हिरवे, गुलाबी सगळ्या रंगांचे दिवे. येथील विद्युत जाहिरातफलकांवर आपली जाहिरात लावण्याचा दर प्रतिसेकंद काही दशलक्ष डॉलर्सच्या घरात असल्याचे समज़ते. त्यामुळे कोकाकोला, एच एस् बी सी, सॅमसंग यांसारख्यांचे लाड हा टाइम स्क्वेअर इमानेइतबारे पुरवतो. न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध 'हार्ड रॉक कॅफ़े' येथेच. बँक ऑफ़ अमेरिकेचे कार्यालय, 'व्हर्जिन' हे गाण्यांच्या कॅसेट्स, सीडीज़, डीव्हीडीज़ चे प्रसिद्ध दुकान, एक मोट्ठे खेळण्यांचे दुकान सारे काही येथे होते. आणि नुसतेच उभे नव्हते तर रोषणाईने ओसंडून वाहत होते. न्यूयॉर्क पोलीस खात्याची इमारत तर विद्युत रोषणाईने इतकी झगमगून गेली होती, की लालबागचा राजा किंवा गणेश गल्लीचा गणपती अगर चेंबूरच्या टिळकनगरचा छोटा राजनचा गणपती यांचे वैभव त्या झगमगाटापुढे फिके पडावे. आमच्याकडच्या काही पोलीस ठाण्यामध्ये आज़ही मेणबत्तीच्या प्रकाशात कारभार चालतो, याचे त्यावेळी खूप वाईट वाटले. "टाइम स्क्वेअरमधील एक शतांश टक्के वीज़ महाराष्ट्राला दिली तर देव अमेरिकेचे (थोडेतरी) भले करो", अशी प्रार्थना करण्याचा मोह मी त्यावेळी मुळीच आवरला नाही (आणि एन्रॉनच्या करंटेपणाच्या नावाने बोटे मोडायलाही विसरलो नाही)


जाहिरातींबरोबरच दोन तीन विशाल विद्युतपटलांवर बातम्या चालू होत्या. दिवसाचे हवामान आणि आठवडाभराच्या हवामानाचे अंदाज़ वर्तवणे चालू होते. शेअर निर्देशांक दाखवला ज़ात होता. ज्ञानविज्ञान, राजकारण, मौज़मजा सगळे येथे हातात हात घालून, गुण्यागोविंदाने नांदत होते.




(टाइम स्क्वेअर)

टाइम स्क्वेअरच्या प्रकाशात मनसोक्त न्हाऊन निघाल्यावर ज़वळच्याच एका उपाहारगृहात रात्रीचे जेवण घेतले. खरे तर आम्हांला न्यूयॉर्क मध्ये भेळपुरी, पाणीपुरी असे चाटवर्गीय पदार्थ नि तिथल्या वडापावची चव घ्यायची होती. पण फारच उशीर झाल्याने तो संकल्प सिद्धीस नेता आला नाही. आपले सर्व(आणि सु) परिचित मनोगती नंदन होडावडेकर यांनी सांगितलेल्या एका भारतीय चायनीज़ (म्हणजे जेथील चायनीज़ जेवणाला आपल्या पुण्यामुंबईतल्या 'गाडीवरच्या चायनीज़'ची चव असते) उपाहारगृहात हादडायचा बेतही पाण्यात गेला. फार फार वाईट वाटले ः(


रात्रीच्या साडेबारा वाज़ताही या भागात तुळशीबागेत असते तशी (किंबहुना त्याहून जास्त) गर्दी होती. सारे न्यूयॉर्क शनिवारच्या रात्रीत झिंगले होते. जेवून झाल्यावर तडक घरी आलो आणि मुकाट्याने झोपलो, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी अंमळ लवकरच (सकाळचे ११ म्हणजे तसे लवकरच नाही का!) परतीची बस पकडायची होती. टाइम स्क्वेअरचा लखलखाट इतका भिनला होता अंगात, की डोळे मिटूनही झोप येत नव्हती. झोपायलासुद्धा प्रयत्न करावे लागतील असे काही बरेवाईट प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतच असतात. टाइम स्क्वेअर भेट हा त्यांपैकीच एक म्हणावा लागेल.




(टाइम स्क्वेअरचा झगमगाट)

आदल्या दिवशीच्या चकचकीत न्यूयॉर्क भेटीमुळे आलेला थकवा आणि न्यूयॉर्क दौरा संपल्याचे दुःख यांचा परिणाम म्हणून परतीची बस पकडताना मन (आणि अंग!) थोडे ज़ड झाले होते. मावशीचा निरोप घेऊन बसमध्ये बसलो. सुदैवाने या प्रवासात लक्कू कमी होते त्यामुळे प्रवास सुखाचा होणार होता. आमच्या अंगात न्यूयॉर्कला घेतलेले 'आय लव्ह न्यूयॉर्क'वाले टी शर्टस् पाहून काही सहप्रवासी आमच्याकडे ज़रा हेटाळणीपूर्ण नज़रेने पाहत आहेत ('कुठल्या गावाहून आलेत' अशी काहीशी नज़र!) हे आमच्या नज़रेतून सुटले नव्हते. तरीही न्यूयॉर्क भेटीचा अपार आनंद यत्किंचितही कमी होऊ न देता मी उरलीसुरली झोप बसमध्येच काढली. ज़ाग आली, तेव्हा माझे 'गाव' आले होते. बसमधून उतरलो आणि घराकडे रवाना झालो.


उण्यापुऱ्या दोन दिवसांच्या सहलीतला हा दोन तपांचा आनंद उपभोगून मी स्वगृही परतलो होतो. खूप मजा केली. माझ्यातला प्रवासी सुखावला होता आणि विद्यार्थी आपल्या सामान्यज्ञानात आणि अनुभवात भर टाकून आला होता. जगाच्या राजधानीत फिरण्याचे आणि ती अनुभवण्याचे भाग्य काहीसे लवकरच लाभल्याचे समाधान चेहऱ्यावर झळकत होते. या सहलीने मला काही ताणतणावाचे प्रसंग, दुःखे या सगळ्यांपासून दूर दूर नेऊन प्रकाशाच्या, आनंदाच्या राज्यात, सुखवर्षावात न्हाऊ घातले होते. आतापर्यंतची मरगळ झटकून नव्या ज़ोमाने कामाला लागायची प्रेरणा या प्रवासातून मिळाली. अशा तरतरीत करणाऱ्या सहली तुमच्याआमच्या सगळ्यांच्याच वाट्याला येवोत हीच सदिच्छा. पंधरा दिवसांपूर्वीच्या त्या सहलीची ही कहाणी आता या भागात सुफळ संपूर्ण होते आहे. कोणा अनामिक कवीमनातून उमटलेल्या मला अज़ूनही स्मरत आहेत -


 हासत दुःखाचा केला मी स्वीकार
वर्षिले चांदणे पिऊन अंधार
प्रकाशाचे गाणे अवसेच्या रात्री
आनंदयात्री मी आनंदयात्री!