आधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता?

परवा पुण्याहून माझ्या एका जुन्या मित्राचा बऱ्याच वर्षांनंतर फोन आला.  पाच दहा मिनिटं बोलणं झाल्यावर तो म्हणाला " बर चल आता ठेवतो कारण माझ्याजवळची नाणी संपत आलीयेत." मी म्हटलं "ठीक आहे, मेल टाकतो मी तुला". तर त्यावर हा म्हणतो "नाही रे, मी ते तुमच्या इन्टरनेट वगैरेच्या फ़ंदात नाही पडत.  मला नाही ते जमत." बापरे, हे दोन्ही डायलॉग म्हणजे धक्काच होता मला.  तुम्हाला खोटं वाटेल पण हा गृहस्थ चांगला शिकलेला बीएस्सी एमबीए झालेला आहे आणि हा पीसीओ वरून नाणी टाकून फोन करत होता? याला इन्टरनेट / मेल वगैरे वापरणं जमत नव्हतं?  जगात अशीही काही मंडळी आहेत? यांचं आणि मोबाइल, मेल, एमपी ३ किंवा अशा आधुनिक साधनांचं कायमचं वाकडंच असतं? 


अर्थात दुसऱ्या दृष्टिनं असंही आहे की या साधनांची / तंत्रज्ञानाची / तथाकथित शहरीकरणाची आपल्याला खरंच गरज आहे का?  मी उगाचच 'जुने ते सोने' वगैरे अशा भावनेतून म्हणत नाहीये पण दोन क्षण विचार करुन बघा, या सगळ्या साधनांशिवाय जीवन कसं असेल?  जीवन आनंदी नसेल?


मोबाइल फोन वर येणाऱ्या फोन्स पैकी खऱ्या अर्थानं महत्त्वाचे किंवा घाइचे किंवा अत्यावश्यक जरुरीचे किती असतात? सुट्टीच्या दिवशी दुपारी छान वाचत पडलेलं असाताना फोन खणखणला तर त्याला आपण शिव्या घालतोच ना?  टीव्ही वरच्या कार्यक्रमांपैकी मनापसून आवडणारा कार्यक्रम एखादा तरी असतो का?  मला कधीकधी तर वाटतं की बरीचशी साधनं कदाचित फक्त हातांना काम मिळावं याच उद्देशानं बनवलेली असतात. बाकी त्यांचा इतर फार काही उपयोग नसतो. आणि असंच फक्त हातांचच काम वाढत गेलं आणि इतर अवयवांचं काम त्यामुळे कमी होत गेलं तर ते फारच धोकादायक आहे  कारण मग डार्व्हिनच्या सिद्धांताप्रमाणे मनुष्याचे फक्त हातच शिल्लक राहतील आणि बाकी सगळे अवयव झडून जातील. 


तुमचं काय मत?


मिलिंद