मनोगत इ संमेलन १७ जून २००६

संगणक सुरू करताच वेदश्री व संदीप यांनी माझे स्वागत केले. "नमस्कार रोहिणी"


"नमस्कार संदीप , वेदश्री" "तुम्ही कुठे असता संदीप?" मी. "मी पुण्यात पण सध्या चीनला आहे" संदीप


"येथे आज इ संमेलन आहे ना?" सुभाष, "हो हो. या सुभाषराव! आपले स्वागत आहे" मी, वेदश्री, संदीप.


"अगं रोहिणी प्रवासी आलेत" वेदश्री. "हो का? वा वा अलभ्य लाभ! मी


"अगं सोनाली येतेस ना, प्रवासी आले आहेत" मी  "हो हो आलेच मी" सोनाली.


हळुहळु मंडळी जमत होती. राधिका, अदिती, संवादिनी (गौरी), अभिजीत गद्रे , मयुरेश वैद्य, ओंकार वाटवे. एकमेकांशी संवाद चालू होते.


"चला मंडळी, मी आता आपली रजा घेतो" प्रवासी. "हे काय इतक्यात निघालात पण?" वेदश्री, मी, राधिका,


नेहमीप्रमाणेच प्रवासी अतिशय घाईगडबडीत होते. नंतर लगेच संदीप यांना महत्वाचे काम असल्याने ते पण निघाले. हे दोघे निघेपर्यंत शशांक, चक्रपाणि, ऋतुपर्ण हजर झाले. परत सगळ्यांना नमस्कार स्वागत असे सूरू झाले. साती आली व म्हणाली " बटाटेवडे व चहा पाठवून देवू का?"  "अय्या बटाटेवडे! किती दिवसात खाल्ले नाहीत" अशी खंत गौरी व चक्रपाणिने व्यक्त केली.


आता समारंभाला सुरवात कशी करायची? ओंकार वाटवे यांनी एक विषय सुचवला तो म्हणजे रिझर्वेशन वर बंदी. त्यांनी बोलायला सुरवातही केली. अदिती, राधिका व विनायक यांनी त्यांना समजावून सांगितले की हा विषय येथे बोलून काहीही फायदा नाही, तरी तो बोलतच राहिला.


गौरीने सुचविले की आपण सर्वांनी गजला, कविता, अनुभव, विनोद यांनी सुरवात करू. ही कल्पना सर्वांनाच मान्य झाली. परत एकमेकांमध्ये गप्पा चालू झाल्या. तरूण मनोगती एकमेकांना याहू मुद्रा पाठवण्यात मग्न झाले होते. शशांक म्हणाला तुम्ही करा सुरवात तोपर्यंत मी जरा बाहेर जावून येतो.  गौरीने गडकऱ्यांची "चिंतातूर जंतु" ही कविता म्हणली. वा वा! छान! आवाज व कविता दोन्ही छान. सर्वांनी अभिप्राय दिले.


आता कोण? सर्वांनी शशांक व चक्रपाणिला एखादी गजल म्हणून दाखवा अशी विनंती केली. चक्रपाणिने "रंजीसी ही सही दिल ही दुखाने के लिए आ" ही गजल याहू निरोपकावर टंकीत केली. वा वा! मस्त! परत सर्वांनी अभिप्राय दिले. चक्रपाणिची गजल संपताच वेदश्री व सोनालीने आमचा निरोप घेतला.


परत एकमेंकाच्यात गप्पा सुरू झाल्या. मी विचारले "हे काय? मुले कोणीच का बोलत नाहीत?" चला कोणीतरी अनुभव सांगा. विनोद सांगा. नाहीतर आपण मुलामुलींच्या नावाच्या भेंड्या खेळायच्या का?" सर्व जण हो म्हणाले. " चला मग. मी सुरवात करते. रोहिणी- अक्षर 'न', निलिमा - 'म' - मृदुला...... साती पण आली होती पण तिला काय बोलायचे ते सुचत नव्हते, कारण आमच्या सगळ्यांचा गोंधळ सुरू होता. मुले तर खूपच गप्प बसली होती. एकटा चक्रपाणिच काय तो दिलखुलास बोलत होता. आता सातीने पण आमचा निरोप घेतला.


आता संमेलनात फक्त काही मनोगतीच उरले होते, ते म्हणजे सुभाषराव, शशांक, ऋतुपर्ण, चक्रपाणि, गौरी, राधिका, अदिती, विनायक व मी.


मी अदितीला एक गाणे म्हणण्याची विनंती केली. "कोणते म्हणू गं?" अदितीने मला विचारले. "काहे तरसाए म्हण" अदितीने गाणे म्हणायला सुरवात केली खरी पण कोणालाच काही ऐकू येत नव्हते. नंतर काहींना ऐकू आले, काहींना नाही. यामध्ये चक्रपाणिला एक युक्ती सुचली. त्याने दुसऱ्या याहू खोलीमध्ये आमची उरलेली बैठक हालविली. काही चाचण्या केल्या. तेंव्हा कळाले की जो गाणे गात असेल त्याने handsfree वर टिचकी मारून गाणे गायचे, त्याचवेळी इतरांनी handsfree वरची टिचकी काढायची. असे केल्याने आता सर्वांनाच गाणे छान ऐकू येत होते. आम्ही सर्व गाणे ऐकायचा आनंद लूटत होतो. अदितीने "काहे तरसाए जियरा" छानच गायले.


"चला आता कोण म्हणणार गाणे?" परत तू का मी असे चालु झाले. बऱ्याच आग्रहानंतर राधिकेने "मी राधिका, मी प्रेमिका" हे गाणे गायले. वा वा! छान! परत सर्वांचे अभिप्राय. नंतर माझे "चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले" झाले. यानंतर सुरवात केली विनायकने " देखती ही रहो आज दर्पण ना तुम" हे गाणे सर्वांनाच आवडले. आम्ही सगळे म्हणालो, "आता तुम्ही दोघेच राहिलात हं शशांक व  चक्रपाणि. जास्त भाव नका खाउ आता. नाहीतर दोघांनी मिळून म्हणा "ये दोस्ती हम नही छोडेंगे"


शेवटी आग्रह करता करता चक्रपाणिने एक सुंदर तान घेतली व सुरवात केली "ए मेरी जोहराजबी, तुझे मालूम नही" वा वा! सुंदर! परत सर्वांचे अभिप्राय. नंतर अतिशय सुंदर आवाजात शशांकने एक अध्यात्मिक गाणे गायले ते " मनरें तु काहे ना धीर धरे" वा! वा! अतिशय सुंदर! मस्तच! परत सर्वांचे अभिप्राय. आता सर्वांनाच एक प्रकारचा मूड आला होता. नंतर परत गाण्यांची दुसरी फेरी झाली. त्यात गौरीने बोरकरांची "त्या नदीच्या पार वेड्या" ही कविता म्हणली. नंतर अनुक्रमे राधिकेने " तुझ्या डोळ्यामध्ये गहिऱ्या", अदितीने "अंगणी गुलमोहर फुलला" व " मिला है किसीका झूमका" व शशांकने "धीरेसे जाना खटमलमें" अशी गाणी गायली.


हे इ संमेलन एवढे लांबले की राधिका व अदितीला खूप झोप यायला लागली व आम्हांला सर्वांना सपाटून भुक लागली, त्यामुळे कार्यक्रम तिथेच थांबवला. काही तांत्रिक अडचणींमुळे ऋतुपर्णला बैठक अर्धवट सोडून निघून जावे लागले.


या इ संमेलनाचा शुभारंभ वेदश्रीने केल्यामुळे तिला आमच्यातर्फे अनेक धन्यवाद! तसेच या संमेलनात सहभागी होणाऱ्या सर्व मनोगती सदस्यांचे आभार! सहभागी होणाऱ्या सर्व सदस्यांनी हे संमेलन कसे वाटले हे प्रतिसादात लिहावे ही विनंती. पुढील इ संमेलनात कार्यक्रमाची रुपरेषा आधीच ठरवली तर अधिक सुरळीतपणे संमेलन साजरे होईल याची खात्री आहे.


टीपः शु. चि. वापरला नाही, त्यामुळे शुद्धलेखनात चुका असण्याची शक्यता आहे त्याबद्दल क्षमस्व.


रोहिणी