काकाकाकूंचे गाव - विल्मिंग़्टन

कोणत्याही 'कट्ट्यावर' अगर सभागृहात आयोजित न केलेला आपल्या सर्वांच्या मनोगताचा 'घरगुती कट्टा' ऐकला आहे का कधी तुम्ही? मनोगतावर अशा विविध ठिकाणच्या कट्ट्यांचे वृत्तांत आणि छायाचित्रे आली, की हळहळ, हेवा इत्यादी सगळे एकदम वाटायचे (अज़ूनही वाटते) अमेरिकेत असा कट्टा कधी आयोजित करता येईल, याची कायम उत्सुकता असते. पण येथील मनोगती पूर्ण देशात सर्वदूर विखुरलेले आहेत. भारतातल्या बहुसंख्य मनोगतींसारखे पुण्यामुंबईत आणि नजीकच्या परिसरात केंद्रित झालेले नाहीत. त्यामुळे येथे कट्ट्याचे आयोजन हे खरे आव्हान आहे. हे आव्हान पेलण्यासाठी किंवा खरे तर तशी संधी मिळण्याची सगळेच मनोगती आतुरतेने वाट पाहत असतात. म्हणजे त्यायोगे मनोगतावरील काही 'वैशिष्ट्यपूर्ण' व्यक्तिरेखांशी (;)) प्रत्यक्ष संवाद, गप्पाटप्पा (येथे काही (अति)'चौकस' मनोगतींनी 'गॉसिप्स' असे वाचण्यास हरकत नाही), सहभोजन (अर्थातच!!), कविता नि गज़लवाचन, कथाकथन, रंगतदार (!) चर्चा (!!)यांसारखे काही सांस्कृतिक कार्यक्रम आणि वेळ असेलच (हे 'मानसिक तयारी असेलच' असे वाचावे) तर विचारांचे आदानप्रदान यांसारखे संकीर्ण कार्यक्रम अशा धामधुमीत दिवस छानपैकी घालवता येईल, अशी भाबडी आशा बाळगता येते.


गेल्या एप्रिलमध्ये माझी विनायककाका आणि रोहिणीकाकूंशी माझ्याच घरी भेट झाली, तेव्हा बहुदा मनोगताचा अमेरिकेतील पहिलावहिला (मायक्रो किंवा नॅनो)कट्टा झाला असेल. पण काकांचे सेंद्रिय रसायनशास्त्रज्ञ म्हणून येथे काम करतानाचे अनुभव, काकूंनी करून आणलेला चमचमीत चिवडा (आणि माझे फसलेले कांदेपोहे!) आणि संध्याकाळी स्थानिक महाराष्ट्र मंडळातर्फ़े आयोजित करण्यात आलेल्या शिरीष कणेकरांच्या 'माझी फिल्लमबाजी'ला एकत्र लावलेली हजेरी यात अशाच पुढच्या एखाद्या छोटेखानी भेटीची उत्सुकता लावून तो कट्टा (?) लवकरच (!) संपला.


 सुदैवाने मेमध्ये पुन्हा एकदा संधी मिळाली, आणि यावेळी माझ्यासाठी तो 'अवे गेम' होता. म्हणजे मी माझ्या मित्रांसोबत 'बीच ट्रिप' (समुद्रकिनारी सहल) साठी विल्मिंग़्टनला ज़ायचे ठरवले. ओघाओघाने काकांकडे मुक्काम आलाच ;) (आणि काकूंच्या हातचे 'घरचे' जेवणसुद्धा!) सकाळी दहापर्यंत निघालो की दुपारी बाराला पोचू वगैरे आम्हा मित्रांचे बेत तयार झाले आणि अपेक्षेप्रमाणे(च) ते अमलात आले नाहीत. आदल्या रात्रीच्या त्यांच्या थकव्यामुळे (कसला ते विचारू नका बरे !;)) दुसऱ्या दिवशी घरातून बाहेर पडायलाच दुपारचा दीड वाज़ला. वाटेत आमच्या गाडीच्या दुरुस्तीच्या एका कामाने अर्ध्या तासाऐवजी चक्क पावणेतीन तास घेतले. मनातल्या मनातच त्या मेकॅनिकला 'यापुढे तुझ्या दुकानात एकही गाडी दुरुस्तीसाठी येऊ नये' असा शुभाशिर्वाद देऊन आम्ही विल्मिंग़्टनकडे प्रस्थान केले. 'लाँग वीकेंड' असूनही थंडगार वारा, अगदी मोकळा (गर्दी नसलेला) रस्ता, अशा आदर्श वातावरणात गाडी धावत होती, तेव्हाच 'सगळी अमेरिका फिरायला बाहेर पडायचे सोडून झोपली आहे काय', अशा विचाराने ज़रा विचित्र वाटले. काही वेळाने लक्षात आले की रस्त्यावर फक्त आमचीच गाडी धावते आहे. रस्ता चुकून भलत्याच वाटेवर असल्याचा साक्षात्कार होऊन, पुन्हा मूळ रस्त्यावर येऊन, योग्य त्या दिशेला लागायला लागलेल्या वेळात आमच्या चालक मित्राच्या सात-आठ पूर्वपिढ्यांचा उद्धार अगदी सहज़ झाला होता. झाले गेले गंगेला मिळाले म्हणून नंतर मज़ल दरमज़ल करत (म्हणजे गाडीतच छायाचित्रे काढणे, गाणी ऐकणे आणि कोक ढोसणे) विल्मिंग़्टनला काकांच्या घरी पोचलो, तेव्हा संध्याकाळचे पावणेआठ झाले होते. पण तरीही ज़वळच्या राइट्सविल चौपाटीला ज़ायचे ठरवले. तेथे पोचून, गाडी उभी करायला ज़ागा शोधेपर्यंत आणि मग ती उभी करून किनाऱ्यावर पाऊल ठेवेपर्यंत सूर्यास्त झाला होता. हवेतील दमटपणा आणि भरून राहिलेला वैशिष्ट्यपूर्ण समुद्री सुगंध, मऊशार वाळू, आणि आज़ूबाज़ूला मौज़मजेत रममाण झालेले इतरेजन यांच्यातच किनाऱ्यावर फिरतफिरत आमच्या गप्पा चालू होत्या. काकाकाकू क्लेम्सनहून विल्मिंग़्टनला स्थानांतरित झाले तेव्हाचे प्रवासातले अनुभव, माझ्या न्यूयॉर्क सहलीतील अनुभव, त्यांचे वॉशिंग़्टन डीसी च्या सहलीचे अनुभव यात वेळ कसा गेला समज़लेही नाही. दरम्यान, माझे रसिक मित्र ज़वळच डिस्को कुठे आहे याची चौकशी करून आले होते. त्यामुळे जेवणानंतरच्या मुखशुद्धीची त्यांची काळजी मिटली होती.


घरी परत आलो, तेव्हा सपाटून भूक लागली होती. आज़वरच्या मनोगताच्या कोणत्याही कट्ट्याला नसेल असा भरगच्च कार्यक्रम होता. कोबीची डाळ घालून भाजी, कुर्मा, आमटीभात, खीर आणि मुख्य म्हणजे पोळ्या. अहाहा! पोळीभाजीच्या 'घरच्या' जेवणाला आसुसलेल्या आम्हा चार दुष्काळग्रस्तांच्या पोटाची (आणि अर्थातच जिभेची) काकूंनी अगदी व्यवस्थित सोय केली होती. ते जेवण जेवल्यावर मला, कोणत्या अधिकारलेखणीने काकू मनोगतावर चमचमीत पाककृती देत असतील, याची चांगलीच प्रचिती आली.


चाटूनपुसून ताट साफ़ केल्यावर हाततोंड धुवून गप्पांचा कट्टा ज़मवला. माझे मित्र कट्टेकरी म्हणून तेथे उपस्थित नव्हते, हे वेगळे सांगायला नको. पण त्यांची रिकामी ज़ागा राधिकाताई, वरदाताई आणि सध्याचे लुई, ह्यूई, ड्यूई (तेव्हाचे बग्ज़ बनी बहुतेक!) यांनी (आळीपाळीने) भरून काढली. जगात कुठेही दोन किंवा अधिक मनोगती एकत्र आले आणि 'मनोगत' या विस्तृत चर्चाविषयावर गप्पा रंगल्या नाहीत तरच नवल! गप्पांचा श्रीगणेशा अर्थातच काकांच्या ज्ञानेश्वरी मनोगतावर टंकित करण्यापासून झाला. संगणकाच्या पडद्याशेजारीच असलेली ज्ञानेश्वरीची प्रत, तिच्यात ज़ागोज़ागी घालून ठेवलेले टिपणे आणि नोंदींचे कागद हे सगळे या उपक्रमामागील काकांची मेहनत आणि समर्पण दाखवून देत होते. आमच्या गप्पांची गाडी ज्ञानेश्वरीतील निरुपणे, संत ज्ञानेश्वर ही एक व्यक्ती होती की दोन वा जास्त, संस्कृत साहित्य, विद्वान आर्यभट्ट, वेदादी साहित्य यांचा ज्ञानेश्वरीच्या ज़डणघडणीतील वाटा इकडून चालू होऊन संतकालीन साहित्यापासून आज़तागायतचा मराठी साहित्यातील प्रदेशवाद, भारतीय स्वातंत्र्यलढा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, फाळणी, गांधीजी आणि जीना, काकांनी जीनांच्या चरित्रातील सांगितलेले काही किस्से आणि तत्कालीन राजकारण, वैज्ञानिक संकल्पना आणि स्वातंत्र्याला आज़काल चढवण्यात येत असलेला अध्यात्माचा मुलामा आणि त्याचे चांगलेवाईट परिणाम,  अशी बहुरंगी, बहुढंगी वळणे घेत चालली होती. काकूंनी दाखवलेली ज़ुनी छायाचित्रे आणि त्यांच्याशी निगडीत आठवणी त्यांच्याकडून ऐकणे, यांतसुद्धा छान वेळ गेला. आमच्या गप्पांमध्ये तसा कुठलाही एक विषय आवश्यकतेपेक्षा जास्त चघळला गेला नाही, आणि त्यामुळेच रात्री उशीरापर्यंतही गप्पा उत्तरोत्तर रंगत गेल्या, कंटाळावाण्या झाल्या नाहीत. प्रवासीपंत, तात्यामहाराज़ अभ्यंकर, चित्तोपंत इत्यादी दिग्गज़ मनोगती मंडळी; आपले सर्वांचे लाडके टगोजी, 'तो', शशांकमहोदय, नंदनराव; मृदुला, सोनाली, अनु इत्यादी ताई मंडळी; या सगळ्यांचा मनोगतावरील वावर, लेखन; नवोदित मनोगतींपैकी संवादिनीताई, सातीताई, एकलव्य अज्ञातवासी (?), पापळकरशेठ, शैलेश खांडेकर, मेघदूतबाबा तसेच इतरही अनेक आणि त्यांचे लेखन, चर्चांमधील सहभाग इत्यादी, अशा विविध विषयांवर गप्पा रंगल्या.


काकांच्या टेबलावरील ज़ुन्या हिंदी गाण्यांचे ज़ाडज़ूड पुस्तक, ज्ञानेश्वरी, काही इंग्रजी पुस्तके आणि शास्त्रीय (मला न समज़लेल्या काही) विषयांवरील पुस्तके, चित्रपटसंगीत, गझला इत्यादींच्या काही ध्वनीमुद्रिका या सगळ्यांवरून त्यांच्या व्यासंगाची, अभ्यासाची आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची कल्पना येत होती. मनोगतावर त्यांचे लेखन किंवा एखाद्या विषयावरील मतप्रदर्शन आवश्यक तितक्या गांभिर्याने का घेतले ज़ाते आणि का गेले पाहिज़े, याचे बोलके पुरावे पहायला मिळत होते.


गप्पाष्टकानंतर काकाकाकू झोपले. माझ्यासारख्या पक्क्या निशाचराला कसली इतक्या लवकर झोप! मनोगतावरच तंबू टाकून माझे वाचन चालू होते. त्यावेळी गूगल गप्पांवर चित्तोपंत भेटले आणि त्यांच्याशी थोडे बोलणे झाले. मात्र (रविवार असूनही) ते अंमळ व्यस्त असल्याने जास्त गप्पा मारता आल्या नाहीत याचे वाईट वाटले. तसेच ते थोडे लवकर भेटले असते, तर आमच्या या मायक्रोकट्ट्यावरच गज़ला आणि कवितांचा एक छोटासा उत्स्फ़ूर्त कार्यक्रमसुद्धा करता आला असता, असे वाटून गेले. त्यांचा निरोप घेऊन मग मीही निद्राधीन झालो.


दुसऱ्या दिवशी नाश्त्याला गरमागरम चहा आणि उपमा. काकूंना आमच्या मनातले कसे काय कळले याचेच राहून राहून नवल वाटत होते. सोनालीताईशी दूरध्वनीवरून थोडा वेळ गप्पा झाल्या. अंघोळी वगैरे आटोपून मग बरीच छायाचित्रे काढली (काकांच्या घरातून दिसणारा रमणीय निसर्ग, निळेशार आकाश आणि हिरवीगार जमीन, आणि समोरच्या तरणतलावावरील (सृष्टी?)सौंदर्य यांमुळे आमच्या एका छायाचित्रकार मित्राला चांगलेच स्फुरण चढले होते) काकाकाकूंचा निरोप घेऊन आम्ही पुढच्या सहलीसाठी निघालो. क्युरे बीचवर वेळ घालवल्यानंतर ज़वळाच्या उपाहारगृहात हादडले आणि मग परतीच्या वाटेस लागलो. वाटेत टॉपसेल बेटावरील समुद्रकिनाऱ्याला भेट द्यायची असे ठरले (बहुतेक माझ्या एका मित्राने टॉप'सेल' बीच ऐवजी टॉप'लेस' बीच असे वाचले असावे ;)) पस्तीस मैलांच्या निर्जन रस्त्यावर गाडी दौडवून आम्ही हा समुद्रकिनारा अखेर पालथा घातला. तिथे अटलांटिक महासागराचे हिरवेगार पाणी डोळ्यांत साठवून घेतले आणि गंगास्नानासारखे त्या पाण्याने हातपाय ओले करून घेतले. ज़वळच्याच पिअरवर मासेमारी चालू होती. त्याचा आनंद लुटला. पाण्यात पोहणारे जिवंत जेलीफ़िश आणि त्यांना पकडण्यासाठी पिअरवरून पाण्यात गळ टाकून बसलेले हौशी मच्छीमार यांच्याबरोबर थोडा वेळ घालवल्यावर परत निघालो. गाडीत मी अशी काही ताणून दिली, की थेट घरी पोचल्यावरच डोळे उघडले.


विल्मिंग़्टनचे संग्रहलाय आणि बंदर पहायचे राहून गेले खरे, पण नजीकच्या भविष्यकाळात आणखी एखादा कट्टा करायला मिळाला, तर यावेळी तीनपेक्षा जास्त मनोगती प्रत्यक्ष उपस्थित असतील, या आशेवर तो बेत तूर्तास स्थगित केला आहे. तसेच नॉर्थ कॅरोलायनाच्या शेज़ारील राज्यांत असलेले टगोजी, वरुणराव, सतीश खेडकर साहेब अशा सगळ्यांशी बोलूनभेटून, सगळ्यांनी एकत्र येऊन मायक्रोकट्ट्याऐवजी मिनीकट्टा करण्याचा (माझा तरी) विचार आहे. कार्य सिद्धीस नेण्यास कोणीतरी समर्थ ठरेलच अशी आशा करावयास हरकत नाही. हे बेत आणि पार पडलेला मायक्रो (अगर नॅनो) कट्टा 'अखिल अमेरिकन मनोगत कट्टा' या मोठ्या कार्यक्रमाची नांदी ठरो हीच सदिच्छा.




(काकाकाकूंबरोबर आम्ही)





(क्यूरे बीच)