ह्यासोबत
सगळे पत्तेच, सगळी माणसेच! इसेक्स जहाज बुडाल्यावर बाराशे मैलाच्या प्रवासात कॅप्टन एकेकाला मारून त्यांचे रक्त पिऊन स्वतः जगतो, तर टिटॅनिक बुडताना एक म्हातारा खलाशी आपल्या कुत्र्यासाठी माघारी येतो, व कुत्र्याबरोबर बुडून मरतो. किरकोळ भांडणात मुलगा जन्मदात्या आईच्या जिव्हारी लाथ मारतो, बहीण भावाचा विश्वासघात करते, तर सिडनी कार्टन कुणाच्यासाठी मरतो. डेस्डेमोनाचा दीप अंथरुणात विझतो, आणि वासंती नायलॉनचे पातळ लयीत हलवत हसत निघून जाते. एखादी वेडी पतीच्या मृत्यूने छातीत सुरी खुपसून घेते, तर दुसरे चेंगरलेल्या स्तनांमध्ये लॉकेट रुतवून घेते. एक जण तारुण्यातील एका आठवणीवर आयुष्याला धार लावत बसतो, तर दुसरा चौदाव्या दिवशी बोहल्यावर चढतो. मालकंसाचा भव्य विस्तार, मोटारीखालची किंकाळी, बाळंत होत असतानाचा आक्रोश, विमानहल्ल्याचा मन फाडणारा आवाज, चुंबनाचे चुटुकसंगीत, प्रेत बाहेर नेत असतानाची कालवाकालव. सारी माणसेच, सारे माणसांचे आवाज! रशिया - जर्मनीमध्ये कँपमध्ये ब्रेडच्या तुकड्यासाठी एक तरुणी पंधरा जणांना जाहीरपणे शरीराचे दान करते. दान घेणारी व देणारी माणसेच. दाराच्या फटीत बोटे घालून चिरडणारी, नखाखाली टाचण्या खुपसणारी! बेलसेनमध्ये कैद्यांना जिवंत जाळणारी माणसेच. हिरोशिमामध्ये अपंग झालेली हजारो माणसे - व तो प्रसंग त्यांच्यावर आणणारी! आपले मांस कपोताना देणारा शिबी, आणि नररुंडांचा गोपूर रचणारा तैमूर! क्रूसावर हातापायाला खिळे ठोकल्यावर वेदनेने Eloi,Eloi, असे उद्गार काढणारा ख्रिस्त, आणि त्याच क्रूसाखाली त्याचे कपडे कुणाला मिळावे यासाठी कवड्या खुळखुळवणारे पहारेकरी - दोघेही माणसेच! या साऱ्याच बिंदूंना छेदून जाणारे ते विशाल वर्तुळ तरी कोणते? सगळा माणूस तरी जाऊ दे, पण त्याच्या नुसत्या पावलांविषयी हीच गत आहे. त्याचा पूर्वज दिनोसॉर याचे चोपन्न इंच लांबीचे अजस्त्र पाऊल, बुटक्या ओबडधोबड पावलांचा टूलो लॉट्रेक, सारे शरीर अमर करून घोट्यातच रात्रंदिवस मृत्यू बाळगून ठेवणारा ऍकिलिस, आणि गिझेलची नृत्यरम्य कहाणी सांगणारी युलानोव्हाची कबूतरासारखी पावले!
या सगळ्यांना एकत्र आणणारी, त्यात जीव भरणारी ही विश्वाची नाडी तरी कोणती आहे? त्यात सिक्वेन्स कोणता? दैनंदिन आयुष्यात अनुभवांची रास पडते, त्यांना कोणत्या आकृतीत बसवायचे? खेळण्याचे नियम माहीत नसताना खेळायला कोण बसवते? आणि हे सारे विचारायचे तरी कोणाला? देवाला?
...देवाने नंतर मूठभर माती घेतली... मिशन स्कूलमध्ये असताना बायबल वाचणारे मास्तर दत्तूला आठवले..... माती घेतली व त्यात प्रभूने स्वतःचा श्वास मिसळला आणि त्याने स्वतःची प्रतिमा तयार केली. स्वतःची प्रतिमा? राग, लोभ, द्वेष, वासना मग ही सारी त्याचीच का प्रतिबिंबे? हात्तिच्या, मग आपण त्याला उगीचच घाबरत होतो. मग त्याचा तरी मोठेपणा कशात आहे? मग आम्हाला शिक्षा तरी का किंवा शाबासकी तरी कसली?काळे तांबडे पत्ते आपणच निर्माण करून आम्ही काही बदाम एक्क्याला मानाची पदवी देऊन इस्पिक गुलामाला फाशी देत नाही! छट, प्रतिमाबितिमा सारे झूट!- दत्तू चिडून म्हणाला. सगळा आंधळा, सिक्वेन्स न देणारा वेडा डाव! त्या महारोग्याच्या बोटांसारखा!
उलट देवाला आम्ही आमची प्रतिमा बनवली! आमच्या मनाचे अनेक पापुद्रे सोलून काढून एक बुजगावणे तयार केले! तो आहे म्हणून आम्ही जगत नाही, आम्ही आहो, म्हणून तो जगतो. आणि आम्हीच निर्माण केलेले ते सद्गुण, ते धर्मशास्त्र, ते नीतिशास्त्र! सारी दैनंदिन सुरक्षित जीवनाच्या परसात लावलेली वीतवीतभर रोपटी. त्या भिंती पडून परिस्थितीचे क्षितिज वाढू द्या. मग विश्वामित्र कुत्र्याची तंगडी चघळतो, मुलगा बापाला मारतो, कातडी मऊ करण्यासाठी सतत दात त्यावर घासल्याने दातांचे खुंट राहिलेल्या म्हातारीला एस्किमो खुशाल बर्फात टाकून पुढे जातो, आणि जिवलग मित्राचा विश्वासघात करून, माणूस कातडे कोरे ठेवतो. हौदात पाणी थोडे आहे, तोवर ठीक आहे, पण तेच तोंडापर्यंत आले की माकडीण पिलांवर उभी राहून स्वतःचा जीव बचावते, हे बिरबलालाही माहीत होते. सारे सद्गुण, नियम, सारे काही 'अदर कंडीशन्स रिमेनिंग द सेम...' मग गुन्हेगार कोण, फिर्यादी कोण? आणि न्यायाधीश तरी कोण? सर्वश्रेष्ठ न्यायाधीश तर आपल्या वशील्याचा, आपल्या आधारे जगणारा! की आपण सारेच जण एक अनिवार्य विशाल शिक्षा भोगणारे गुन्हेगार आहोत? आपल्या कल्पनेने यमयातनांचा नरक निर्माण केला. आपण हावऱ्या , विश्वासघातकी दुष्ट माणसांना तेथे पाठवले. माणसे जळत आहेत, चिरली जात आहेत, उकळत्या तेलात टाकली जात आहेत, ही त्यांना आमची धार्मिक शिक्षा! कुणास ठाऊक, या इथेच आपण सारेजण दुसऱ्या जगातून हाकललेले गुन्हेगार नसू कशावरून? मग तक्रार कसली, न्याय कसला आणि अन्याय तरी कसला?
(क्रमशः- अद्याप दोन भाग बाकी )