माणूस नावाचा बेटा-४

आत उकाडा विलक्षण होता. आपण लाह्या फुलवायच्या गाडग्यात बसलो आहो, असे दत्तूला वाटू लागले. आता आपण बर्फाळ प्रदेशात असायला हवे होते. टिंग टिंग घंटा वाजवीत जाणाऱ्या गाडीतील संगीत हवे होते. बर्फावरून स्लेज घसरत जात आहे. आपल्या हाती कुणाचा तरी हात आहे. (सुधेचा की रेखेचा?) व रेनडियरच्या गळ्यातील घंटा टिंग टिंग वाजत आहेत. जिंगल बेल्स ,जिंगल बेल्स, जिंगल थ्रू द आईस... आणि मग हळूहळू गोठलेल्या गडद काळ्या आकाशावर एकेक चांदणीचा कशिदा उमटत जातो.
पण या चित्राने काही उकाडा कमी झाला नाही. दत्तू उठला व काउंटरजवळ आला. त्या वेळी त्याच्या हालचालीत विशिष्ट धूर्तपणा आला. त्याने मुद्दाम बाजूला ठेवलेला आणा बाहेर काढला व ऐटीत टेबलावर टाकला. पायरी उतरून जाताना त्याने हळूच मागे पाहिले. काउंटरवरच्या माणसाने आणा गल्ल्यात फेकल्यावर त्याला हायसे वाटले. कारण तो आणा साफ खोटा होता. पानपट्टीवाला, परीट, भाजीवाली यांच्याकडून तो ताबडतोब परत आला होता आणि आता त्याने मोठ्या शिताफीने उडप्याच्या गल्ल्यात तो खपवला होता. त्याला थोडा आनंदही झाला कारण कुणा एकाला तरी त्याने हातोहात फसवले होते! पंधरा दिवसांपूर्वी त्याने सुधेसाठी वारभर कापड घेतले. "रंग ना साहेब! त्याची काळजीच सोडा. रंग जरा हलला की कापड परत घेऊन या. आम्हाला असं फसवून कसं चालेल? धंदा आहे, पुन्हा गिऱ्हाईक यायला पाहिजे." पहिल्याच धुण्यात डोणभर पाणी शाईसारखे झाले; व कापड मांजराच्या कातड्यासारखे! ते कापड दाखवताच दुकानदाराने खांदे उडवले. "आम्हाला जसा माल येतो, तसा विकतो," तो पुटपुटला व त्याने 'एक वारवाले गिऱ्हाईक गेले मसणात' असा चेहरा केला. नंतर काल फर्स्ट क्लास म्हणून त्या बाईने दिलेले कलिंगड ऍनिमिया झालेले निघाले. कुठले तरी पदक मिळालेला महान राष्ट्रीय चित्रपट भिकार शेंबडा निघाला. एका तासापूर्वी आणलेला बल्ब लावताच फटदिशी खलास झाला. आठ दिवसात भारतीचा ताप उतरेल म्हणून स्कूटरवरून ऐटीत आलेल्या डॉक्टरने सांगितले नंतर पंधरा दिवस भारतीने डोळे उघडलेच नाहीत. खेळायला म्हणून दिलेले आठ आण्याचे नाणे तसेच मुठीत ठेऊन ती गेली. दत्तूने तिच्या वाळल्या चेहऱ्यावरून हात फिरवला, डॉक्टरचे बील दिले आणि भारतीच्या खेळण्याची पिशवी वर अडकवून टाकली. सारीकडे फसवणूक, फसणारा एकटा. जत्रेत स्टॉलस निरनिराळे, फसणारे गिऱ्हाईक एकच.
छान जिरली उडप्याची! - त्याला वाटले.
पण त्याचे भित्रे कोंबडीमन उगाचच उडू लागले, संस्काराची पिंजर फुगवू लागले. काही लाज नाही वाटत? कपभर चहा पितोस आणि खोटा आणा देतोस? होय. देतो खोटा आणा! त्या उडप्याने तरी चांगला चहा दिला आहे कशावरून? काल वापरलेली भुकटीच त्याने वापरली असेल. मग काय चुकले त्याला बुडवण्यात? बुडवणार, हज्जारदा बुडवणार.
दत्तू स्वत:शीच हसला, व आपण आपलीदेखील कशी झक्क केली असे त्याला वाटले.
आज काय होते कुणास ठाऊक, पण त्या रामेश्वर रस्त्यावर सर्वत्र रोषणाई होती. कुणाची जयंती-मयंती, कसला तरी उद्घाटन समारंभ. इमारतीवर विजेच्या दिव्यांच्या माळा पेटल्या होत्या, व हिरव्या निळ्या रंगांचे दिवे टिपटिपत होते. मूठभर चुरमुऱ्यांसाठी माणसांची झुंबड उडाली होती. दुसरा एक घोळका बावळट, सामुदायिक चेहऱ्याने रबरी मान ताणताणून वर पहात होता. काय पाहात रहातात ही माणसे? ड्रमवर दणादणा काठी आपटून हवेच्या चिंध्या उठवणारा बँडवाला पाहून,प्रचंड आवाज करीत फुटणाऱ्या फटाकड्या पाहून त्यांची कोणती भावना तृप्त होते? तसे पाहिले तर  त्या दिव्यांच्या माळांतही फारसे आकर्षक काही नव्हते, मग निव्वळ आवाजाचे आकर्षण का बरे इतके? बारशाला ताशांच्या आवाजात यायचे व टिमकीचा आवाज घेऊन जायचे, हे आपले आयुष्य आहे म्हणून?
तो त्या घोळक्यात शिरला व एकदम धक्काबुक्कीत पडला. कुणीतरी त्याची बोटे नाल मारलेल्या वहाणांखाली सावकाश संपूर्णपणे चिरडली. त्याचा चष्मा नाकावरून घसरला‌. समोरची माणसे, दिवे , दुकाने पुसल्यासारखी झाली, व फक्त खूप आवाजाच्या स्पंजात उभारल्यासारखे त्याला वाटू लागले. सारे आयुष्य चष्म्याच्या काडीच्या आधारे लोंबू लागले. त्याने धडपडत चष्मा पुन्हा बसवला या गर्दीत आपला निभाव लागणार नाही हे त्याने ओळखले. समोर कुणाचा तरी अनामिक जाडजूड पंजा होता. त्यावर त्याने चिडून सिगारेटचे थोटूक चिरडले, व तो मागे वळला.  डाव्या हाताकडील बोळाने गेल्यास मुख्य रस्त्याला जाता येत होतेपण कोपरा वळून येतो, न येतो तोच थबकला. तेथील दोनचार बंद दुकानांच्या कट्ट्यावर अगदी कोपऱ्यात एक बाई बसली होती. मध्यमवर्गातील, स्वच्छ कपड्यांची. वास्तविक तो कट्टा चांगला अर्धा फर्लांग तरी असेल, पण ती बाई दिव्याचा थोडाही प्रत्यक्ष अंगावर पडला तरी अंग भाजेल अशी अगदी अंग चोरून कोपऱ्यात बसली होती, व तिचा चेहरा चुरगाळल्यासारखा दिसत होता.पण त्याचे मन चरकले ते तिचाबरोबर असलेल्या छोट्या मुलीकडे बघून. तीदेखील आपल्या आईला अगदी चिकटून बसली होती, आणि तिचा मांडीवर डोके ठेवून शांतपणे समोरच्या प्रकाशाकडे, लोकांच्या गर्दीकडे पहात होती. इथे काही तरी चुकत आहे अशी एकदम दत्तूची भावना झाली. समोर इतर लोक मोहरीच्या दाण्याप्रमाणे घोळले जात आहेत, मग याच दोघी शापित असल्याप्रमाणे त्या वर्तुळाबाहेर का? जिथे मोठी माणसे, लहान मुलांप्रमाणे वागत आहेत, खिदळत आहेत, तिथे ही छोटी अशी गप्प गोठल्यासारखी का? काय त्यांच्या मनात जळत आहे? कसला आघात झाला आहे त्यांच्यावर? दूर सिनेमाची जाहिरात वाजली की जेवण सोडून भारती धाडधाड जिना उतरत असे, व रस्त्यावर धिंगाणा घालीत असे. आणि ही मुलगी अशी मनाची? आयुष्याच्या सुरुवातीलाच? मागच्या दिव्यांच्या प्रकाशात अंधारवडावर बसलेले दोन पक्षी. का? काय? कसे?
तो बेचैन झाला. फारच. त्या बाईच्या चेहऱ्यात व आपल्या बहिणीच्या चेहऱ्यात थोडे साम्य आहे हे ध्यानात येताच तर तो व्याकुळ झाला. सरळ घरी जावे, व दिवा न लावताच स्वस्थ अंथरुणावर पडून रहावे असे त्याला वाटू लागले. सोन्याच्या अत्यंत नाजूक साखळीला जपावे तसे त्याने तिला जपले होते. थोडे कर्ज काढून तिचे लग्न एका ओव्हरसियरशी करून दिले होते. पण त्या घरी दत्तू जर कधी गेला तर दूध घालायला येणाऱ्या गवळ्यापेक्षा कधी जास्त किंमत त्याला त्या मंडळींकडून मिळाली नाही. त्याची बहीण सारखी राबत असे. पाचदहा माणसांचा डोळा चुकवून कधीतरी त्याला चहाचा एखादा कप देत असे. एकदा टी सेटमधील किटली फुटली, म्हणून तिच्या नवऱ्याने तिला दत्तूसमोर लाथ मारली. बहिणीने त्याला बाहेर जायला सांगितले म्हणून बरे. नंतर तासभर त्याचे हात संतापाने थरथरत होते. तिला मूल होईना. अखेर त्या मंडळींनी तिला दत्तूकडे पाठवून दिले. तिला मुलांची इतकी आवड की आटवल भरवण्यासाठी भारतीला तिचा अंगावरून ओरबाडूनच काढावे लागे. ती वर्षा-दीड वर्षातच वारली. जवळजवळ हृद्रोगानेच. शेवटी तिने दत्तूच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. मुद्दाम बोलावून आणलेल्या नवऱ्यालाही - त्या नवऱ्यालाही- तिने अशक्त हातांनी नमस्कार केला होता. कुणाच्याही आयुष्याला नंदादीपाप्रमाणे उजळू शकली असती, ती बहीण अशीच स्वतःच्या अंधारात वठून गेली होती. त्या आठवणीने दत्तूच्या डोळ्यांच्या कडा उष्ण ओल्या झाल्या, व तो उगाचच वेड्यासारखा लगबगीने चालू लागला.
थोड्या वेळाने तो रस्त्याला आला, व त्या नेहमीच्या गर्दीत त्याला स्वतःपासून सुरक्षित वाटले. चौकात तो नेहमी जेथे पुस्तके घेत असे, तो बुकस्टॉल होता. सहज जाता जाता त्याने शोकेसमध्ये 'पेटन प्लेस' हे पुस्तक आहे की नाही पाहिले. होय, ते अद्याप तिथे होतेच. ते त्याला फार दिवसांपासून विकत घ्यायचे होते. पण पूर्वीचे दहा रुपये दिल्याखेरीज पुन्हा उधारी मिळेल की नाही याची त्याला शंका होती. त्या पुस्तकाचा विचार करीत असतानाच त्याने कपाळावर हात मारला, व सुटकेचा मार्ग कुठे आहे की काय हे तो हताशपणे पाहू लागला. पण आता फार उशीर झाला होता.