एक (अस्ताव्यस्त) निरोप समारंभ

एप्रिल महिना जवळ आला होता. अभियांत्रिकीच्या (भल्याभल्यांना तोंडघशी पाडणाऱ्या) तोंडी परिक्षा तोंडावर आल्या होत्या. पण आम्ही तिसऱ्या वर्षाची मुलं(काही शिक्षक 'कार्टे' आणि 'कार्ट्या' म्हणत तो भाग सोडा!) अभ्यास, प्रात्यक्षिकं,लिखाण सर्व विसरुन एका आठवड्यावर आलेल्या एका दिवसाच्या तयारीला कंबर कसून लागलो होतो. तो दिवस म्हणजे 'फेअरवेल'. तिसऱ्या वर्षीय मुलांनी अंतिम वर्षीय मुलांना द्यायचा निरोप समारंभ.


महाविद्यालयात गुलाब दिवस, निळा दिवस इ.इ. सर्व दिवसांना बंदी घातल्याने 'फेअरवेल' हा तिसऱ्या आणि अंतीम वर्षीय मुलांना यथेच्छ बागडण्याचा, नटण्याचा दिवस होता. शिवाय या एकमेव दिवशी मुलामुलींना संगीतावर (लांबून!) एकत्र नाचण्याची परवानगी असे हा 'सुप्त' आनंदही होता.


सुरुवात केली ती आमच्या बंगाली वर्गप्रमुखाने('जरा जास्तच समजतो स्वतःला!' असं त्याच्याबद्दल बऱ्याच जणांचं मत होतं.). त्याने वर्गात फक्कड इंग्रजीत एक भाषण दिलं. भाषणाचा सारांश असा होता की 'न भूतो न भविष्यति' असं फेअरवेल आपण देऊ. जाणाऱ्यांना सोन्याने मढलेली स्मृतीचिन्हं देऊ इ.इ. तर या महान कार्यासाठी वर्गाने प्रत्येकी २०० रु. वर्गणी जमा करणे, आणि मनोरंजक कार्यक्रमाची  आखणी करुन तयारी सुरु करावी. नुकतंच मुलांच्या वसतिगृहात झालेलं महाराष्ट्रीय वि. अमहाराष्ट्रीय भांडण ताजं होतंच! मग काय, मुद्दे आणि गुद्दे सुरु झाले. 'पण २०० रु. कशाला? इतका भपका करायची काय गरज आहे?' 'ज्यांना परवडत नसतील त्यांनी देऊ नयेत आणि येऊ नये. आम्ही त्यांच्या वाटचे भरु' 'सजावटीवरच पैसा कमी करु' असं उलटसुलट करत करत १५० रु. वर बोली पक्की झाली आणि सर्वत्र फेअरवेलचे वारे वाहू लागले. 


मुलींच्या वसतीगृहात साड्या आणि मुलांच्या वसतीगृहात टायची शोधमोहीम सुरु झाली. एक दिवस वाट वाकडी करुन बांगड्या,टिकल्या,लिपस्टीक,नेकलेस इ.इ. खरेदी झाली. 'ब्लीच' नामक प्रकार चेहऱ्यावर लव असलेल्या/नसलेल्या सर्व (म्हणजे आम्ही सातच मुली!) मुलींनी लावून झाला. 'तुझी मिशी जरा जास्तच सोनेरी झाली.काहीतरीच दिसते' इ. प्रतीक्रिया आणि त्यावरुन वाद झाले. फेअरवेलमध्ये आपली साडी,आपले दागिने आणि आपण सर्वांमध्ये उठून दिसले पाहिजे या इच्छेने चेहऱ्यावर बेसनाचे आणि केसांवर कोरफडीचे प्रयोग 'वेल इन ऍडव्हान्स' सुरु झाले. पण खरी पंचाईत होती ती कार्यक्रम शोधण्याची. सातापैकी सर्वांना संधी मिळेल असा कार्यक्रम हवा. वर्गप्रमुख रॉयला मी(मूर्ख कुठली!) तोंडभरुन वचन दिले होते की 'खूप कल्पना आहेत. लवकरच आमचा कार्यक्रम सांगते.' रॉय रोज भेटला की आंबट चेहऱ्याने फक्कड इंग्रजीत विचारायचा, 'कुठे आहेत तुझ्या भरपूर कल्पना?' आता आली का पंचाईत? मी आपलं त्याला दडपून सांगितलं होतं. डोक्यात तर काहीच येत नव्हतं. दोन दिवस असेच गेले.


तिकडे वर्गात सर्वांना 'फेअरवेल व्यवस्थापना' चा ताप चढलेला. मग काय विचारता? जरा बऱ्या दिसणाऱ्या मुलामुलींना पकडून स्वागत आणि 'एस्कॉर्ट'(म्हणजे द्वारपाल हो!आलेल्या ज्येष्ठांचे स्वागत करुन त्यांना त्यांची खुर्ची दाखवायची.) समितीत टाकले गेले. शनिवार रविवार जास्त्तीत जास्त हॉटेले फिरणारे भिडू 'खानपान समिती' त टाकले. कुठेही हात पोहचेल असे बऱ्यापैकी ताडमाड वीर आणि रांगोळ्या(त्या 'संस्कारभारती टाइप्स' ठिपके आणि गालिचा रांगोळ्या) येणाऱ्या मुली 'सजावट समिती' त दडपल्या गेल्या. (यापैकी कोणतीही गोष्ट नीट करत नसल्याने!) अस्मादीकांचे नाव 'मनोरंजन समिती' वर झळकले. समित्यांच्या बैठकींवर बैठकी (आणि अर्थातच उपहारगृहाच्या कचोऱ्या) झडू लागल्या. पैसा कमी पडत होता. त्यामुळे 'जाहीराती' आणि प्रायोजक गोळा करण्याची टूम निघाली आणि महिलावर्गाबद्दलची जनसमुदायाची आस्था लक्षात घेऊन जास्त जाहिराती मिळवण्यासाठी सात मुलींना या कामावर लावण्यात आले.


'जाहिराती' गोळा करणे हा प्रकार एकंदरीत कठीणच! 'आम्ही आमच्या महाविद्यालयात कार्यक्रम करणार आहोत आणि त्यात तुमच्या जाहिराती लावू. तुम्ही जाहिरातीच्या मापाप्रमाणे पैसे द्या' यावर दुकानदारांच्या वेगवेगळ्या प्रतीक्रिया दिसल्या. 'तुम्ही तुमच्या महाविद्यालयात कार्यक्रम करणार, खाणार, पिणार, पैसे आम्ही का देऊ? आम्ही तसेही प्रसिद्ध आहोत.आम्हाला जाहिरातींची गरज नाही.' 'आमचा पैशाचा काम आमचा डॅडी बघते. तुमी संध्याकाळला या.' 'ते आमचा मुलगा ठरवल्याशिवाय आमी काही करत नाही.तुमी सकाळला या.'  'हे नसते उद्योग सांगितलेत कोणी?चांगल्या घरच्या मुली तुम्ही, दुकानांत जाहिराती मागत कसल्या फिरता?' 'मी १००० ची जाहिरात देतो, पण आमच्या दुकानात एक सोन्याचा दागिना खरेदी करा तर देतो.' इ.इ. प्रकारांतून कशाबशा ३००० च्या जाहिराती जमल्या. (हल्ली म्हणे ते दुकानदार जानेवारी ते एप्रिल हंगामात  घोळक्याने कागद घेऊन फिरणारे मुलं मुली दिसले की जेवणाच्या सुट्टीसाठी दुकान बंद करुन घेतात! )


तनुश्रीने 'आधुनिक रामायण' नावाचं छोटं नाटक सुचवलं. सातपैकी दोन मुली म्हणजे मी आणि तनुश्रीचे केस लहान होते. त्यामुळे आम्ही 'लक्ष्मण' आणि रावण बनलो. मुकुटाऐवजी सहज उपलब्ध  टोप्या घालण्याचे ठरवले. रामाच्या भूमिकेसाठी तिसऱ्या मुलीला केस टोपीत लपवायला राजी करणे चालू होते. 'मी केस टोपीत वगैरे ठेवणार नाही. मी त्यादिवशी पार्लरमधे जाऊन केस सेट करणार आहे.' या भूमिकेवर ती ठाम असल्याने तिने फक्त सोडलेल्या केसांवर उलटी टोपी घालून राम बनण्याचे ठरले. लक्ष्मणाला शूर्पणखेचे नाक कापण्यासाठी तलवारीऐवजी सुरी दिली. (तलवार बिलवार कुछ नही! बजेटात बसत नाही!) आणि सराव सुरु झाला. याबरोबरच 'आवारा भवरे' या गाण्यावर सहा जणींनी(सातवी मी पाषाणासारखी अढळ होते, त्यामुळे नृत्यप्रकारात मला घेण्यात अर्थच नव्हता!) नाच ठरवला. कपडे काय, हावभाव काय, हे ठरवता ठरवता कळलं की सहा मुली पूर्णपणे वेगवेगळ्या अंगयष्टीच्या आहेत आणि वेगवेगळ्या प्रकाराने नाचत आहेत. नाच बारगळला.


अजून एक गरमागरम वाद सुरु झाला ज्येष्ठांना कुंकुमतिलक लावायचे की नाही यावरुन. 'हॅ!मुलींनी मुलांना तिलक लावणे अगदीच फिल्मी वाटतं'. मुलींनी मुलींना तिलक लावण्यात अडचण अशी होती की छायाचित्रात चांगलं दिसत नाही म्हणून आणि टिकल्या खराब होतात म्हणून बऱ्याचश्या ज्येष्ठ मुलींनी तिलक लावून घेण्यास ठाम नकार दिला. मुलांना तिलक लावून मुलींना गुलाबाचे फूल देणे या उपायावर प्रश्न सुटला. (पण खर्च वाढला ना!)


हाय रे व्यवहारी जग! आमच्या महत्वाकांक्षा लक्षात न घेता 'जगाने' सोन्याने मढवलेली स्मृतीचिन्हे सवलतीत देण्याला साफ नकार दिला. 'सोन्याने मढवलेले कशाला? त्याचा काय उपयोग आहे? पितळेचे पण चालेल.' असा समजूतदार दृष्टीकोण(??) आम्ही घेतला. अशाच प्रकारे खाण्यात रबडीला फाटा देऊन गुलाबजाम, पनीर भाजीऐवजी साधी भाजी अशा निष्ठूर तडजोडी आमच्या 'बालमनांना' कराव्या लागल्या.


अखेरी तो दिवस आला. त्याच दिवशी सकाळी भुवया कोरल्याने त्या सुजून 'वर काळ्या आणि खाली लाल' अशा डब्बल भुवयांसकट आमची स्वारी खोलीवर आली. दोन तास आधी साड्या नेसायला सुरुवात करुनही शेवटच्या क्षणी 'शी, निऱ्या जरा डावीकडे झाल्या' 'पदर लहानच झालाय जरा' या महत्वाच्या समस्यांनी उशिर व्हायचा तो झालाच. 'भूकंप झाला तरीही साडीच्या निऱ्या आणि पदर विस्कटला नाय पायजेल' म्हणून आम्ही सर्व मुली 'सात पुतळ्यांची सिंहासन बत्तीशी'  या पौराणिक मालिकेतील सात पुतळ्या बनून तारेच्या बाहुल्यांप्रमाणे ताठ चालत होतो. मंचाकडे जाताना रॉय वैतागून म्हणाला, 'अगर तुम लडकीयां इस स्पीड से चलोगी तो हम प्रोग्राम खतम होनेतक स्टेजपर नही पहुचेंगे.'


गंमत अशी की साड्या आणा, पार्लरमध्ये जा, या गडबडीत सरावाकडे पूर्ण दुर्लक्ष झालेलं. मग काय, स्वागत भाषणाची दोन वाक्यं बोलल्यावर आमची स्वारी गप्प! आणि समोरच्या जमावाकडे पाहत बसली. शेवटी दोन मिनीटे झाल्यावर शेजारी उभा असलेला मुलगा भाषणाचा कागद घेऊन पुढचे वाक्य कुजबुजला आणि गाडी परत रुळावर आली. 'आधुनिक रामायण' कपडे बदलून मंचावर यायला उशिर झाल्यामुळे घाईत 'उरकले'. पूर्ण कार्यक्रमात 'छायाचित्रं काढणे' हा एक कार्यक्रम मात्र सर्वांनी न चुकता आणि व्यवस्थित पार पाडला.


दुसऱ्या दिवशी ज्येष्ठांना विचारलं? 'कसा होता कार्यक्रम?' बरेच जण म्हणाले, 'ठिक था, मगर वो बीच मे नाटक क्या था? तीन लडकीयां छुरी लेकर टोपी पहनकर क्यूं घूम रही थी?' हा हा हा! 'आधुनिक रामायण' समजावून सांगितल्यावर त्यांना ते कळलं. आमचा निरोप समारंभ निरोप समारंभ कमी आणि लॉरेल हार्डीचं नाटक जास्त झाला होता!!