गजल

हे कुणाचे माग भिनले आत माझ्या ?
कोण सलते कापऱ्या श्वासात माझ्या ?


तू नको संदर्भ मागू पुसटलेले
मीच नाही नीटसा स्मरणात माझ्या


वागवित जखमा पुढे जातोच आहे
थांबणे होते कधी हातात माझ्या ?


पापण्यांच्या खोल खाली गाडले मी
स्वप्न वेडे फुलवूनी डोळ्यात माझ्या


कागदावर उतरण्या मन अधीर होई
कोण तेव्हा दाटते शब्दात माझ्या ?


स्पंदलो नसेन कधी वक्षात तुझिया
श्वास कां मग थांबला दारात माझ्या ?


हात हातातून कां निसटून जावा ?
ओढशी नव्हतीच कां स्पर्शात माझ्या ?


तुझा पत्ता हा नवा झाला अताशा
शोधती सारे तुला गाण्यात माझ्या