मराठी अदभुत कथा

नुकतेच द्वारकानाथांचे मराठी अदभुतरम्य कादंबर्‍यांबद्दलचे पोस्ट वाचले. या प्रकारच्या कादंबर्‍या मराठीत गेल्या काही वर्षात प्रसिद्ध झालेल्या नाहीत हे खरे, पण मराठी अदभुत/गूढ कथालेखकांमध्ये नारायण धारप, रत्नाकर मतकरी, आणि जुन्या लेखकांमधले द. पा. खांबेटे यांची नावे आवर्जून घ्यावी लागतील. धारपांचे गूढकथा, भयकथा, विज्ञानकथा संग्रह, त्यांच्या समर्थकथा अतिशय वाचनीय आहेत. त्यांचे १-२ वर्षांपूर्वी आलेले 'चेटकीण' हे पुस्तक मी गेल्या काही वर्षात वाचलेल्या उत्तम गूढ कादंबर्‍यांपैकी एक आहे. 


रत्नाकर मतकरींचा 'खेकडा' हा कथासंग्रहदेखील उत्कृष्ट आहे. त्यांचे इतर काही कथासंग्रह (रंगांधळा, कबंध) पण चांगले आहेत.


द. पा. खांबेटेंनीही प्रत्यक्ष घडलेल्या काही अदभुत गोष्टींवर कथा लिहील्या आहेत. त्यांचा 'अदभुताच्या जगात' हा संग्रह खिळवून ठेवणारा आहे.


सारांश काय, की अदभुतरम्य कथांचे मराठीतले दालन अजूनही बंद झालेले नाही, मात्र हे ही खरे की या विषयावर सातत्याने चांगले लेखन करणारे नवीन लेखक आले नाहीत, तर त्याला लवकरच कुलूप लागेल.