तसे म्हणाया समोर , अगदी समोर होते बरेच रस्ते
परंतू काही न बोलले अन निघून गेले पुढेच रस्ते
उगाच शोधायला तुला मी किती क्षितीजे फिरून आलो
फितूर होत्या दिशा जशा त्या, फितूर होते तसेच रस्ते
हजारदा त्या लहान गावासवे बसूनी रडून घेतो
इमारतींच्या मनात भरले असे कसे भाबडेच रस्ते ?
अजूनही हे शहर बघूनी पुन्हा पुन्हा बुचकळ्यात पडतो
पहा कधीही, तुडुंब गर्दी तरी कसे मोकळेच रस्ते?
कुणास ठाउक कुठून आले, जरा विसावुन, कुठे वळाले
नवीन शून्याकडे निघाले मुशाफिरासारखेच रस्ते
अता न पायामधील रस्त्यांवरी राहिला मुळी भरोसा
म्हणून हातातले बरे हे सरावलेले जुनेच रस्ते