ह्यासोबत
आपल्याच तंद्रीतून दत्तू भानावर आला त्यावेळी त्याला एकदम आश्चर्य वाटले. वास्तविक आता त्याला घरी जायचे होते. पण नेहमीच्या सरावाने पाय क्लबच्या रस्त्याला लागले होते. खिशात पैसा नसल्याने रमी खेळण्याचा प्रश्न नाही, व रमी नाही म्हटल्यावर जादा सिगारेट घेण्याची जरूरी नाही. तो पुलावरून डाव्या बाजूला वळला व त्याने सरावाप्रमाणे पुलाकडे पाहिले. होय, तो नेहमीचा महारोगी भिकारी तेथे होताच. त्याच्याकडे पहाताच अंगावर शहारे येत. बोटे तुटलेले आंधळे हातपाय हलवत तो याचना करी, एखाद दुसरे नाणे मिळाले की चाचपडत बसकुराखाली सरकवी. अंगावर माशा घोंगावत, एखाद दुसरे कुत्रे अंगावर भुंके. बाजूला दोन काळुंद्री पोरे डोक्यात माती घालून खिदळत, व त्या साऱ्यांच्या मागे लाल ज्योतीप्रमाणे दिसणारा तरणाताठा गुलमोहोर वाऱ्यात हलताच वाळलेली पानेफुले टपटपा खाली पडत. जवळून जात असताना दत्तूने अंग चोरले, व स्वतः महारोगी असल्याप्रमाणे तो अगदी दुसऱ्या कडेने चालू लागला. पण जाताना त्याने हळूच डोळ्याच्या कोपऱ्यातून त्या रोगट संसाराकडे पाहिले व तेवढ्यातही ती गोष्ट त्याच्या नजरेतून सुटली नाही. त्या भिकाऱ्याच्या बाजूला बसलेली, कराकरा डोके खजवणारी बाई गरोदर होती.
मऊ, बिलबिलीत बेडकीवर पाय पडल्याप्रमाणे दत्तू आकसला. ते दृष्य आठवणीतून काढून टाकण्याचा त्याने प्रयत्न केला, पण नाही. त्याला एकदम पारोसे वाटू लागले. मनात गांडुळांचे वारूळ फुटल्याप्रमाणे तो मलिन, अस्वस्थ झाला. बोटे नसलेले हात, आपल्या मागे असली रोगट रोपटी लावीत येणारे वासनेचे काळे क्षण. सुलभेचे प्रेत वर काढले त्या वेळी ते देखील टमाम फुगले होते. हातपाय फुग्यासारखे दिसत होते. अशी रेखीव ती, पण आता तिला आकार राहिला नव्हता. तीही म्हणे गरोदर होती. विश्वासाने तिने कुणाच्या छातीवर डोके ठेवले कुणास ठाऊक! प्रत्येकाला प्रत्येकाचा संशय येत होता, आणि आत, अगदी आत, शरीर तापवणारा हेवा वाटत होता. तिच्या आईबापांना शरमेने मान वरती करायला जागा उरली नाही. त्यांच्याजवळ नोटांची पत्री करावी इतका पैसा आहे. पण सुलभेने आपल्या हाताने आयुष्य चिरडून टाकले. आणि ही भिकरीण विटक्या पातळाखालून उद्याचा महारोगी जाहीरपणे मिरवीत गुलमोहराच्या लाल छत्रीखाली बसते! आणि आपल्या बहीणीला मूलही झाले नाही. त्याच पृष्ठभागावरील हे सारे बुडबुडे! लोकांच्या शिव्याशापात आंधळा हात वर करून जगणारा भिकारी, त्याची रेषा पुढे वाढवणारी गरोदर बाई, तेच आयुष्य विषारी वस्त्राप्रमाणे भिरकावून मुक्त होणारी सुलभा; नवऱ्याला हात जोडणारी बहीण, आवाळूतील लालवेदना घेऊन हाडे झिजवणारा बैल, उद्याच्या मृत्यूची चिंता न करणारा किंग, आणि जे घडणार नव्हते ते घडवण्याचा प्रयत्न करून, पुन्हा शेवटी निशीगंधाचीच फुले देऊन "मी जाते" म्हणून खालच्या मानेने निघून जाणारी, सारे आयुष्य जखमेप्रमाणे सहन करणारी रेखा, आणि त्यांच्याबरोबर वहावतीला लागलेला, हा एकशेचाळीस रुपयेवाला, दोन मुलांचा बाप दत्तू जोशी, इंग्रजीचा स्कॉलर, तत्त्वज्ञानाचा एम.ए., आपल्या कॉलेजचा पहिला फेलो, आज ऐपत नगद दोन आणे!
आभाळाचा पिवळसर रंग केंव्हाच मावळला होता व ते आता धुरकटल्यासारखे दिसत होते. क्लबसमोरील हिरवळीवरून जाताना गवताची पाती चरचरत, पायाची बोटे ओलसर होत, व त्यामुळे चिरडलेल्या बोटांवर फुंकर पडल्याप्रमाणे वाटे. सारे मैदान वर काचपात्र घातल्याप्रमाणे स्वच्छ, नीरव होते. पट्ट्यापट्ट्याचे गंजीफ्रॉक घातलेली दोन मुले काही तरी अगदी मन लावून बोलत उभी होती व एक तारेच्या तुकड्याप्रमाणे वाकून गेलेली म्हातारी झुडुपांकडेने काटक्या शोधीत सरकत होती.
क्लबरूम सिगारेटच्या धुराने भरून गेली होती, व त्यातून नेहमीचे चेहरे अस्पष्ट दिसत होते. उकाड्याने आत कुंद वाढे, व ठिकठिकाणी अस्ताव्यस्त झालेल्या उघड्या कॉलरी दिसत. तेथे दत्तूला हायसे वाटले. सारे ओळखीचे, परिचयातले. एकाच तणाव्याने ताणलेली माणसे. पै काय, आणा काय, पालथ्या पत्त्यातून कसले भवितव्य निघते याच एका धगधगीत उत्सुकतेने सारे टांगलेले. मनाचे खाजगी कोनोकोपरे, तेथील त्रस्त करणारी भावनांची गुंतवळ फेकून देऊन पडद्यावरील चित्रांप्रमाणे अगदी सपाट होऊन बसलेली ही माणसे. दत्तूने एक खुर्ची ओढली व त्या वर्तुळाच्या कडेला तो बसला. आज तो खेळण्याविषयी उत्सुक नव्हताच. काल तेथे त्याचे श्राद्ध झाले होते. असाच एक दिवस येतो कधी तरी. त्या महारोग्याच्या आंधळ्या बोटांसारखा. हात लावावे ते पान भलतेच निघते. आपण आपले आयुष्यच सारे तासा दोन तासात जगत असल्याप्रमाणे, काही जमत नाही, काही कळत नाही. पण असे कडेला बसणे हे ठीक. साऱ्यांची सुखदु:खे, ईर्षा या भावना समजतात. लठ्ठ देशपांडे मध्येच थरथरत्या हाताने सिगारेट का पेटवतो, हे समजते. डॉक्टर वास्तविक खुर्चीत उशी फेकल्याप्रमाणे बसणारे, पण ते मध्येच का ताठ बसतात हे पहाता येते. सहाजणांचे जीवन प्रत्येकी आपणाला जगता येते- साऱ्यांपासून अलिप्त राहूनही. नेहमी खादीचे बेंगरूळ कपडे घालीत असल्यामुळे खादीच्याच अंगाचा दिसणारा मोरे, विशेष कधी कुणाशी जमवून न घेणारा हिरवट प्रोफेसर, जरा डाव वाईट आला की साऱ्या क्लबला मीठमिरी न घालताच खाऊ करणारा वकील, वुलन पँटमध्ये आजारी पाल हिंडत असल्याप्रमाणे बापट, ( बिचाऱ्याला कधी कुणी त्या नावाने हाक मारली नाही. काव्याची विशेष आवड नसणारेही त्याला ' बापट कुल्ले आपट' या संपूर्ण सयमक नावानेच हाक मारीत. त्यानेही कंटाळून तक्रार करण्याचे सोडून दिले होते), ही सारी त्या टेबलाभोवती होती. कोपऱ्यातील टेबलावर निग्रो कळसण्णावकर, फाटक्या आवाजात सतत बडबड करणारा काळे, हजार लोकांचे देणे ठेवणारा निर्लज्ज कामत व सतत घड्याळाकडे पहाणारा केळकर ही मंडळी. बाहेरच्या जगाचा एक लचकाच तेथे धुराच्या पडद्याआड स्वतंत्रपणे जगत होता. निरनिराळ्या प्रकृतीची ही माणसे. आयुष्याची पाने प्रत्येकापुढे टाकली आहेत. ज्याची त्याने सुसंगती साधायची, विजय मिळवायचा, शिक्षा स्वीकारायची आणी नऊ वाजता खालच्या मानेने बाहेर पडायचे, किंवा हा दिवस तरी गोड झाला या समाधानात अंधारात शिरायचे.
(क्रमशः)