चीनमधे मधुबाला!

चीनच्या दौऱ्यात कधी थकून जाईपर्यंत घावाधाव तर कधी सहा नाही वाजले तर हॉटेलवर परत! अशा वेळी जर युह्वान वा रुई आन सारख्या शहरात असलो तर दूरचित्रवाणीवर सगळे स्थानिक वाहिन्यांचे चीनी भाषेतले कार्यक्रम आणि हॉटेलमध्ये खोलीवर आंतरजालाची सोय नाही. आपल्याला तर लवकर झोपायची सवय नाही. शिवाय इथून घरी दूरध्वनी करायचा तर साडेदहा तरी वाजायला हवेत म्हणजे तिथे घरी आठ वाजलेले असतील आणि सगळी मंडळी घरी आलेली असतील. मग वेळ घालवायचा कसा? सगळ्याच वेळी उनाडायला बरोबरचे चीनी लोक रिकामे असतीलच असेही नाही. मग यावेळी बरोबर दहा पंधरा तबकड्या घेतल्या.


काल दगदग झाली होती. सकाळी पैचिंग ते हंगझौ असे दोन तासाचे उड्डाण, मग हंगझौचे काम मग पुन्हा तीन-सव्वा तीनशे किलोमीटरचा गाडीचा प्रवास करून युह्वानला आलो. हॉटेलमध्ये सामान टाकले, मग मंडळींबरोबर बाहेर जेवण मग गावात एक फेरफटका असे करून नऊ-साडेनऊ झाले. थकवा आला होता. खरेतर पान ला भारतीय चित्रपट, नायिका आणि गाणी यांची बरीच उत्सुकता निर्माण झाली होती, पण काल त्याला बरोबर घेऊन जाणे जीवावर आले होते. आज तसा आराम होता. बाराला काम संपले. मग जेवण वगरे उरकून दीड वाजला. पुन्हा त्या मंडळींना त्यांच्या कचेरीत काही काम होते ते आटोपून मग अडीच-पावणे तीनच्या सुमारास निघालो आणि साडेपाचच्या सुमारास अडीचशे किलोमीटरचा प्रवास पार पाडून रुई आन ला दाखल झालो. जरा पडलो, आळसावलो आणि सायंकाळी सातला जेवायला उतरलो. पान पैचिंगपासून आमच्या बरोबर होताच. इथे जेवायच्या वेळी आम्हाला भेटायला स्थानिक कारखान्याचे लोक आले होते. साडेआठ्ला जेवण संपले. पान आणि त्या तिघांचे आपापसात काहीतरी बोलणे झाले. मग पान म्हणाला, आज आम्हाला भारतीय चित्रपट पाहायचाच आहे बरे! मीही आनंदाने होकार दिला.


पावणे नऊला मैफल जमली. पान, शू, वांग आणि मी. मी सर्वांना सांगितले की माझ्याकडे माझ्या आवडीच्या जुन्या गाण्यांच्या आणि चित्रपटांच्या तबकड्या आहेत, तुम्हाला आज काही मी नवे चित्रपट दाखवू शकत नाही, मात्र पुढील वेळी मी तुमच्यासाठी नव्या जमान्यातले चित्रपट नक्की आणेन. माझ्या खोलीवर येताच मी संगणक बाहेर काढला. तत्काळ उत्साही लोकांनी सांगितले की आण इकडे, त्याची जुळवा जुळव आम्ही करतो. तू आधी त्या तबकड्या काढ. मी तबकड्यांचा गठ्ठा काढताच सगळे कुतूहलाने जमले. नक्षत्रांचे देणे, लता, आशा, कन्यादान, सुवासिनी, मेरा साया, जहाँ आरा, मदन मोहन, तलत, रफी, रफी-लता, सचिनदा, मधुबाला, देव आनंद अशा अनेक तबकड्या मंडळींनी निरखायला सुरुवात केली. पैकी फक्त पानला इंग्रजी येत होते. शू व वांग त्याला विचारणार, तो मला विचारणार व मग मी उत्तर दिल्यावर तो त्यांना सांगणार असा कार्यक्रम सुरू झाला.


सर्वानुमते 'मधुबाला' पाहायची ठरली. आधी प्रत्येकाने आपापल्या परीने 'मधुबाला' हा शब्द उच्चारायचा प्रयत्न केला. शू ला एकदम बरोबर जमला! त्याचे कौतुक करताच खूश होऊन त्याने च्युंग वन मध्ये म्हणजे चीनी भाषेत आनंद व्यक्त केला. मग प्रश्नोत्तरे सुरू झाली. मधुबाला म्हणजे काय? ती कुठे असते? गेली तर कशी गेली? वगरे. तबकडी चढवताच मंडळी सज्ज होऊन पडद्याकडे नजर रोखून बसली. 'हावडा ब्रिज' चे आइये मेहेरबान सुरू झाले. मग ही काय करते आहे? तो त्या टेबलवर कोण बसलाय? तो पाइप ओढतोय तो कोण असे नाना प्रश्न सुरू झाले. मध्येच, वा! ही भारतीय मुलगी फारच सुरेख आहे अशी कबुली देऊन झाली. मग मधुबालाने अशोक कुमारच्या जवळ जात त्याच्या हातातली सिगारेट काढून घेताच वांग मान डोलवून जोरात हसू लागला व टाळी देत म्हणाला, अगदी बरोब्बर! माझी बायकोसुद्धा कधी कधी माझ्या हातातली सिगारेट अशीच काढून घेते. ताबडतोब शू डाफरला, अरे पण ही मधुबाला आहे, बायको नाही. हिने सिगरेट काय अख्खे पाकीट काढून घेतले तरी काही वाटणार नाही. अर्थात हे त्यांचे चीनी भाषेत व मग पान तर्फे माझ्यापर्यंत येत होते.


'जिंदगी भर नही' सुरू होताच प्रश्न आला, 'ही तुरुंगात आहे का?'. नाही. मी सांगितले. ती बाजेमागे उभी असल्याने तसे दिसते आहे. मग कॅमेरा दूर जाताच त्यांना समजले. मग पुढचा प्रश्न, 'ही दुखी का दिसते?' माझे उत्तर, तिला तिच्या प्रियकराचा विरह होतोय म्हणून. इतक्यात भारतभूषण अवतरला. हा कोण? मी उत्तरलो 'तिचा प्रियकर'. व्वॅ! एकदम तीव्र प्रतिक्रिया आणि निषेध उमटले. इतकी सुंदर मुलगी ह्याच्यावर प्रेम का करेल? आता मी काय उत्तर देणार? म्हटले की बरोबर आहे, पण आम्हा असंख्य शौकिनांना हाच प्रश्न काय पडत आला आहे. मग 'सब कुछ लुटाके' झाले. मग 'चांद रात' सुरू झाले. ते संपले मग पुन्हा हावडा ब्रिज - 'ये क्या कर डाला'̮ लगेच सवाल आला - या दोघांची जोडी दिसते, मग त्यांनी लग्न का नाही केलं? मी समजावले, की त्याच्याशी नाही तर त्याच्या भावाशी केले. भाऊ कोण? पुढचा प्रश्न. तितक्यात हाफ टिकट चे 'मानो या ना मानो' सुरू झाले आणि मी याची देही याची डोळा त्यांना तिचा पती दाखवला. मात्र दुसरा भाऊ तिला अधिक शोभला असता असे त्यांचे एकमत झाले.


आता कुणाला काय शंका येईल याचा काय नेम? नाचताना तिच्या पायात चपला का नाहीत? मी उत्तर दिले ती घराखालच्या बगिच्यात आहे, त्यामुळे नाहीत. लगेच दुसरा प्रश्न, मग त्याच्या पायात का आहेत? मी ताबडतोब सांगितले की तो आत्ताच बाहेरून आलाय ना, हिने त्याला दारातच गाठला की! हे मात्र पटले. पुन्हा एकदा मधुबालाच्या सौंदर्याची तारीफ झाली. इतक्यात 'गुजरा हुआ जमाना' सुरू झाले. ताबडतोब प्रश्न 'हे तर वाळवंट आहे, तुमच्या देशात तर खूप पाऊस पडतो असे तू सांगतोस.' मग माझा खुलासा 'आमचा देश चीन सारखाच खूप मोठा आहे त्यामुळे हिरवळ, वाळवंट, बर्फ वगरे सगळे काही आहे.' या हवामानाच्या निरस चर्चेमुळे पान चा रसभंग झाला. तो त्या दोघांवर जोरात डाफरला. बहुधा त्यांच्या भाषेत, 'वाळवंट असेल नाहीतर बर्फ, तुझं काय जातंय? दिसतेय ती बघून घे की' असे काहीतरी असावे.


आता महल मधील 'आयेगा आनेवाला' सुरू झाले. मग पुन्हा प्रश्नोत्तरे. मग मी थोडी कथा सांगायचा प्रयत्न केला. मी रहस्यकथा, तो बघायला जाईपर्यंत ती कशी गायब होते ते सांगत होतो, तोवर काळे मांजर पळताना दिसले. 'रहस्य कथा आहे म्हणजे तीच मांजर झाली असेल' असा तर्कही ऐकायला मिळाला. तबकडी संपली तरी मंडळींच्या डोक्यातून मधुबाला जात नव्हती. ती काय नेसली होती? इतका लांब कपडा (साडी) कसा गुंडाळतात? त्याला फार वेळ लागत असेल? कपाळावर ठिपका सगळ्या भारतीय बायका लावतात का? सगळ्या भारतीय मुली सुंदर असतात का? एक ना अनेक. मग मधुबालाच्या सौंदर्याची पुन्हा प्रशंसा करत आणि उद्या निंगबो ला गेल्यावर पुन्हा दुसरी तबकडी पाहायचा वायदा घेत मंडळी खुशीने बाहेर पडली. आणि मी मनोगतावर आलो.