भासते - क्षितिज हरवले आहे...
की जरा मळभ दाटले आहे?
मार्ग चुकले अनेक लोक, तरी
लक्ष्य जागीच थांबले आहे!
कोण येईल सांग ह्या जागी?
मीच हे दार लावले आहे
आज लाचार ह्या जिण्यापेक्षा
वाटते - मरण चांगले आहे...
फिकिर नाही कुणास दुसऱ्यांची
का म्हणू शहर आपले आहे?
शांत राहू नकोस तू आता
भोवती रान पेटले आहे...
- कुमार जावडेकर, मुंबई