पौष्टिक प्रेमाचे सुनीत


आहे खासच ही कथा जरी असे गेल्या जमान्यातली
जाताना शहरा, त्यजून स्वगृहा, करण्यास मी चाकरी
झाले दु:ख किती वियोग सखीचा कल्पून तो अंतरी
होती माझि प्रिया सुशील, सुमुखी ती एक लाखातली


त्यावेळी नव्हते असे पसरले हे फोन जेथे तिथे
ईपत्रे तर काय चीज असते जाणी न तेव्हा कुणी
होते हे जग फार दूर अजुनी मोबाइलांपासुनी
पत्रावाचुन अन्य साधन नसे देण्यास संदेश ते


"पत्रे तू मजसी लिही प्रतिदिनी" सांगे मला मत्प्रिया
"माझे ठायि तुझी किती असतसे प्रीती मला जाणवे
रोजी पत्र लिहीन मी तुजसि गे तू पूस ही आसवे
पत्रे वाचून दु:ख होइल कमी लागे न सांगावया"


"बोलू दे मज एक वाक्य, अपुले पाल्हाळ तू आटप
पत्रांहून तुझ्या मला प्रियचि जो त्यांचे करी वाटप"


------------------------


You should write me more often .......because I like my postman!
असे कुठे तरी वाचलेले होते. त्यावरून घडवलेले हे सुनीत.