समाजाचा विकास कसा होतो?

नमस्कार,


येथे अनेक प्रदेशातील आणि जगातील अनेक प्रांत पाहिलेले लोक आहेत. जगभ्रमंतीने अथवा अनुभवाने आपली समाजाविषयी काही मते तयार होतात. त्यापैकी मला आज समाजाच्या विकासाची कारणे हवी आहेत.


समाज विकास म्हणजे काय? हा वाद नको म्हणून मी या चर्चेची पार्श्वभूमी देण्याचा प्रयत्न करतो. महाराष्ट्राचा पुर्वेकडचा भाग म्हणजे विदर्भ ! हा भाग इतर महाराष्ट्राच्या , विशेषत: पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीने मागे आहे. मागे म्हणजे येथे औद्योगीक विकास नाही,दरडॊई उत्पन्न कमी आहे,शिक्षणाच्या आणि पर्यायाने नोकरीच्या संधी कमी आहेत. शेती कायम तोट्यात आणि आता तर परिस्थीती अधिकच भयावह होत आहे. एक तर पाणी पडत नाही आणि पडले तर या वर्षीसारखे भरपूर की जी रोपटी रुजलीत ती कुजून गेली.


शेतकायांच्या आत्महत्या, मेळघाटाचे कुपोषण , गडचिरोलीचे नक्षलवादी आंदोलन आदी अनेक प्रश्न आऽ वासून उभे आहेत. सहकार रुजत नाही, सरकार बधत नाही, तरुणांना उमेद आहे पण लोक प्रतिनीधी अथवा जेष्ठ लोक त्याला विधायक वळण देताना दिसत नाहीत.


यात काही आशेच्या गोष्टी म्हणजे आता समाजातून स्वत:हून समोर येऊन कामे होताना दिसत आहेत. मेळघाट आणि गडचिरोलीला लोकसहभागातून कामे होताहेत. सामाजीक चळवळीतून उदयास आलेले बच्चू कडू सारखे नवीन राजकिय नेतृत्व लाभते आहे. पण हे अजूनही प्रायोगीक स्तरावत म्हणावे एवढे लहान आहे.


मी जेव्हा पश्चिम महाराष्ट्रात फिरतो तेव्हा एक संपन्नतेचं चित्र दिसतं. मात्र जेव्हा याप्रदेशाने 'विकास करायचा असे ठरवून' वाटचाल केली असेल. तेव्हाचा, सुरवातीचा काळ तर नक्कीच कठीण असेल ना ? कारण नैसर्गीक संपत्तीत विदर्भ महाराष्ट्रात सर्वात श्रीमंत होता आणि आहे, मग तरी सुध्दा हा मानवी विकासाचा असमतोल का? कदाचीत कुठेतरी सामाजीक जडणघडण वेगळी असावी.सामाजीक जाणीव वेगळी असावी आणि ती 'त्या' पहिल्या पिढीने 'जीने' हा विकास करण्याचे स्वप्न पाहिले त्यांनी ही मुल्ये समाजात जाणीवपुर्वक रुजवीले असतील. तो प्रवास कसा झाला असेल?


यावरून अनेक प्रश्न निर्माण होताहेत. मी जेव्हा मुंबईत जातो तेव्हा वातावरणात सर्वत्र एक उर्जा असल्याचा भास होतो. मुंबईकरांची जगण्याची धडपड आणि त्यासाठी ५:१७ ची स्लो आणि ११:३ची फास्ट अश्या चर्चा. आदी सर्वांचा एक सार्वत्रीक प्रभाव असा दिसतो की प्रत्येकाला एक व्हिजन आहे - विकास ! स्वत:चा विकास!! मुंबईकर भारताचा अथवा समाजाचा विचार करीतच असेल असं नाही पण पर्यायाने समाजाचा आणि भारताचा विकास तर होतोच आहे ना? निदान असा स्वत:चा विकास करण्याची किमाण चेतना तरी कशी जागवता येईल?


पुण्यात असल्यावर या शहराच्या संस्कृतीचा आणि ती संस्कृती निर्माण आणि सांभाळ करण्याच्या जवाबदारीचं जे भान पुण्याला आहे , त्या बद्दल नक्कीच नवल वाटतं. संस्कृती सांभाळनं म्हणजे अगदीच काही अठराव्या शतकात जावं लागत नाही. एकविसाव्या शतकाशी जुळवून घेऊन नव्हे;  त्यात अग्रेसर राहून सुध्दा आपली संस्कृती जपता येते हे पुण्याकडून शिकावं. विदर्भाला आपली एक संस्कृती आहे आणि संस्कृती जतन करण्यासाठी काही तरी स्वत:हून करावं लागतं याचं भान काही साहित्यीकांना आणि त्यांच्या पुस्तकांनाच तेवढं असल्याचं जाणवतं.


काय करावं? जातींपातीच्या जेष्ठश्रेष्ठतेत विदर्भाच्या सहकाराचा बळी गेला. राजकारणी इथून तिथून सारखेच, पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणी आंब्याचं झाड लावतात ते मोठं करतात आणि आंबे खातात , पण निदान त्या झाडाची पाने लोकांपर्यंत पोहचतात.विदर्भातील राजकारणी आंब्याचं रोप लावतात, त्याला पाने लागताच ओरबाडून खातात, मग ते रोपच करपतं. लोक शहारतात आणि पुन्हा कुठलंच रोप लावल्या जात नाही. कुणी लावण्यास गेलाच तर त्याला विरोध होतो. आमच्या कित्येक सहकारी सुत गीरण्या ज्यांचं बीजभांडवलच आमचे राजकारणी गडप करून बसलेत. त्या या विधानाची सत्यता पटवतील.  सगळीच निराशा ! सगळीच हताशा !!


पण... पण आता एक आशा आहे. आता जो विदर्भाचा तरुण आहे तो मात्र आता पुढं सरसावतोय. जो जिथं असेल तो तिथून काही तरी करू इच्छीतो. शिक्षणासाठी, नोकरीसाठी घर सोडून बाहेर गेलेले तरूण.आपल्या विदर्भासाठी काही करत आहेत. विदर्भातील तरूण प्रत्यक्ष काम करायला सरसावले आहेत. त्यांच्यात उमेद आहे,उत्साह आहे. आता मात्र हा प्रयोग फसायला नको... येत्या १० वर्षात विदर्भाचा कायापालट व्हायला हवा. त्यासाठी हवी असलेली जागृती होते आहे. याला दुर्दैव म्हणा अथवा काहीही... पण वेगळ्या विदर्भाची चळवळ सुध्दा ही जाणीव जागृत करण्याकरीता सहाय्यीभूत झाली आहे. अर्थात सामान्य विदर्भीय जनता हा राजकारण्याचा खुर्ची बचावाचा प्रकार आहे हे पुरतं जाणून आहे.


आता गरज आहे ती अनूभवी लोकांच्या सल्ल्याची. कुणाला काही सुचतंय का? जे काही असेल जसं काही असेल तसं. पण कामात येईल असं. आम्ही वाट पाहतो आहोत. तुमचा अनुभव आणि अनुभवातून आलेलं शहानपण आम्हाला पुन्हा पुन्हा त्याच चुका करण्यापासून थांबवेल. येथे काही महत्वाच्या सुचना आल्यास विदर्भातील वर्तमानपत्रांतून त्या प्रकाशीत करून सर्वत्र पोहचवण्याचा मानस आहे.


नीलकांत