माणूस नावाचा बेटा- १२

तो निर्जीवपणे उठला. आपण शिकारी की शिकार हे त्याला समजेना. वेदना ठसठसत होती पण तिचे मूळ बोटाना लागेना. तिच्या मनमोकळ्या चेहऱ्यावर अविश्वास दाखवावा असेही त्याला वाटेना.तूच स्वतः आहेस भाबडा, मूर्ख, बेअकली --- तो पुटपुटला. त्याने केळकरची छत्री उचलून कोपऱ्यात फेकली, त्यालाही एक शिवी हासडली, व शर्ट न काढताच तो पाटावर येऊन पडला.


जेवण कोंबून तो अंथरुणावर पडला खरा, पण नजरेसमोरची भुतावळ स्थिरावेना. एकाकी मुलीचा चेहरा, बैलाच्या पाठीवरचे आवाळू, भिकारणीचे पोट, बहिणीला लागलेली लाथ, मांडीवरील डागलेला डाग.... कोण खुळखुळून टाकते या कवड्या? का? कशा? कुठे? आणि या प्रश्नांना जर उत्तरे नाहीत, तर हे प्रश्न तरी नागफण्याप्रमाणे का निष्कारण उभे रहातात? अनुभवांच्या पायऱ्या चढत चढत वर निळ्या आकाशाच्या छत्रीखाली चिरंतन ज्ञानाचे स्मित घेऊन बुद्धाप्रमाणे रहावे. किंवा काहीच समजले नसल्यामुळे सदा हसणारी छोटी जयू व्हावे. मला रस्त्याकडेचा दगड कर, म्हणजे साऱ्या सुखदु:खाची लाट निर्विकारपणे वरुन जाऊ देईन. किंवा गणपतनानांची चालू क्षणातच जगण्याची धुंदी हवी. मागे प्रेमाने, दु:खाने पाहणे नको. समोर, भविष्यात आशेचा गळ नको बिनतक्रार गाडी ओढणारा बैलदेखील व्हावे, पण  हे अर्धवट, दुबळे माणसाचे आयुष्य नको. साऱ्या प्रश्नाचे या अंधारात कुठेतरी स्विच आहे. ते तरी हाताला लागावे, किंवा हे सारे प्रश्न तरी चिरडून टाकावेत. फक्त साधा, जाड कातडीचा, नुसते जठर व मोठे आतडे असलेला प्राणी कर. आपण सारी माणसे! आपल्या क्षुद्र बुद्धीने या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची घमेंड बाळगणारे. अंगुस्तानचे रहाटगाडगे करून पॅसिफिक उपसणारे. खेळातील घड्याळाचे काटे फिरवून रेडीओच्या संगीताची वाट पहाणारे. हातावर एखादे झगझगीत नाणे पडते काय, याची वाट पाहात लाल गुलमोहोराखाली बसलेली, आंधळ्या, चाचपडणाऱ्या बोटांची माणसे!


दत्तूला तर लहानपणापासूनच कसलीच उदाहरणे सहज सुटली नाहीत. इतक्या वर्षांनंतर तरी आपल्याला काय समजलेय? भारतीच्या हनुवटीला हात लावताच ती खुदकन का हसत असे हे शेवटपर्यंत समजले नाही. हॅटला चार भोके का असतात, कोटाच्या अस्तनीला बटणे का, हवेत जन्मणाऱ्या पारंब्या वेध घेत जमिनीकडे येतात, व जमिनीवर फुटलेल्या अंड्यातून बाहेर पडणारे पक्षी पहिल्या शक्य क्षणी वर धाव का घेतात, चार मळक्या बिया मातीत टाकल्या की त्यातून लाल निळ्या रंगाची ऍस्टर फुले कशी येतात, मधमाशीला पोळे बांधताना एकच आकृती कशी माहीत असते, किलिमांजारोवर वाघाचे प्रेत कुठून आले, अश्वत्थामा सध्या कुठे भटकतो आहे, अगदी पहिले मूल जन्माला आले त्या वेळी त्या पहिल्या आईबापाच्या भावना काय होत्या, ऑरोरा बोरिऍलिस म्हणजे काय, एक सूक्ष्म क्षण फुलांना गंध देतो, दुसरा कॅन्सरमध्ये मासात मृत्यू खोल पेरीत जातो, कसे?...


सगळा नुसता वांझोट्या, म्हाताऱ्या प्रश्नांचा जनानखाना आणि आपले दुबळे मन कंचुकीप्रमाणे त्यांच्या चेहऱ्याकडे पाहात निष्फळ हिंडते. वी आर द हॉलो मेन, वी आर द स्टफ्ड मेन...


या साऱ्या जंजाळापेक्षा रेन-मार्टिनचे ग्रामर, बर्मिंगहॅम शिकवण्या परवडल्या. लठ्ठ, लडदू बायकांचे चित्रपट, दर मासिकाचे मुखपृष्ठ म्हणजे कुंटणखान्याची खिडकी करणाऱ्या चित्रकाराची रंगाने राडेराड झालेली चित्रे पत्करली व आचरट  'दूध घालताना गवळी मालकिणीचे स्तन करकचतो' असल्या हकीकती सांगणारी मस्ती-रतीवाली मासिके चालतील. रेन-मार्टिन टेबलावर, मासिके उशीखाली, चार मिनारची थोटके जमिनीवर. ही ठिकठिकाणची माती गोळा करायची व त्या नखाएवढ्या उबदार घरट्यात कुंभारकिड्याप्रमाणे सुखी रहायचे. बस्स! या साऱ्या धडपडीत हे क्षुद्र समाधान. इतिश्री. चार पाने आकडेमोड करून उत्तर काय? तर x = ०


दत्तू उगाचच चिडला, अस्वस्थ झाला, व रागाने दिवा मालवला.
बराच वेळ तो पोकळ, पेंडा भरलेल्या अंगाने पडून होता. उद्या सकाळी पुन्हा शिकवणी. तीच पोरे, तेच चेहरे, डायरेक्ट-इनडायरेक्ट, अनॅलिसिस...


तो चमकला. आत कुठेतरी नाणे फरशीवर पडले. उद्या एक तारीख. उद्यापासून तो अतिशय हुशार जाधव, आणि लीला कामत शिकवणीला येणार. तो खुलला. स्वतःशीच थोडा हसलाही. मग उद्या ती बालकवींची 'औदुंबर' हीच कविता सांगावी. पुन्हा ऐलतटावर पैलतटावर हिरवाळी घेऊन तो निळासावळा झरा वाहू लागला. चार घरांचे गाव चिमुकले जागे झाले. त्या तंद्रीत त्याचे डोळे जडावले. जीवनासक्तीचे धागे इतका वेळ बाजूला उभे राहून सारा खेळ पाहात होते, ते पुढे आले, व त्यांनी त्याला गुरफटून टाकले. सुटण्याची इतकी धडपड करूनही पुन्हा उद्यावर विश्वासून तो त्या जाळ्यात अंग आखडून झोपला. जडावलेले दोळे मिटण्यापूर्वी त्याला क्षणभर शाळेतील मुंग्यांची लांबलचक रांग दिसली. चिरडलेल्या मुंग्यांभोवती क्षणाची खळबळ. पण पुन्हा काळा ठिपका - पांढरा ठिपका, काळा, पांढरा काळा---


आणि त्या लयीत त्याचा दिवस संपला!


(संपूर्ण)