अशी ही बनवाबनवी (भाग पहिला)

      मी बँकेच्या माटुंगा शाखेत नुकतीच बदलून आले होते. सस्पेंस डिपॉझिटचे लेजर चाळत असताना माझ्या लक्षात आले की दर महिन्याच्या पहिल्या तारखेला जान्हवी कुलकर्णींच्या खात्यात काही रक्कम भरली जाई. पण स्लिपवर जो खातेक्रमांक लिहिला जाई तो कुण्या बीना शहानीचा असल्यामुळे 'खातेक्रमांक व नाव जुळत नाही' या कारणास्तव ती रक्कम सस्पेंसमध्ये ठेवली जाई. अशा  कुलकर्णींच्या नावाच्या २०-२२ नोंदी होत्या. सस्पेंसमधल्या रकमेवर खातेदाराला व्याज मिळत नाही म्हणून मी जान्हवीचा अकाउंट नंबर शोधण्याचे ठरवले. अनुक्रमणिकेत तिचे नाव नव्हते. इतर सहकाऱ्यांनासुद्धा तिची काही माहिती नव्हती. शेवटी मी जान्हवीच्या नावे एक पत्र तयार केले. त्यात फक्त पेइंग-इन स्लिपच्या काउंटरफॉईल्स घेऊन तिला भेटायला बोलावले आणि ते पत्र मी बीना शहानीच्या पत्त्यावर पाठविले.
      ४-५ दिवसांनी जान्हवी काउंटरफॉईल्स व पासबुक घेऊन आली. ती आल्यावर उलगडा झाला की जान्हवी पूर्वाश्रमीची बीना शहानी . लग्नानंतर तिने नाव बदलण्यासाठी अर्ज केला होता असे तिचे म्हणणे होते. काय झाले कळले नाही पण तसा बदल तिच्या खात्यात झाला नव्हता. तिच्या कडच्या काउंटरफॉईल्स तपासल्यावर मला धक्काच बसला. सस्पेंसमध्ये असलेली रक्कम ही काउंटरफॉईलवर लिहिलेल्या रकमेच्या बरोबर निम्मी होती. तिच्याकडे असलेल्या पासबुकात काउंटरफॉईल्सवरच्या सगळ्या रकमांची नोंद होती.खात्यात रकमा जमा न होता त्यांची पासबुकात नोंद कशी झाली याचे मला आश्चर्य वाटले. मी लगेच ३-४ महिन्यांच्या पहिल्या तारखेची स्लिपबंडले मागवली.(दिवसभरात बनवलेल्या स्लिपांचे संध्याकाळी एक बंडल बनवले जाते.) जान्हवीच्या स्लिपांवरचे आणि काउंटरफॉईल्सवरचे अक्षर एकच होते. मी सुटकेचा निःश्वास सोडला. याचा अर्थ या बनवाबनवीत बँकेतल्या कुणाचा हात नव्हता.
      चौकशी केल्यावर असे कळले की पैसे भरायला नेहमी जान्हवीचा नवरा येत असे.पठ्ठ्याने बँकेच्या 'कॅश रिसिव्ड' छाप्याशी हुबेहूब मिळणारा छापाही बनवून घेतला होता. जान्हवीला खरा प्रकार कळून चुकला होता. विश्वासाच्या माणसाने फसवावे आणि ते तिऱ्हाईत माणसासमोर उघडकीला यावे याचे तिला फार दुःख झाले. तिचा तो काळवंडलेला चेहरा पाहून मलाही खूप वाईट वाटले.
      या घटनेनंतर वर्षभराने एक तिशीतली मुलगी माझ्याकडे आली आणि म्हणाली,"मी अमरनाथच्या यात्रेला चालले आहे. जगात माझ्याशिवाय आईला आणि आईशिवाय मला कुणीही नाही. प्रवासात माझं काही बरं वाईट झालं तर आईची आबाळ होऊ नये म्हणून मला तिचे नाव माझ्या अकाउंटमध्ये जोडायचे आहे. त्याचे मला फॉर्म द्या."
      माझा आतला आवाज मला सांगत होता की काहीतरी गडबड आहे. मी अकाउंट बघितला तर शिल्लक काही खास नव्हती. मी तिला म्हटले," ठीक आहे. तुमच्या आईला घेऊन बँकेत या. मग सगळे फॉर्म भरून घेऊ.
      "माझी आई बिछान्याला खिळलेली आहे. तुम्ही मला सगळे पेपर द्या. मी तिची सही घेऊन येते ना"
       मी म्हटले,"तुमची आई बँकेत येऊ शकत नसेल तर आमचा माणूस तुमच्या घरी पाठवू.पण सही आमच्या समोरच झाली पाहिजे."
      हे ऐकल्यावर ती खूप चिडली.बँक कर्मचाऱ्यांवर नेहमी जे ताशेरे झाडले जातात ते झाडून ती निघून गेली. थोड्या वेळाने चीफ मॅनेजरांनी बोलावले म्हणून त्यांच्या केबिनमध्ये गेले तर ही बाई तिथे बसली होती. चीफ मॅनेजर म्हणाले,"या बाईंना त्यांच्या खात्यात आईचे नाव ऍड करायचं आहे. आपला माणूस पाठवण्यात फार वेळ जाईल. तेवढा वेळ त्यांच्यापाशी नाही. त्यांना फॉर्म देऊन टाका."
      सत्तेपुढे शहाणपण नसते.मी निमूटपणे फॉर्म देऊन टाकले. ते घेऊन ती बाई माझ्याकडे विजयी हास्य फेकत निघून गेली. ती गेल्यावरही मी चीफ मॅनेजरांना सावध करण्याचा एक निष्फळ प्रयत्न केला.पण ते म्हणाले,"तिच्या अकाउंटमध्ये ती आपल्या आईचं नाव घालतेय. आपल्याला काय रिस्क आहे?"
दुसऱ्या दिवशी ती बाई फॉर्म घेऊन आली.तिच्या आईचे नाव तिच्या खात्यात जोडले गेले.
      महिन्याभराने एक साठीच्या घरातली बाई माझ्याकडे आली.तिने मुलीसोबत एक डिपॉझिट रिसीट रिन्यू करायला पाठवली होती. माझ्याकडे ती  रिन्यूड रिसीट मागत होती. नावाखेरीज दुसरी काहीही माहिती ती देऊ शकत नव्हती.
खूप शोधाशोध केल्यावर असे आढळले की रिसीट रिन्यू होण्याऐवजी अकाउंटला जमा झाली होती आणि तिचे पैसेही काढून नेले होते.ती बाई म्हणाली,"माझं या बँकेत खातंच नाही."
      मग माझ्या लक्षात आले की आदल्या महिन्यात जे खाते जॉइंट करण्यात आले  होते ते हेच खाते होते. मुलीने आईला फसवून तिच्या सह्या मिळवल्या होत्या. आपल्या खात्यात तिचे नाव जोडले होते आणि नंतर तिच्या नावचे डिपॉझिट आपल्या खात्यात जमा करून पैसे काढले होते. अमरनाथ यात्रा वगैरे सब झूठ होते.त्यावेळी आईची अवस्था बघून मला जान्हवी कुलकर्णीची आठवण झाली. 
                 वैशाली सामंत.