माझी बकरी ईद

मंडळी तुम्ही म्हणाल, आला अजुन एक धर्मांध ... नको त्या विषयावर काहीतरी स्फ़ोटक लिहून उगाच लोकांमध्ये भांडण लावणार नी स्वतः गायब!!!
तर मंडळी, माझा असला काहीच विचार नाही आणि हा लेख तसला काही प्रकार नाही... 


आता थोडे सांगायला सुरूवात करतो.
मी नुकताच आमच्या नविन घरी रहायला गेलो. साधरण एक महिना झाला असेल.
आमच्या इमारतीजवळ पोहोचण्यासाठी दोन रस्ते आहेत. एक सरळ मार्ग, म्हणजे सरकारने (कधी नव्हे ते!) बरेच कष्ट करून कॊंक्रीट रॊड बनवलाय.तर दुसरा साधा, पण जनतेने कष्ट करून बळकावलेला, थोड्याशा अडथळ्यांचा, "शॉर्टकट"! तो जातो एका जनता वसाहतीतुन!


बर आता सरळ मार्गाने जाणे आणि "शॉर्टकट" ने जाणे यात फ़रक किती पडणार, फ़ार तर २००-३०० मीटरचा...


शॉर्टकटने आल्यावर, अडथळ्याची शर्यत जिंकल्याचा आनंद मिळतो! तो भाग वेगळा.


रस्त्याचे एकुणच स्वरूप, २०फ़ूटी रस्ता. सगळ्यांनी अगदी न भांडता आपापसात वाटुन घेतलेला.  एका बाजुला छॊटीछॊटी घरे, दुसया बाजुला बऱ्याच गाड्या, सायकली, गॅरेज, कचरापेटी आणि बरेच काही.


घरे आहेत म्हणजे त्याला आंगण आलेच. तर ह्या रस्त्याचाच काही भाग आंगण म्हणुन ... चुकले की काय? त्यांच्या मते आंगणाचा काही भाग रस्ता!? म्हणून वापरला जातो. सरकारचे अतिक्रमण! ;)


घर झाले, आंगणही झाले. अहो मग आंगणात खेळायला कोणी नको का? आहेत ना!


तर या छोट्या घरातून छोटीछोटी बाळे दुडुदुडु याच अंगणात धावत असतात. त्यांच्या अनेक लिला तिथे चालु असतात. कोणी गोट्या खेळतो, कोणी भोवरे, वीटीदांडु, क्रिकेट, पतंग... एक ना अनेक खेळ. 


तरूण मुले, मोठी माणसे घोळक्याने रस्त्याच्या मध्यभागीच गप्पा मारत उभे असतात. आपण हॉर्न वाजवला तर आपल्याकडे अशा नजरेने बघणार की आपल्यालाच वाटले पाहीजे की यांना डीस्टर्ब करून आपण मोठा गुन्हा केलाय!


यात अजुन भर म्हणजे सगळी मंडळी एकदम पर्यावरणवादी, निसर्गप्रेमी प्राणीमात्रांवर अतिशय प्रेम!
प्रत्येकाकडे एक तरी प्राणी असलाच पाहीजे. या नियमाप्रमाणे,कोणाकडे कोंबड्या, मांजरे, कुत्रे, गायी आणि बकरी!


त्या दिवशी, असाच मी नेहमीप्रमाणे ऑफ़िसमधून लवकर घरी जायला निघालो. जवळ आल्यावर का कुणास ठाऊक, पण असे वाटले की अजुन "लवकर पोहोचू"! म्हणून मग दूरचा सरळ मार्ग सोडला आणि जवळचा "शॉर्टकट" पकडला!


मी निवांत चाललो होतो. सगळे कसे आलबेल होते. पण देवाच्या मनात काही वेगळेच होते!
एका कोपऱ्यात दोन बकऱ्या काहीतरी खात होत्या. आणि अचानक काय झाले कोणास ठावूक... दोघींमध्ये काहीतरी बिनसले आणि एकीने दुसरीला तिथुन पळवून लावले.


ती जी काही तिथुन पळाली आणि मला काही कळायच्या आत, थेट माझ्या दुचाकी गाडीच्या खाली...
वेग आधीच कमी असल्यामुळे मी सुदैवाने पडलो नाही आणि मला काही झाले नाही. गाडी जागच्या जागी थांबवण्यात मी काहीसा यशस्वी झालो होतो.


बकरी आतापर्यंत, बाजुला निघाली आणि भिंतीकडेने चालत पुढे जाऊ लागली होती. हुश्श्श!!! मी मनातुन घाबरलो होतो की गेली की काय? पण नाही ... वाचलो होतो मी!


तेवढ्यात माझ्या मगुन एक टमटम रिक्षा (डीझेलची शेअर्ड. पुण्यात स्वारगेट पासुन सुटतात/सुटायच्या, ६ सीटर) आली. आणि ड्रायव्हर खाली उतरला. वेगाने जाऊन त्याने त्या बकरीला पकडले, आणि जवळ घेतले. मी बघतच राहीलो.  म्हटले हा कोण, याला का तिचा कळवळ येवढा?


आमच्या नशीबाचे भोग काही सरले नव्हते! तो निघाला साक्षात बकरीचा मालकच! हम्म्म ! झाली का पंचायत. त्याने लगेच बकरी सोडली आणि मला धरले... :(  गाडीची चावी काढुन घेतली. आणि मला बकरी जवळ नेले.


पहातो तर काय? बकरी चक्क तीन पायावर चालत होती! एक पाय हवेत.


आता माझ्या मनात धडकी भरली ... मी आपला "माझी काही चूक नाही" पटवून देण्याचा प्रयत्न करत होतो... पण सर्व व्यर्थ!


जसे दोन गाड्यांचा अपघात झाला की काहीही झाले असले तरी "ज्याची गाडी मोठी त्याचीच चूक " तसेच काहीसे इथे होते.


मी गाडीवर होतो हाच काय तो गुन्हा!


जनतावसाहतींची एक खासियत आहे, ते नेहमी सगळे काही ना काही कारणाने एकमेकांशी बरेच भांडतात, पण जर का बाहेर चा कोणी असा कचाट्यात सापडला, की त्याची काही खैर नाही. मग सगळे एकत्र, आणि मग ती जनसमुदायची शक्ती समोरच्याचा काही विचार न करता त्याला पिसुन काढते. माझ्याही छातीत त्याच भीतीने धडधडत होते. भले चेहयावर मी आव आणला की माझे काही चूकले नाही, तीच मध्ये आली. पण आता सुटका नव्हती.


तर, आधी सांगितले तसे देवाला नक्कीच काही वेगळॆ अपेक्षीत होते. त्यांच्यातलाच एकजण पुढे आला नी माझी चौकशी केली. कोण कुठला वगैरे वगैरे. मग जरा मोठा आवाज काढुन सगळ्याना म्हणाला, "ए कोणी हात नाय लावणार, आजिबात नाय. मी बघुन घेतो काय ते. चला जावा आपापल्या घरी" 
मी एकदम चाट झालो. हा काय चमत्कार? बकरीचा पाय मोडला तरीही या लोकांनी आपल्या अंगाला हात पण लावला नाही आणि कोणी भ ची बारखडी म्हटली नाही... माझा जीव आता थोडा भांड्यात पडला!


मग त्या माणसाने मालकाला बोलावले आणि सांगितले, "हे सगळा खर्च देतील. काय असेल ते औषध पाणी असेल ते करून घे. पण एक सांगतोय कोणबी याना हात लावणार नाय!" 


तसा तो मालक, वस्तीमध्ये मारमारी भांडणे साठी एकदम लौकिक पावलेला.


पण म्हणतात ना "देव तारी ..." तसेच काहीसे.


मग मी, मालक आणि बकरी सगळ्यांची वरात त्यांच्या घराकडे चालू लागली.


आज सगळेच अनपेक्षीत घडत होते!
घरी पोचल्यावर चक्क एक कप चहा! मी ठार वेडा!!! आपल्या बकरीला उडवणायालाच चहा!


चहा झाला आणि मग मालकाने सांगितले की, "आमच्याकडे बयाच बकया आहेत. आणि त्यातलीच ही एक. पण जे झाले ते चांगले नाही झाले. आहो ती पोटुशी हाये!" 


मला एकदम धक्काच बसला. खूप वाईट वाटले. पण देवा शप्पथ सांगतो चूक माझी नव्हती.


मालक: हे बघा चूक कोणाचीबी असना आता दवापाणी करायलाच पायजे.


मी: ठीक आहे. तुम्ही खर्च सांगा मी देतो.


मला पु. लं. ची "म्हैस" आठवली. आणि झालेही तसेच.


त्या बकरीची खासियत, भरपूर दूध द्यायची, आता पोटुशी, दोन पिल्ले हूणार होती आणि ती सुध्दा बकरीच! (बोकड नाही! माणसाला, अशा प्राण्यांच्या पिल्लात मादी हवी असते, नराला फ़ार मागणी नसते. )


तर बोलता बोलता हजार रूपयांची मागणी आली...


बस! मी म्हटले हजार रुपयात तर नवी बकरी येईल की...खरा भाव काय मला काही माहीत नाही, पण "जे पण (खोटे) बोलायचे ते रेटुन बोलायचे" असा आपला स्वभावच! ;)


मग जरा मालकाची गाडी शांत झाली. नाय व्हय करता करता, ठरले की बकरीला दवाखान्यात नेताना मी बरोबर असायला पाहीजे.
मनात म्हटले , हजार रूपये देण्यापेक्षा बरोबर जाऊ नी जे काय असेल ते भागवू...


ठरले तर मग,... दुसया दिवशी मी त्यांच्याकडे जायचे नी मग सगळे मिळुन बकरीला दवाखान्य़ात न्यायचे.
-----------------------------------------------------------------


दुसरा दिवस उगवला. ऑफ़िसात कधी वेळेवर गेलो नाही, पण बकरीकडे अगदी राईट टाईम!
गेलो तर मालक गायब, अहो तो टमटम रिक्षा चालवतो ना...झाले. काल मी त्याला बोललो होतो तुझ्याच रिक्षातुन जाऊ. पण आज हा सकाळीच पळाला.
त्याचा छोटा भाऊ, वडील, मी आणि बकरी ! आता आम्ही तिघे जण तिला घेऊन जाणार होतो.
प्रश्न हाच की न्यायचे कसे? मी आपले पैसे वाचावे म्हणुन, माझ्या गाडीवर बसवून नेऊ ना. काय प्रॊब्लेम नाय! आणि सगळे कशाला जायचे, तुमचा छोटा मुलगा, मी  आणि बकरी !


छ्या छ्या! अस कुठ नेता. मी येतो ना बरोबर.  आमच्या बारक्याला काय कळतय, इती वडील.
मी आपला मुकाट गप्प! :(
मग त्यांनी बारक्याला एक रिक्षा आणायला सांगितले. मला वाटले गल्लीतलीच आणेल ओळखीची कोणाचीतरी. पण कसलं काय? त्याने जाऊन स्टॆन्डवरून चांगली "पेट्रोल" ची रिक्षा आणली.  मी घाबरत घाबरत मीटर बघीतले. ते चालू होते!


आयुष्यात स्वतःसाठी कधी स्वतंत्र रिक्षा केल्याचे आठवत नाही. कायम शेअर्ड, नाहीतर टमटम


मग आम्ही महत प्रयासाने तिला आत बसवले. नेमके तिचे तोंड मी जिकडे बसलॊ तिकडे आले.
सिंहगड रोड गणेश मळा पासुन आम्ही निघालो ते प्राण्यांचे सरकारी रुग्णालय जे कॆन्टॊनमेंट एरियात आहे तिकडे.


जाताना वाटेत सगळीकडे मुस्लिम लोक सजुन धजुन घोळक्याने चाललेले दिसले. म्हटले काय झालेय कुणास ठावूक. यांचे सारखे काही तरी असते. असो. मनातले विचार मनातच.


शिवाय बकरीचे तोंड माझ्याकडे. मध्येच ती उडी मारल्यासारखे करायची, मे मे ओरडायची... अजुन काय काय करायची...
मी आपला "प्रेमाने" तिच्या मानेवरुन, डोक्यावरून हात फ़िरवत होतो. आणि स्वतःला जमेल तेवढे आकसवून बसलो होतो, अहो बकरीला जागा हवी होती ना!


वाटेत एके ठिकाणी रस्ता बंद केला होता. आता डोके फ़िरायची वेळ आली. आधिच ऑफ़िसात जायला उशीर होत होता. त्यात आता हे रस्ते बंद. काही कळेना.
कसे बसे गल्लीबोळातुन रूग्णालयाजवळ पोचलो. आणि बघतो तर काय?


"आज बकरी ईद निमित्त रुग्णालयास सुटी राहील"


झाले! आज बकरी ईद होती तर !!!...


अहो देवाच्याच मनात असे होते की मी "बकरी ईद" अगदीच थाटात साजरी करावी!
साक्षात बकरीलाच घेऊन मिरवणुक काढुन!


मग पुन्हा तिथुन निघालो, ते कोथरूडला एका खाजगी दवाखान्यात गेलो. डॉक्टरने दिलासा द्यायचा तर कसला... सगळ्यांच्या देखत " अहो इच्या पायाचा भूगा झालाय. सपोर्टला प्याड बांधुन देतो. २००रू लागतील. नंतर सरकारी दवाखान्यत न्या. ऒपरेशन करायला लागेल."
झाले, वडलांच्या काळजात धस्स!! आता कस हुणार...


प्याड बांधुन घेतले. बकरीला परत रिक्षात बसवले.


मग त्यांना (वडील) कसे बसे शांत केले, समजावले आणि घरी पोचलो.


उतरल्यावर, रिक्षावाल्याने, वाकुन मीटर बघितले आणि कार्ड काढले...कधी नवे ते त्याच्याकडे कार्ड होते! आधीच धडधड वाढली होती, आता हा आकडा किती सांगतोय.... 


शांतपणे त्याने, ३०० रू झाले साहेब!


मी वेडाच!  तीनशे!!!


नाय व्हय करत मला त्याला ३०० रु द्यावेच लागले. बकरीला उतरवून घरी नेले.


आता माझी गाडीची चावी हवी होती. म्हणुन मी शांतपणे त्यांच्या मागे मागे... पण हे आपले आपल्याच नादात. एक नाय दोन नाय... गाडीचा विषयच नाही...
माझा संयम सुटायची वेळ आली. तरी शांतपणे. आता मी जातो. उशीर झालाय.


मग मालकाची गाडी पुन्हा रूळावर... लय चांगली बकरी, पोटुशी, पायचा भूगा...आता कस हुणार...


एव्हाना माझ्या  लक्षात प्रकार आला. मी अजुन एक १०० ची नोट काढली नी त्यांच्या हातावर टेकवली.
(मनात आले, नाही तरी ईदच होती किती बकया विकतात की...तेव्हा काही नाही वाटत यांना... पण हे सगळे मनातच)
(अजुन एक, १००० चे ६०० मध्ये भागले!)


मग कुठे तरी चावी दिसली... अजुन हुज्जत घातल्यावर चावी एकदाची हातात पडली...


लगेच गाडीला कीक मारली नी सूटलो एकदाचा!


तेव्हापासून  कानाला खडा, पुन्हा कधी या "शॉर्टकट" ने जायचे नाही...


(अवांतर:
१ - दिनांक ९ आणि १० जानेवारी २००६ या दोन दिवसात घडलेला हा किस्सा. १० ला बकरी ईद होती. म्हणुन शीर्षक "माझी बकरी ईद"


२ - महीनाभराने ती बकरी नीट चालू लागली आणि तिला पिल्लेही झाली. काय झाले तेव्हढे काही मी विचारले नाही. :)
)


--सचिन