समाज

रूढींत गुंतला हा सगळा समाज आहे
काही न बदलणे हा इथला रिवाज आहे!


रस्त्यांत बांधलेली असतात देवळे, वा
रस्त्यामधेच कोणी पढतो नमाज आहे


होतात उत्सवांचे आवाज कर्णभेदी
बहुतेक देवसुद्धा बहिराच आज आहे


मी विनवले कितीदा त्यांना परोपरीने
त्यांना परंपरांचा भलताच माज आहे!


शोधू नकोस तूही आता उपाय येथे
धर्मांधळेपणावर कोठे इलाज आहे?


(विसरू कसे तुला, अन् ठुमरी प्रिये तुझी ती...
अजुनी मनात तू, अन् ओठी खमाज आहे!)


- कुमार जावडेकर, मुंबई


[प्रेरणा - माझीच येथे ही गझल]