कृपया कि जरा

हा मुद्दा तेवढा महत्वाचा नाही, पण बरेच दिवसांपासून माझ्या मनात आहे म्हणून लिहीतो :  मराठी मध्ये आपण "कृपया" हा औपचारिक शब्द का वापरतो? एरवी एवढे विनम्रपणाने वागणारे आपण नेहमीच्या बोलण्यात कधी कृपया वापरत नाही (तुम्ही अखेर कधी वापरलात ते आठवा).  म्हणजे आपण एकमेकांशी उद्धटपणे नाही तरी असंस्कृतपणे वागतो असा याचा अर्थ होतो का? नाही! कारण एरवीच्या बोलण्यात आपण 'जरा' हा शब्द त्याच अर्थाने वापरतो. उदा. 'जरा मीठ दे गं आई' किंवा 'जरा सरकता का?'.


असं असेल तर मग 'कृपया' ह्या औपचारीक शब्दाची गरज काय?


ता.क. ह्याच्याशी निगडीत एक किस्सा सांगितल्याशिवाय रहावत नाही. अमेरिकेत वाढलेल्या एका ८-१० वर्षांच्या मुलानी आपल्या आजोबांना विचारलं की 'काय हो आजोबा, मराठीत यू आर वेलकम ला काय म्हणतात?' आजोबांनी लगेच उत्तर दिलं --- 'फ़ुटा आता! असं म्हणतात'