माणूस नावाचा बेटा-८

"ह्या: ह्या: ! नमस्कार! नमस्कार!" कोणी तरी अगदी त्याच्याजवळच खिस्स केले. तो चमकला व त्याने मागे वळून पाहिले. तो संतापला नाही, तो जास्त शरमला. हातात नेहमीची पिशवी घेऊन केतकरशास्त्री उभे होते. जोडलेला हात तसाच ताटकळत ठेऊन ते पुन्हा तेलकट हसले. कॉलर एकदम आवळ झाल्याप्रमाणे त्यांनी आपल्या उंटमानेला दोन्ही बाजूंनी दोनतीन वळसे दिले. त्यांच्या हसण्यात जो मेंगटपणा होता तो बघून काळ्या घोड्याच्या पोटातही ढवळू लागावे! दत्तूला तर आपल्या हिंदी चित्रपटातील नायिकांचे फिल्मी पतीप्रेम सोडले, तर साऱ्या जगात इतके ओशट, मळमळ निर्माण करणारे काहीच नसेल असे वाटे. त्याला अनेकदा संतापाने वाटे, हे हसणे म्हणजे एखाद्या अवघड जागी खाजत असताना नखांना नेमकी जागा सापडावी तसले भळभळीत वेडेविद्रे आहे. तो हताश झाला. शास्त्रीबुवाकडून आता सुटका नाही हे त्याने ओळखले.


"का? फार दिवसांनी गाठभेट?" एक चार मिनार पेटवत त्याने विचारले. गेल्या शनिवारीच त्यांची भेट झाली होती.
"ह्य: ह्य: काही नाही, आपला सल्ला घेणार होतो. आपण विद्वान, आपला व्यासंग दांडगा...."
दमून गेल्याप्रमाणे दत्तूने धूर सोडला. बाबारे, हा सारा तमाशा कशाला? पहिले चार अंक काढून टाक आणि ये शेवटच्या अंकाला. किती पैसे पाहिजेत बरे?
"इथंच बसू की. आपलं काय?" म्हणत शास्त्रीबुवांनी पायरीवरच आसन ठोकले. बुवा फार नम्र. कुणी तरी जाजमावर, खुर्चीवर बसा म्हटले की नाही, ते कोपऱ्यातच वासराप्रमाणे ढोपरे मोडून वहाणाझाडणीवर बसतील. मग कोपऱ्यात ठेवलेली छत्री मोडली, किंवा आत जाताना मोलकरीणेनी ठेवलेली तिळतेलाची बाटली सांडली, तरी हरकत नाही.
"इथं नको, चला त्या हिरवळीवर बसू" अतिशय शरमून दत्तू म्हणाला.
"वा, तर चला" बुवा म्हणाले. "आपलं काय धरणीमाताच आहे. जन्मलो तिथं, जाणारही तिथंच!"
दत्तूला चारमिनार कंपनीविषयी फार कृतज्ञता वाटली. त्या कडक धुंदीत असले शेवग्याच्या झाडातून डिंक ठिपकल्याप्रमाणे चिकट शब्द ऐकू येत नाहीत, अंग मलीन करीत नाहीत. दत्तू बऱ्याच अंतरावर बसला. बुवांनी पिशवी धरणीमातेवर टाकली व उगाचच इकडेतिकडे उत्कटपणे पाहिले. ही सारी लक्षणे नेहमीचीच होती, व त्यांचा दत्तूला चांगला परिचय होता. समोरील ख्रिश्चन स्मशानभूमी, दूरचे दिवे, वरील दोनचार चांदण्या यातून नाही म्हटले तरी चमचाभर मंगल बुवा काढणार! मांगल्य म्हणजे तर शास्त्रीबुवांचा अगदी हातखंडा. म्युनिसिपालिटीचे साफसफाई पथक डी ड़ी. टी. मारत जाते त्याप्रमाणे ते ठिकठिकाणी पचक पचक मांगल्य टाकत जात असत. आणि तेही विशिष्ट शिक्क्याचेच मांगल्य बरं का! आपल्या संस्कृतीत अगदी हातमोज्यात हात बसवल्याप्रमाणे बसणारे शास्त्रीबुवा भयंकर संस्कृतिवाले. टमरेल घेऊन जाताना ते उजव्या हातात असावे की डाव्या हातात असावे हे ते संस्कृतीला वाट पुशीत ठरवत असत. एक पतंग पंधरा मिनिटे उडत ठेवण्याइतका लांब उसासा त्यांनी सोडला व ते म्हणाले, "सगळीकडे मांगल्य भरून राहिलं आहे."


दत्तो व्यग्र झाला. तो चिडला नाही, संतापला नाही. साईसुट्ट्यो म्हटल्यावर लपणाऱ्याला शोधून काढायला निघावे, त्याप्रमाणे त्याचे मन भरकटू लागले‌. सगळीकडे! बैलाच्या पाठीवरील ते वाहाते, लाल आवाळू? सुलभाचे प्रेत? भिकाऱ्याची सडलेली बोटे, एकाकी बसलेली मुलगी, जाताना नुसती हाडे ठेवणारा भारतीचा आजार? बहिणीने सहन केलेली लाथ? दादांची उघडी छाती? सद्या परटाच्या मुलाच्या मांडीवरील डागण्याचा डाग? सगळीकडे? अगदी भरून उतू जातंय?


'ऑं? काय म्हणालात?" त्याने दचकून विचारले.
"नाही म्हटलं, माझ्या पुस्तकाचा माझ्या बांधवांना काही उपयोग आहे का?" बुवा विचारीत होते. त्यांचा आपला नम्र प्रयत्न, बालके कर जोडुनि केलेला. सेवा गोड मानून घ्यावे वगैरे. पण त्यांचे पुस्तक - ते कसल्या तरी आख्यानांचे होते- विशेष खपले नव्हते.पण जनतेसाठी सारे जीवन. त्यात कसली प्रसिद्धीची पैशाची हाव? आणि त्यात आपले आहे तरी काय स्वतःचे? देवाने दिलेली देणगी, धन्याघरचा माल, आपण हमाल.
"उपयोग आहे की! नाही कसा?" जवळजवळ खेकसूनच दत्तू म्हणाला. आहे उपयोग डोंबलाचा! उपवर मुली फोटो काढून घेताना हात वर ठेवायला बाजूला एक पुस्तक घेतात, तसले म्हणून कायम उपयोग आहे! किंवा रात्री मांजर खडखड करताना कोपऱ्यात भिरकावण्यासाठी.
"उद्याच्या रविवारी मी मुलांना कथा सांगणार आहे. तेवढाच एक दिवस आनंदात जाईल माझा. मुले ही देवाची फुले! आनंदाने जगचि डुले" बुवा आता चक्क हुंदका देणार असे त्याला वाटले. कारण त्यांचे शब्द तर अश्रूंनी भिजलेच होते. बुवा पंधरवडा महिन्याने कथा सांगत. कुठेही. मुले बसतील तेथे. मुले बसतील त्या धरणीमातेवर. आभाळाच्या निळ्या छायेखाली. देवाच्या हिरव्या चवऱ्यांच्या छायेत.


'विशाल पवित्र हिमालयाच्या पायथ्याशी गाढवाची दोन पिले होती. एकाचे नाव माणिक (मानेला उजव्या बाजूला हिसका), दुसऱ्याचे नाव मोती (आता डाव्या बाजूला हिसका). फार फार प्रेमळ. एकत्र हसायची, एकमेकांच्या खांद्यावर खांदा टाकून खूप रडायची, मने शुद्ध करून घ्यायची. असा जिव्हाळा, तसा जिव्हाळा. फार प्रेमळ, गोजिरवाणी, अगदी तुमच्यासारखी..."


आणि या असल्या गोष्टी कुणापुढे? तर घरी, पुस्तकात फक्त सेन्सॉरशमनार्थच वस्त्रार्थे किंचित चड्डी घातलेल्या अमेरिकन नटींचे पौष्टिक फोटो ठेवणाऱ्या पोरांपुढे!
घरी शास्त्रीबुवांना सात आणि दहा वर्षाच्या दोन सुरेख मुली होत्या. जाईजुईसारख्या त्या अगदी नितळ स्वच्छ असायच्या, आणि सदा हसायच्या. बाहेरून आल्यानंतर त्यांना दारात पाहिल्यावर कुणालाही एकदम ताजेतवाने वाटावे. पण त्या बाकीच्या मुलींत मिसळताना फाटक्या कपड्यांमुळे शरमून जात. सुधाने एक दिवस त्यांना घरी चहाला बोलावले तर एक कप चहाच्या उपकाराखाली त्या अगदी दडपून गेल्या. लाज लाज लाजल्या. पण त्यांना कधी शास्त्रीबुवांनी जवळ घेऊन गोष्टी सांगितल्या नाहीत. कारण काय, तर देशासाठी झिजणाऱ्याला बायकामुले, खाजगी आयुष्य काही नसते. आठदहा वर्षे झाली त्यांना अलीबाबा, अल्लादीन ही नावे माहीत नव्हती, अंगावरील काडी झटकून टाकावी त्याप्रमाणे कवचकुंडले देऊन टाकणाऱ्या कर्णाची हकीकत माहीत नव्हती. कमळाप्रमाणे जमिनीतून वर आली आणि विजेप्रमाणे भूमीत गेली, त्या सीतेचा जीवनवृत्तांत त्यांना ठाऊक नव्हता. आपली छोटी मुलगी जयू, हिच्या गालाला अतिशय आकर्षक खळी पडते, तिचे हसणे ओठावरच न रहाता तिचे गालही हसतात हे तरी बुवांना माहिती होते की नाही कुणास ठाऊक. आई व मुली सारख्या पत्रावळी लावीत, पडलेसडले काम करीत, जुने कपडे मिळवीत. नवनव्या पिशव्या, छत्र्या घेऊन शाळेला जाणाऱ्या मुलांकडे, अविश्वासाने, हेव्याने पाहात. शास्त्रीबुवांना नोकरी नव्हती. क्लबमध्ये पस्तीस रुपयांची पार्टटाईम कारकुनाची नोकरी त्यांना मिळाली असती, पण तेवढा वेळही त्यांना पस्तीस रुपड्यांसाठी व्यर्थ जावा असे वाटले नाही. पण दत्तूला वाटले, बुद्ध, ख्रिस्ताला मानवी जीवन बदलता आले नाही, ते महत्कार्य जरी बुवांनी करून दाखवले तरी त्या दोन मुलींच्या शरमेमुळे ते कायम गुन्हेगारच ठरतील.


'उद्या मी जी कथा सांगणार आहे, " बुवा सांगत होते, " ती आहे एका फेरीवाल्याची. मोठ्या दुकानातून माल घ्यायचा, गल्लोगल्ली हिंडून विकायचा. अत्यंत सज्जन. दरिद्री, पण सोन्याच्या मनाचा.पण त्याला नाव काय द्यावे ते मला समजेना. नाव कसे असावे तर संस्कृतप्रचुर, गंगाकाठचे, कन्याकुमारीच्या छायेतले--"
चिकट गुळाच्या ठिपक्याप्रमाणे शब्द ठिपकत होते. एका अजस्त्र चिकट कोळ्याच्या जाळ्यात सापडल्याप्रमाणे दत्तूचे मन धडपडू लागले, अंग झटकू लागले. तो गुदमरू लागला.
"'हो, मग त्याला तुम्ही अग्निमित्र का नाव देत नाही? " त्याने चिडून विचारले.
"वा, छान आहे नाव!" उत्साहाने पुढे सरकत बुवा म्हणाले, "पण एक नम्र प्रश्न. अग्निमित्रच का?"
"म्हणजे संस्कृतमध्ये कुणीतरी अग्निमित्र म्हणून मालविक्या आहे ना? " जळजळीत डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहात दत्तू म्हणाला. बुवा गोंधळले व वरमले. दत्तूला वाटले, आता शेवटचा अंक येणार. बुवा उगाचच खोकणार (ते खोकले) आता मान वेळावीत ते हसणार - (ते हसले) व शेवटी दोनचार रुपये उसने मागणार. बुवांनी तीन रुपये उसने मागितले. रविवारी मुलांना चणेमुरमुरे द्यायला. दत्तूच्या खिशात एखाददुसरा आणा असेलनसेल. उद्या सकाळी घरे न राहाण्याचे ठरवून त्याने शास्त्रीबुवांना सकाळी आठ वाजता येण्यास सांगितले व आपली सुटका करून घेतली.


"तुम्ही अग्निमित्र म्हणालात ना? नाव छान आहे. बरं उद्या आठ वाजता येतो मी" जाताजाता तीनदा नमस्कार करून बुवा म्हणाले.

(क्रमशः)