शेळीचा धिंगाणा - भाग १

नाशकातला एक जुन्या पध्दतीचा, पाटणकरांचा  वाडा (आहे , अजुन शाबुत आहे, अपार्टमेंटच्या तडाख्यातुन वाचलाय, काहीतरी कोर्ट मॅटर आहे म्हणे), मागे-पुढे अंगण, सोपा आणि असंख्य खोल्या! ह्या घ्रराशी माझा गेले २५-३० वर्षांचा घरोबा, ईतक्यावेळा त्या घरी गेलोय, राहीलोय पण या वाड्यात नेमक्या खोल्या किती आहेत, कोणती खोली कोणत्या खोली मध्ये उघडते याचा मला अजुन ही अंदाज आलेला नाही. ह्या भुलभुलईया भर घालायला आहेत ओलसर दमट भिंती आणि त्यातुनच कोरुन काढलेले अरुंद , खतरनाक जिने,  मिणमिणते दिवे, फुटभर ऊंचीचे ऊंबरे आणी घ्रराच्या पाचवीलाच पुजलेला अंधार !   


पाटणकरांच्या या वाड्यात एकाच वेळी एक नाही , दोन नाही तर तब्बल चार पिढ्या सुखनैव नांदत होत्या, साहजीकच गोतावळा असा मोठा की ऐकुन भोवळ यावी, सांगायला सुरवात करु?


 
थोरली पिढी:  श्री.दादासाहेब (वकिलसाहेब, थोडेसे राजकारण), दादासाहेबांच्या पत्नी (काकु, किर्तन, प्रवचन आणि पुरणपोळी) , दादासाहेबांचे थोरले भाऊ अण्णा ( स्वातंत्र्य सैनिक- सांधेदुखी ,मोतीबिंदु आणि ताम्रपट ) , सौ. अण्णा (विहिनी, अहोरात्र बडबड),  दादासाहेबांच्या पाठचे- भाऊसाहेब (माजी पाटबंधारे खाते, पानाची चंची आणि तपकिर) , सौ. भाऊसाहेब ( विजयाकाकु, झंडुबाम), दादासाहेबांचे सर्वात धाकटे भाऊ दिनकरराव (संघवाले - आजन्म ब्रम्हचारी, इसबगोलचा स्टाक),  दादासाहेबांची थोरली बहिण (साठे आत्या, संसार झाला, आता कुठलेच पाश राहीले नाहीत, हरी हरी करायला नाश्का सारखी दुसरी चांगली जागा कोणती?  हा, आता सुनेशी पटत नाही हा मुद्दा गौण आहे) . वयाने ह्या सर्वांच्याच बरोबर आणि घरातीलच मानल्या गेलेल्या स्वैपाकाच्या लेलेआजी ( मऊसुत पोळ्या , वांग्याचे तुफानी भरित आणि भुतांच्या गोष्टी- नाश्कात त्याला काय तोटा म्हणा ) आणि जोडीला खानदानी नोकर काळु (गांधीटोपी)


दुसरी फळी: अण्णांचे सुपुत्र नाना (शिक्षक असल्याने 'सर') , सौ. नाना (शैलाताई, बालवाडी चालवतात), दादासाहेबांचे चिरंजिव धनंजय  (बँकेतले) , सौ. धनंजय (अमेय ची आई) , भाऊसाहेबांचे दोन चिरंजिव थोरला केशव (मिल्ट्रीत अस्तो, नेमका 'त्यावेळी' सुट्टी घालवायला कुटुंबा समवेत वाड्यातच होता), सौ.केशव (रमादिदी - माहेर इंदौर चे ना) . धाकटा गणेशा (रेल्वे, भुसावळ पोस्टींग, नेमका 'त्यावेळी' मित्राच्या मुलाच्या लग्नाच्या रिसेप्शन साठी नाश्कात आला होता)


तिसरी फळी: नानांचे चिरंजिव विवेक (एमएसईबी- कराटे पटु), सौ. विवेक (स्वाती, ब्युटीपार्लर) , आणि धाकटा संजय (सेल्सटॅक्स-इन्कमटॅक्स, अकाली टक्कल), सौ संजय (आसावरी, चायनिज डिशेस),  केदार - हा त्या मिल्ट्रीवाल्या केशवचा (ऍक्टींग मॉडेलिंग), सुनेत्रा ( केदारची बहीण, यंदा बघ्ताहेत जोरात), अमेय  बँकवाल्या धनंजयचे चिरंजीव ( इंजिनियरींग, बजरंगदल) , मनीषा (अमेय ची बहीण , टिव्हीएस स्कुटी),


आता चौथी फळी: रोहीत - विवेकचा हा थोरला आणि नितिश धाकटा, गौरी- ही संजयची (एका वरच थांबणार आहेत म्हणे).


'त्या वेळी' वाड्यावर आणखी ही काही नग वस्तीला होते! तुषार -  हा ब्यान्कवाल्या धनंजय च्या थोरल्या बहिणीचा ( मालेगाव ला दिली , सोमणांच्यात)  मुलगा - महिंद्राच्या इंटरव्हु साठी आला होता), जोग्ळेकर मामा (विमाएजंट, भाऊसाहेबांच्या ओळखीतले,  या एक-दोन दिवस म्हणताच डेरेदाखल झाले होते).


हं, आता, मुख्य पार्टी यानेकी (खल) नायिका वगळता सर्व पात्रांचा परिचय एव्हाना झाला असावा. अरे हो , एक पात्र राहीलेच की! मी स्वतः  ही हजर होतो ना 'त्यावेळी' तिथे!


मी कथालेखक, अमेयच्या आईचा धाकटा भाऊ,  म्हणजे अमेयचा मामा. मी तिथे नेमक्या कोणत्या कामासाठी गेलो होतो ते आता आठवत नाही, पण 'त्या दिवशी'  शनिवार होता हे मात्र नक्की, माझा ऊपास असतो ना ..


(पुढील भागात वाचा)