(सन्जोप राव साहेबांनी न पाहिलेले)मनोगती संमेलन-एक कल्पनाविलास-१

सर्व नियम सन्जोप रावसाहेबांच्या संमेलनासारखेच (तंतोतंत!)


----------------------------------------------------------------


अस्ताव्यस्त संमेलनाला वठणीवर आणण्यासाठी कुणीतरी अध्यक्ष नेमला पाहिज़े होता, अशी कुज़बुज़ स्त्रीवर्गात चालू झाली. आणि ती तिकडे चालू झाल्यामुळे साहजिकच (हे 'साहजिकच' आहे ना, ते 'अपेक्षेप्रमाणे, सर्वानुमते' असे वाचावे!) प्रवासींचे नाव पुढे आले. पण प्रवासींना शोधायचे कसे, यावर एकमत होईना.


"माझ्याशी फ़ोनवर बोलतील तेव्हा विचारते. त्यांचा आवाज़ काय सही आहे!! एकदम आर. जे. सारखा आहे." --- मी राधिका.


"आर. जे. सारखा आवाज़ म्हणजे आर सारखा की जे सारखा? काहीहीहीहीही" --- मी आगाऊ.


यावेळी आपला टगेगिरीचा हक्क हिरावून घेतल्याने टग्याने आगाऊला खुन्नस दिला ते चक्रपाणिने पाहिले.


"मनोगतावरील प्रतिभावंतांमध्ये (निदान) संमेलनाच्या दिवशी(तरी) कटुता नको असे (मला) वाटते" ---- चक्रपाणि नैतिकता नि सभ्यता रक्षकाच्या भूमिकेत. पण डोळ्यांसमोर दिसलेले इतके कंस बोलून न दाखवता आल्याने काहीसा अस्वस्थ! मनोगतावर येण्याची नोंद करून टग्याला यावरून एक व्य नि पाठवण्यासाठी त्याचे हात शिवशिवत होते. पण खाज़गीतच "खुन्नस वगैरे नको" असे तो टग्याकडे बघून पुटपुटला.


सभ्यतेची भाषा बोलणाऱ्याने नि मर्यादा पाळण्याची भाषा करणाऱ्याने स्वतःच "खुन्नस" वगैरे शब्द वापरणे अयोग्य यावर वरुणने चर्चा चालू करायचा प्रयत्न केला. मिलिंद भान्डारकरांनी खुन्नस ऐवजी 'ज़ळज़ळीत कटाक्ष' हा योग्य मराठी शब्द आपल्या शब्दकोशातून बाहेर काढला. त्याला राधिकेने अनुमोदन दिले आणि त्याचबरोबर 'खुन्नस' हा शब्द कोशाबाहेरील शब्दांमध्ये समाविष्ट असल्याचे लक्षात आणून दिले.


"हा शब्द येथे दिल्याबद्दल राधिकाताईंचे आभार. असेच आणखी येऊ द्या." --- समस्त मनोगतींकडून आभारप्रदर्शन नेहमीसारखेच विनाअट संमत झाले. 


"हो हो माझ्याशी पण एकदा बोलले होते गं राधिका. छान आहे त्यांचा आवाज़.पण कुठे असावेत ते हे काही कळत नाही" --- रोहिणीला प्रवासी आठवले.


"फ़ोन केल्यावर तुझ्याशीच बोलतात. आमच्याशी नाही" --- विनायक. 


यावर 'तुला त्यांच्यावर ज़ळायचे काही कारण नाही' असे सणसणीत सुनावून रोहिणीने त्याच्या चिंतायुक्त दुःखाला 'मत्सरा'चे स्वरूप दिले. त्यामुळे विनायक अधिक खजील झाला. पाठिंब्यासाठी त्याने पुरुषवर्गाकडे आशेने पाहिले; पण सगळेच त्याच्याशी फ़क्त सहानुभूतच होते. त्याचवेळी अदितीने याच अनुषंगाने झालेल्या 'मनोगतावरील पुरुषी अहंकार' या चर्चेची आठवण करून दिल्याने वातावरण पुन्हा तापले. पण तिच्या नेतृत्त्वाखालील 'रोष नि जोश'पूर्ण स्त्रीवर्गाला त्यावेळी माफ़ीच्या साक्षीदाराची अनुपस्थिती प्रकर्षाने ज़ाणवली. आपल्या विडंबनाच्या परिपूर्णतेची खात्री करून घेण्यासाठी तो गरोदर शेळीच्या शोधात पर्वतीवर गेल्याचे कळले. त्यामुळे प्रवासी आणि त्याची सामाईक अनुपस्थिती म्हणजे माफ़ी = प्रवासी असा निष्कर्ष काढण्याचा अनावर मोह मनोगतावरील शेरलॉक होम्सना झाला.


"सोप्पे आहे. नीलहंसाला एखाद्या गुलछबू मदनिकेचे रेखाटन काढू द्या. आणि हो. तिच्या कपाळी कुंकू वगैरे नको नि नाकात नथ नको. घोडाबिडा नि घोडेस्वार काढला तर त्याला शेलापटका नि पगडी अगर खांद्यावर उपरणे  नको. म्हणजे प्रवासी चित्राच्या अमराठीपणावर टीका करतील. त्यांच्याशी भांडायची संधी मिळेल. च्यामारी, प्रवासीशी भांडायची मजा काही औरच. साला, तेव्हाच त्याला अध्यक्षपदाचे विचारून घेऊ" --- विसोबांनी मूळ चर्चा मूळ रुळावर आणली.


"मागील रेखाटनावेळी त्यांची संकुचित वृत्ती दिसली. तेव्हा आता माझ्याने त्यांच्यासाठी तरी रेखाटन होणे नाही" --- नीलहंसाचा स्वाभिमान जागृत झाला.


"कलेच्या प्रांतात भाषिक,प्रांतिक तसेच इतर प्रकारचे भेदाभेद नकोत यावरची चर्चा इथे पहा" --- (अर्थातच!) तो.


"प्रवासी पुणे संमेलनाच्या वेळीस भेटणार होते. पण भेटले नाहीत. मग गुप्तपणे बुरखा घालून एका हॉटेलात चहासाठी भेटले. तेव्हा बुरखा वर करण्याचे धाडस करायचा विचार केला. हॉटेल मराठी असल्याने तसा धोकाही नव्हता. पण असे करणे अनैतिक असल्याचे त्यांचे मत पडले नि मी हात आवरता घेतला" --- चित्त.


"अदिती, तू आणखी कोणत्यातरी वेगळ्या कार्टून व्यक्तिरेखेचे नाव घे. म्हणजे ते पुन्हा येतील" --- एक वात्रट


"आरं पन म्हऱाटीत त्यो चिंटू सोडून कंचा कार्टून गावनार पोरीला! कोन त्यो हॅरी पाट्र हाय त्येचंच हरी कुंबार करून चिकटून टाकासा!" --- खेडूत!


"सोनालीला विचारावे लागेल" --- विश्वमोहिनी.


"पण कार्टूनबद्दल की प्रवासींबद्दल?" --- अदिती.


सोनालीला आताच फ़ोन करावा की तिच्या आगमनाची प्रतीक्षा करावी, याबाबत महिलावर्गाचे एकमत होईना.


"प्रवासी संघवादी आहेत. त्यांनी अध्यक्षपद भूषविण्यास माझा सक्त विरोध आहे" --- शिवश्री ('सक्त' विरोधासह!).


"आरं ह्ये तुमचं संमेलन चालू हाय की इदानसबेचं आधिवेसन हाय? वाईस परवासीला बाज़ूस ठेवा की! आनि दुसरं खाय्तरी बोला पावनं!" --- खेडूत (दुसरे कोण असणार!)


" हा शुद्ध ब्राह्मणद्वेष आहे, बाकी काही नाही" --- सर्वसाक्षी.


 


"प्रवासी ब्राह्मण असल्याचे सिद्ध झालेले नाही. तसेच अध्यक्षाला कोणतीही वैयक्तिक बांधिलकी नसावी. त्यामुळे शिवश्रींचे म्हणणे 'त्याला' पटते" --- तो.


तितक्यात "हटो हटो हटो" असा आवाज़ मागच्या बाज़ूने ऐकू आला.


(अपूर्ण)


-------------------------------------------------------------------


सर्व नियम सन्जोप रावसाहेबांच्या संमेलनासारखेच (तंतोतंत!)