मुद्रा राक्षसाचे विनोद-१

मुद्रा राक्षसाचे विनोद (मुरावि) अर्थात छपाईतील दोषांमुळे निर्माण होणारे विनोद ही विनोदाची एक नवीन शाखाच आहे. मी वाचलेले/ऐकलेले काही विनोद खाली देत आहे.'मनोगत' संस्कृतीच्या मर्यादेत बसणारे आणखी 'मुरावि' येऊ देत.

१) द.मा. मिरासदारांचा किस्सा.
 हा किस्सा मा.द.मा. मिरासदारांनी काही वर्षापूर्वी डोंबिवली येथील एका भाषणात सांगितला होता.
अनेक वर्षापूर्वी द. मा. एका वृत्तपत्रात नोकरी करत होते.एका बातमीत वाक्य होते की 'मा. शरद पवार यांचे विमानतळावर आगमन झाल्यावर त्यांना २५ सुवासिनींनी ओवाळले.' छापताना हे वाक्य 'मा. शरद पवार यांचे विमानतळावर आगमन झाल्यावर त्यांना २५ सुवासिनींनी आवळले.' असे छापल्या गेले! हे ऐकताच त्या दिवशी सभागृहात हास्याचा स्फोट झाला.
तो जरा विरतो न विरतो तर 'द. मा'नी आणखी एक स्फोट केला. ते म्हणाले 'अहो, शरद पवार यांचे ' आकारमान' लक्षात घेता आवळायला २५ जणी लागणारच!'
यानंतर उसळलेल्या हास्याने सभागृहाचे छत कोसळायचेच बाकी होते.


२) एका मंत्र्याच्या आजारपणा विषयक बातमीत असे छापले होते.
'वार्ताहर सदर मंत्र्यांना भेटण्यासाठी गेले असता ते गाढव शांतपणे झोपले होते.'
(मूळ वाक्य होते 'वार्ताहर सदर मंत्र्यांना भेटण्यासाठी गेले असता ते गाढ व शांतपणे झोपले होते'.)


 


(जयन्ता५२)