माणूस नावाचा बेटा-१

'हिरवे रावे' या जी.एं. च्या कथासंग्रहातील 'माणूस नावाचा बेटा' ही जी.एं. ची एक जगावेगळीच कथा. १९५९ साली 'सत्यकथे' त प्रसिद्ध झालेली ही दीर्घकथा मुळातूनच वाचावी अशी आहे. जमेल तशी ती इथे टंकून देण्याचा प्रयत्न करतो आहे.


दत्तू जोशीने पाचच मिनिटापूर्वी घड्याळाकडे पाहिले होते हे खरे, तरी त्याने अस्वस्थपणे पुन्हा तिकडे पाहिले. हा शेवटचा तास सुटायला अद्याप तब्बल दहा मिनिटे आहेत हे पाहून त्याचे मन मरगळले. तो अधिरपणे उभा राहिला व वेळ काढण्यासाठी अंग खाजवू लागला. खडू उचलण्यासाठी तो बाजूला सरला, आणि अखेर त्या मुंग्यांच्या रांगेवर त्याचा पाय पडलाच. पीरीयड  सुरु झाल्यापासून काळजी घेऊन शेवटी व्हायचे ते झालेच. तोंडात एकेके अंडे धरून जाणाऱ्या वारेमुंग्यांची एक रांगच आज वर्गात प्रकट झाली होती. दरवाजातून टेबलाखालून भिंतीकडेने जात मागे कपाटाजवळच्या फटीतून बाहेर. दत्तूने खाली वाकून पाहिले. वीतभर जागा चिरडलेल्या मुंग्या व अंडी यांनी भरली होती.मुंग्यांच्या वेड्या घाईत थोडा खंड पडला. रांग तुटली. पुष्कळशा मुंग्या भोवती जमल्या. चिरडलेल्या मुंग्या त्यांनी तोंडात उचलल्या.तेवढी जागा बाजूला टाकून रांग साधली गेली. तोच पुन्हा घाईघाईचा अनिवार्य प्रवास सुरु झाला. एक मुंगी, एक अंडे, काळा ठिपका, पांढरा ठिपका, काळा, पांढरा...
शेणाने सारवलेली, पण न लोटलेली, पोपडे निघालेली जमीन. समोर पानपट्टी, सिगारेटची दुकाने, व त्यात नेहमी चकाट्या पिटीत बसलेली कोल्हापुरी माणसे. त्या शाळेला एखाद्या गोडाऊनची बकाल कळा होती. लोखंडी दुकानात जुन्या लोखंडाचा ढीग टाकतात, तसे वाटे तिच्याकडे पाहून. पण हेडमास्तर मात्र तिच्याविषयी बोलताना नवी पिढी, राष्ट्राचे भवितव्य, शिक्षणं परमो धर्म: इत्यादि बोलत, सगळ्यांपुढे पातळ कणकेप्रमाणे हसत, व नंतर दहावी- अकरावीमधल्या पोरांना शिकवणीला येण्याबद्दल दमदाटी करत. तेथील बहुतेक सगळेच मास्तर शिकवणीलक्ष्मीधरच होते म्हणा. घाटेपरुळेकरही घ्यावेत, आणि शिकवण्याही कराव्यात!
समोर कळकट किंवा जादा आगाऊ चेहऱ्याची पोरे. दत्तू त्या वर्गाला भूगोल शिकवीत असे. पण त्या तासाला जाताना बर्मिंगहॅम कुठे आहे ते आधी बघून जात असे.मग जणू काय इंग्लंडचा कानाकोपरा पायाखाली घातल्याप्रमाणे निर्लज्ज खात्रीने पोरांना ते गाव दाखवायला जात असे. 'मी सर, मी सर' काही पोरे चित्कारत पुढे येऊन कान खाजवीत, घामट अंगाचे भपकारे टाकीत नकाशाजवळ येऊन उभी रहात. पहिल्या बाकावरील कंटाळलेल्या चेहऱ्याच्या मुली वेण्या पुढे आणीत, रिबने कुरवाळीत. रस्त्यावरच्या मोटारींनी मिनिटामिनिटाला अर्धा शेर धूळ आत शिरत असे आणि सतत नासके फळ खात राहिल्याप्रमाणे दत्तूचे मन शिसारत असे.
(अपूर्ण)