चारित्र्यसंपदनासाठी (आधुनिक) व्रते

माणसाच्या कर्माचा दुहेरी परिणाम होत असतो; एक बाह्य जगावर व दुसरा त्याच्या स्वतःवर. सत्कर्माच्या सातत्यांतून त्याचे चारित्र्य घडते.


चारित्र्य चुंबकत्वासारखे असते. चुंबक ज्याप्रमाणे कोणतीही हालचाल किंवा आवाज न करता सभोवतालचा परिसर प्रभावित करतो व त्यांत येणाऱ्या लोहकणांना आकर्षून घेतो त्याचप्रमाणे चारित्र्यवान माणूस त्याच्या सान्निध्यांत येणाऱ्या माणसांना नुसत्या आपल्या अस्तित्वाने प्रभावित करतो. त्याच्या समोर येणाऱ्या कोणासही दुर्वर्तन करायची बुद्धीच होत नाही.


चुंबकीय पदार्थांतील विस्कळित अवस्थेंत असलेले असंख्य रेणूचुंबक जेव्हा संरचित होतात तेव्हा त्यांत प्रभावशाली चुंबकत्व येते. त्याचप्रमाणे सत्कर्माच्या सातत्यामुळे माणसाचे विचार संरचित होऊन तो चारित्र्यवान होतो. सातत्याने केले जाणारे सत्कर्म म्हणजेच व्रत. आपल्या परंपरेंत जी व्रते सांगितली आहेत त्यांचा उद्देश माणसांच्या हातून सत्कर्मे व्हावी व ती चारित्र्यसंपन्न व्हावी हा असावा. पण कर्मकांडाच्या अवडंबरांत या मूळ उद्देशाचे विस्मरण होऊन देवाच्या कृपेने सुखप्राप्ति व्हावी यासाठी व्रते करायची असतात असा गैरसमज निर्माण झाला असावा.


व्रत करतांना काही कष्ट व त्रास अपरिहार्य आहे, कारण स्वतःच्या संवयी, भोवतालची परिस्थिति व कळत नकळत इतर माणसे त्याच्या आड येण्याची शक्यता असते. पण व्रतांतील सातत्यामुळे या अडचणी पार करण्याची क्षमता वाढते व प्रतिकूल शक्ति क्षीण होत जातात.


आपले आयुष्य कृतार्थ व्हावे असे वाटत असेल तर माणसाला चारित्र्य संपादनाची गरज आहे. व्रतपालनांतून हे साध्य होईल. त्यासाठी आधुनिक काळांतील माणूस करू शकेल अशी (धार्मिक अवडंबरापासून मुक्त) काही व्रते सुचवावीशी वाटतात.


१) खरे बोलणे व दिलेले वचन पाळणे - यामुळे समाजाचा फायदा होईल व व्रत करणाराची विश्वासार्हता वाढेल. शिवाय त्याचे वास्तवाचे भान व वचनपूर्तीची क्षमताही वाढेल. काही काळाने अशा माणसाच्या वचनाला एक प्रकारचे वजन प्राप्त होईल.


२) हक्काच्या गोष्टींचा इतरांसाठी त्याग - यांत सरकारी नोकरींत असलेला माणूस व्रत म्हणून ठराविक काळ किरकोळ रजेचा त्याग करू शकेल. किंवा एका विशिष्ट कालावधींत ऑफिसमध्ये ज्यास्त काम करावे लागले तरी ओव्हरटाइमचे पैसे घेणार नाही. यातून देशाला अधिक मनुष्यतास मिळतील व जनतेचा पैसा वाचेल.


३) याशिवाय कुठल्याही परिस्थितींत कितीही त्रास झाला तरी सदसद्विवेक बुद्धि जागृत ठेवून न्याय्य बाजू उचलून धरणे, आपल्यापुरता तरी भ्रष्टाचार थांबविणे, अशी आणखी काही व्रतेही सांगता येतील.


वरील सूचना काहींना हास्यास्पद वाटण्याची शक्यता आहे. पण जितक्या मोठ्या प्रमाणावर लोक धार्मिक व्रते करतात तितक्या मोठ्या प्रमाणावर वरील व्रते लोक करू लागले तर समाजाला त्याचे लक्षांत येण्यासारखे फायदे होतीलच शिवाय परिस्थिति सुधारण्यासाठी आपणही काही करू शकतो असा विश्वास व्रते करणाऱ्यांमध्ये निर्माण होईल.


चारित्र्यसंपन्न समाज घडविण्याच्या दृष्टीने वरील सूचना आपणास कितपत व्यवहार्य वाटतात?